क्रिटीकल केअर इन्शुरन्स  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्रिटीकल केअर इन्शुरन्स 

क्रिटीकल केअर इन्श्युरन्सचीपॉलिसी असणाऱ्या व्यक्तीचेपॉलिसीत समाविष्ट असणाऱ्या कोणत्याही आजारासाठी निदान झाल्यास पॉलिसी कव्हर इतक्या रकमेचे पेमेंट क्लेमपोटी इन्श्युरन्सकंपनीकडून पॉलिसीधारकास केले जाते

क्रिटीकल केअर इन्शुरन्स 

बदलत्या जीवनशैलीमुळे कर्करोग, हृदयविकार, ब्रेन ट्युमर, पक्षाघात, किडनी फेल्युअर यांसारख्या आजारांची शक्यता वाढत आहे. एखाद्या व्यक्तीस गंभीर आजार झाल्यास ती व्यक्ती व जवळचे नातेवाईक घाबरून जातात. महागड्या उपचारांमुळे आर्थिक समस्याही निर्माण होते. बहुतांश सुशिक्षित लोक मेडिक्लेम इन्श्युरन्स पॉलिसी घेत असल्याचे दिसून येते, मात्र क्रिटीकल केअर इन्श्युरन्सबाबत अजूनही लोकांना फारशी माहिती नाही. 

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

क्रिटीकल केअर इन्श्युरन्सची पॉलिसी असणाऱ्या व्यक्तीचे पॉलिसीत समाविष्ट असणाऱ्या कोणत्याही आजारासाठी निदान झाल्यास पॉलिसी कव्हर इतक्या रकमेचे पेमेंट क्लेमपोटी इन्श्युरन्स कंपनीकडून पॉलिसीधारकास केले जाते. पॉलिसीत प्रामुख्याने हार्ट अटॅक, स्ट्रोक, कॅन्सर, किडनी ट्रान्सप्लांट, पार्किन्सन, पक्षाघात, मेजर ऑर्गन ट्रान्सप्लांट, ब्रेन ट्युमर यांसारख्या व अन्य काही गंभीर आजारांचा समावेश असतो. साधारणपणे ८ ते ३४ गंभीर आजारांचा समावेश क्रिटीकल केअर पॉलिसी असल्याचे दिसून येते, मात्र हे आजार इन्श्युरन्स कंपनीनुसार कमी अधिक असू शकतात. 

या पॉलिसीच्या अटी 
- वयोमर्यादा : १८ पासून ते ६५ पर्यंत. 
- इन्श्युरन्स : ५ लाख ते ५० लाख रुपये. 
- पॉलिसी कालावधी : १ ते ३ वर्षे 
- वेटिंग पिरीयड : ९० ते १८० दिवस 
- क्लेम पात्रता : सर्व्हायवल पिरीयड २८ ते ३० दिवस 

या अटी कंपनीनुसार कमी अधिक असतात. वेटिंग पिरीयड म्हणजे पॉलिसी घेतल्या तारखेपासून वेटिंग पिरीयडच्या आत आजाराचे निदान झाल्यास क्लेम मिळू शकत नाही. निदान झाल्यापासून सर्व्हायवल पिरीयडच्या आत पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास क्लेम मिळत नाही. काही इन्श्युरन्स कंपन्या सध्या अस्तित्वात असलेल्या आजारांसाठीही पॉलिसी देऊ करतात. मात्र, यासाठी वेटिंग पिरीयड ४ वर्षे असतो. विशेष म्हणजे, मिळणारा क्लेम पेमेंट स्वरूपाचा असतो. म्हणजे संपूर्ण पॉलिसी कव्हर (सम अस्यूअर्ड) इतकी रक्कम पॉलिसीधारकास आजाराच्या निदानानंतर सर्व्हाव्हल पिरीयड पूर्ण झाल्यावर लगेचच दिली जाते. मान्यताप्राप्त डॉक्टरचा निदानाबाबतचा रिपोर्ट क्लेमफॉर्म सोबत जोडणे आवश्यक असते. यासाठी हॉस्पिटलमध्ये असण्याची गरज नसते शिवाय उपचारासाठीच्या खर्चाचा तपशीलही देण्याची गरज नसते, या उलट मेडिक्लेमसाठी हॉस्पिटलमध्ये किमान २४ तास असणे आवश्यक असते व मिळणारा क्लेम हा सम अस्यूअर्ड व प्रत्यक्षात झालेला खर्च या दोन्हीतील कमीत कमी रकमेइतकाच असतो. बऱ्याचदा गंभीर आजारावरील उपचार हा दीर्घकाळ करावा लागतो आणि दरवेळी हॉस्पिटलमध्ये जावे लागतेच असे नाही. मात्र, उपचारावरील खर्च (औषधे, डॉक्टर फी, फिजिओथेरपी यावर होणारा खर्च) मेडिक्लेम पॉलिसीतून मिळत नाही. मात्र, रुग्ण आजाराच्या गंभीरपणामुळे कार्यक्षम राहू शकत नाही. परिणामी, उत्पन्नाचा स्रोत कमी होतो. प्रसंगी थांबतोही. अशा वेळी क्रिटीकल केअर इन्श्युरन्स पॉलिसी आर्थिक समस्या सोडविण्यास मदत करतेच, शिवाय पैशांअभावी उपचार थांबविण्याची वेळ येत नाही. अशी पॉलिसी घेताना कंपनी कोणत्या गंभीर आजारांसाठी कव्हर देत आहे व आपल्याला आनुवंशिकतेने होऊ शकणारे आजार यात समाविष्ट आहेत का, हे पाहून पॉलिसी घेण्याचा निर्णय घ्यावा. 

पॉलिसी कशी घ्यावी व किती कव्हर असणारी घ्यावे, हे आपण पुढील लेखात पाहू. 

टॅग्स :Cancer