esakal | गुंतवणुकीच्या पायऱ्या सावकाश चढा 
sakal

बोलून बातमी शोधा

गुंतवणुकीच्या पायऱ्या सावकाश चढा 

बहुतांश गुंतवणूकदारांची बचत आणि गुंतवणुकीची सुरुवात बॅंकेत ठेवी (एफडी), अल्पबचत योजना अशा पारंपरिक गुंतवणुकीच्या साधनांपासून होते.

गुंतवणुकीच्या पायऱ्या सावकाश चढा 

sakal_logo
By
सुहास राजदेरकर

बहुतांश गुंतवणूकदारांची बचत आणि गुंतवणुकीची सुरुवात बॅंकेत ठेवी (एफडी), अल्पबचत योजना अशा पारंपरिक गुंतवणुकीच्या साधनांपासून होते. कारण ही गुंतवणूक सर्वाधिक सुरक्षित असते. मात्र, आपण केलेली गुंतवणूक आणि त्यावर मिळणारा परतावा याची कधी चलनवाढीच्या दराशी आपण तुलना करत नाही. सध्या चलनवाढीचा दर 7.35 टक्के आहे, त्यामुळे काही गुंतवणूक साधनांमधील गुंतवणुकीवर नकारात्मक परतावा मिळतो. मात्र, ते प्रत्यक्षात लक्षात येत नाही. चलनवाढीवर मात करण्याकरिता थोडी जोखीम घेऊन क्रमाक्रमाने गोष्टी केल्या तर पुढे निवृत्तीपर्यंत आणि नंतर नक्कीच मोठी पुंजी उभी राहू शकते. कोणत्या आहेत अशा गोष्टी? थोडक्‍यात पाहूया. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

एक-एक पायरी योग्य चढलो तर आर्थिक प्रवासाची योग्य दिशेने सुरुवात होईल. 

आर्थिक नियोजन (फायनान्शिअल प्लॅंनिंग) : चलनवाढीचा दर लक्षात घेऊन आपल्या विविध उद्दिष्टांकरिता केव्हा आणि किती पैसे लागणार आहेत ते तपासून खर्चाचे योग्य नियोजन करणे. 

कर्जे : याआधी घेतलेली जास्त व्याजाची कर्जे कमी व्याजदर असणाऱ्या बॅंकांमध्ये हस्तांतरित करणे किंवा गुंतवणूक करण्यापूर्वी त्याची परतफेड करणे. 
बऱ्याचदा मोबाईल ऍपच्या माध्यमातून सहज कर्ज मिळत असल्याने मोठ्या व्याजदराने छोटी कर्जे घेतली जातात. तसेच, कमी परतावा देणाऱ्या गुंतवणूक साधनांमध्ये गुंतवणूक केली जाते. अशावेळी, सर्वप्रथम कर्जाची परतफेड करून मग गुंतवणूक करणे चांगले. 

विमा : विमा आणि गुंतवणूक वेगळे ठेवा आणि विमा फक्त "टर्म' विमाच असू द्या, त्याजोडीला पुरेसा "मेडिक्‍लेम' घ्या. 

प्राप्तिकर बचत : प्राप्तिकर भरावा लागत असेल, तर पहिली गुंतवणूक ही प्राप्तिकर कमी करण्याकरिता असावी. संपूर्ण प्राप्तिकर सवलत घेतल्यावरच इतर गुंतवणुकीचा विचार करावा. 

म्युच्युअल फंड : गुंतवणुकीची सुरुवात लिक्विड योजनांपासून करून ती चढत्या क्रमाने सोने, बॅलन्स्ड आणि इक्विटी योजनांपर्यंत वाढवा. म्युच्युअल फंड "इक्विटी' योजनांमधील गुंतवणूक फक्त सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) किंवा सिस्टिमॅटिक ट्रान्सफर प्लॅन (एसटीपी)द्वारे करा. 

ट्रेडिंग व डीमॅट खाते : शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी डीमॅट खाते आवश्‍यक असते, ते सुरू करून शेअर बाजारामधील चांगल्या कंपन्यांच्या प्राथमिक समभाग विक्रीमध्ये (आयपीओ) सहभागी होऊ शकता. डीमॅट नाही म्हणून बऱ्याच जणांना डीमार्ट, आयआरसीटीसी सारख्या चांगल्या कंपन्यांचे शेअर आयपीओच्या माध्यमातून घेता आले नाहीत. या कंपन्यांच्या शेअरने काही महिन्यांत 200 टक्‍क्‍यांपर्यंत परतावा दिला. तसेच, शेअर बाजाराचा अभ्यास करून किंवा तज्ज्ञांच्या मदतीने विविध क्षेत्रांतील चांगल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करा. शेअर बाजारामधील थेट गुंतवणूक आपल्या एकूण गुंतवणुकीच्या 10 टक्केपर्यंत असायला हरकत नाही. तज्ज्ञ आणि अनुभवी सल्लागारांच्या मदतीने शेअरमध्ये "एसआयपी'द्वारा गुंतवणूक करा. मात्र, भरपूर परताव्याच्या लोभाने इतर सुरक्षित गुंतवणुकीकडेही दुर्लक्ष करू नका. 

महत्त्वाचे : 1) कोणत्याही एका गुंतवणूक प्रकारात सर्व गुंतवणूक करू नका. गुंतवणूक सर्व मालमत्ता प्रकारांमध्ये विभागून करा. 
2) आर्थिक पायऱ्या दिसायला सोप्या असल्या तरीही काही पायऱ्यांवर अडखळण्याची शक्‍यता असते, त्यामुळे तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली या पायऱ्या चढाव्यात. चला तर मग, एकही पायरी न सोडता या सर्व पायऱ्या सावकाश चढायला सुरुवात करूया.

(लेखक गुंतवणूक क्षेत्रात कार्यरत आहेत.)