esakal | आता गरज संयमाची!
sakal

बोलून बातमी शोधा

आता गरज संयमाची!

शेअर बाजाराशी जोडलेल्या गुंतवणुकीत सध्या घट दिसल्याने गुंतवणूकदार घाबरून गेलेले दिसतात. पण अशावेळी संयम राखणे खूप महत्त्वाचे असते.

आता गरज संयमाची!

sakal_logo
By
सुहास राजदेरकर

शेअर बाजाराशी जोडलेल्या गुंतवणुकीत सध्या घट दिसल्याने गुंतवणूकदार घाबरून गेलेले दिसतात. पण अशावेळी संयम राखणे खूप महत्त्वाचे असते. गणपती ही बुद्धीची देवता मानली जाते. आज गणेश चतुर्थीच्या निमित्ताने गुंतवणूकदारांसमोरील सध्याच्या समस्येवर काय बौद्धिक तोडगा असू शकतो, ते थोडक्‍यात पाहूया.

देशाची अर्थव्यवस्था सध्या अस्थिर  असून, सोने वगळता बहुतेक ‘ॲसेट  क्‍लास’ने नजीकच्या काळात ‘उणे’ परतावा दिला आहे. यामुळे गुंतवणूकदारांचे प्रतीकात्मक (नोशनल) नुकसान झाले असून, अशा वेळी गुंतवणूकदार घाबरून जाऊन चुकीचे निर्णय घेण्याची शक्‍यता वाढली आहे. अशा वेळी नेमके काय केले पाहिजे, यावर एक नजर टाकूया.

१) सर्वप्रथम जे आपल्या नियंत्रणात नाही, त्यावर फार विचार न करता, जे आपल्या नियंत्रणात आहे, त्यावर भर द्या. जागतिक व्यापारयुद्ध केव्हा थांबेल, तेलाचे भाव केव्हा स्थिर होतील, याची उत्तरे आपल्या हातात नाहीत. परंतु, आपण केलेली गुंतवणूक ही उद्दिष्टांवर आधारीत असली पाहिजे आणि त्यामध्ये विविधता असली पाहिजे, हे मात्र आपण करू शकतो. 

२) आर्थिक नियोजन केले नसेल, तर ते तज्ज्ञ व्यक्तीकडून करून घ्या. केले असेल, तर जी मालमत्ता विभागणी ठरवली असेल, ती काटेकोरपणे पाळा. 

३) तुम्ही ‘ट्रेडर’ नसून, दीर्घकालीन गुंतवणूकदार असाल, तर सध्याच्या अस्थिर काळामध्ये घाबरून जाऊन गुंतवणूक काढून घेणे किंवा थांबविणे किंवा त्यात तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय बदल करणे टाळा. बाजाराशी जोडलेल्या गुंतवणुकीत संयम राखणे खूप महत्त्वाचे असते. मिड कॅप, स्मॉल कॅप शेअर्समध्ये किंवा तशा म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक केली असेल तर सध्या तुमचा प्रतीकात्मक तोटासुद्धा खूप मोठा असण्याची शक्‍यता आहे. अशा वेळी तुम्हाला त्या शेअर्स किंवा योजनांमधील गुंतवणूक वाढविण्याचा (ॲव्हरेज) मोह होऊ शकतो. परंतु, त्यापूर्वी कंपन्यांची कामगिरी तसेच इतर गोष्टी तपासण्याची आवश्‍यकता असते. त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच त्यामधील गुंतवणूक वाढवायची की नाही, ते ठरवा. 

४) गुंतवणूक सल्लागारांनी गुंतवणूकदारांची उद्दिष्ट्ये, त्यांची जोखीम घेण्याची क्षमता आणि गुंतवणूक कालावधी तपासूनच विशिष्ट म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिलेला असतो. सध्या बाजार अस्थिर आणि नरम असल्याने आपल्या गुंतवणुकीचे बाजारमूल्य तात्पुरते कमी होणे स्वाभाविक आहे. त्यामुळे सल्लागारांना दोष देण्यापेक्षा संयम ठेवून त्यांनी आखून दिलेल्या मार्गाचे पालन करणे योग्य होईल. 

५) एखादे जास्तीचे घर घेतलेले असेल, तर ते भाड्याने द्या किंवा प्रत्यक्ष सोने घरात बाळगण्यापेक्षा सोन्याच्या रोख्यांमध्ये गुंतवणूक केली तर थोडे का होईना पण व्याज मिळेल आणि सोन्याची मालकीसुद्धा राहील.

काय करा आणि काय करू नका...
भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेऊ नका. 
आपले उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवूनच गुंतवणुकीचे निर्णय घ्या.
इक्विटी योजनांमधील ‘एसआयपी’ बंद करू नका.

 

तात्पर्य - सध्याची वेळ ही शेअर बाजार; तसेच म्युच्युअल फंडापासून दूर पळण्याची नाही, तर संयम ठेवून त्याकडे डोळसपणे वळण्याची आहे. 

loading image
go to top