esakal | अर्थिक शिस्त पाळली,तर "एसआयपी'सारख्या गुंतवणुकीला "ब्रेक' लावण्याची गरज नाही
sakal

बोलून बातमी शोधा

sip

घसरत्या बाजारातच "एसआयपी' फायदेशीर ठरते,याची अनेकांना कल्पना नसते.आर्थिक आणीबाणीतही अर्थिक शिस्त पाळली,तर "एसआयपी'सारख्या नियमित गुंतवणुकीला "ब्रेक' लावण्याची गरज भासणार नाही.

अर्थिक शिस्त पाळली,तर "एसआयपी'सारख्या गुंतवणुकीला "ब्रेक' लावण्याची गरज नाही

sakal_logo
By
सुहास राजदेरकर

कोविड-19 च्या साथीमुळे गेले काही महिने देशभर लॉकडाउन सुरू आहे. त्याचा परिणाम नोकरी-व्यवसाय आणि उत्पन्नावरही झाला आहे, होत आहे. म्युच्युअल फंडात "सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन'च्या (एसआयपी) माध्यमातून होणाऱ्या नियमित गुंतवणुकीवरही त्याचा परिणाम झाला आहे. उत्पन्नावर परिणाम झाल्याने अनेकांनी सर्वप्रथम "एसआयपी' बंद करण्याचा (चुकीचा) निर्णय घेतल्याचे दिसून येते. परंतु, घसरत्या बाजारातच "एसआयपी' फायदेशीर ठरते, याची अनेकांना कल्पना नसते. आर्थिक आणीबाणीतही अर्थिक शिस्त पाळली, तर "एसआयपी'सारख्या नियमित गुंतवणुकीला "ब्रेक' लावण्याची गरज भासणार नाही. 

सोहम आणि पुष्कर हे असेच दोन मित्र. त्यांच्या ताज्या संवादातून काय बोध मिळतो, ते पाहू. 

सोहम - अरे, काय सांगू, सध्या फारच प्रॉब्लेम आहे. "सॅलरी कट'मुळं मी माझी "एसआयपी' बंद करायचं ठरवलंय. 

पुष्कर - का रे बाबा? कारण बाजार जेव्हा खाली असतो, तेव्हाच तर "एसआयपी'चा जास्त फायदा होत असतो... 

सोहम - ते माहिती आहे रे... बाजाराच्या चढ-उताराचा काही संबंध नाही. पण गेले तीन महिने माझा पगार 40 टक्‍क्‍यांनी कमी झालाय. आमच्या ऑफिसमध्ये सर्वांचाच झालाय. 

ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

पुष्कर - ओह.. अच्छा! परिस्थिती सगळीकडे सारखीच दिसतेय रे. कारण माझासुद्धा पगार कमी झालाय. 

सोहम - पण मग तरीसुद्धा तू तुझी "एसआयपी' कशी काय सुरु ठेवलीयस अजून? 

पुष्कर - अरे, मी दोन महिन्यांपूर्वीच एका तज्ज्ञाकडून माझं "फायनान्शिअल प्लॅनिंग' करून घेतलं... 

सोहम - ते कळलं रे बाबा, पण त्यामुळं लगेच पैसे कुठून आले? 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पुष्कर - अरे त्यांनी मला खूप चांगला सल्ला दिला. माझ्या हातून कळत-नकळतपणे होणाऱ्या आर्थिक चुका टाळण्याचा सल्ला दिला आणि तुला आश्‍चर्य वाटेल, पण मी त्या चुका सुधारल्यामुळं माझी तेवढी बचत होत गेली आणि पैसे शिल्लक राहू लागले. 

सोहम - अरे वा, मला पण सांग, मी पण पाहतो, की तू नक्की काय केलंयस ते. 

पुष्कर - मला वाटलंच होतं, की तू हे मला विचारणार... म्हणूनच तुझ्यासाठी आणि तुझ्यासारख्या इतरांसाठी सोबतच्या टिप्स देतो. त्यांचं कटाक्षानं पालन केलंस तर "एसआयपी' बंद करण्याची वेळ येणार नाही आणि घसरत्या बाजारातल्या संधीचा फायदा घेता येत राहील. एकदा का आर्थिक शिस्तीची सवय लागली, की भविष्यात कायमच त्याचा फायदा होत राहील. 

आर्थिक शिस्तीवर बोलू काही... 
- बॅंकेच्या बचत खात्यात किमान एका पगाराइतकी रक्कम कायम ठेवा. तसेच खात्यात किमान रक्कम न ठेवल्यामुळे होणारा दंड टाळा. 
- उधारीवर खरेदी करण्याच्या सवयीला लगाम घाला. क्रेडिट कार्डचे बिल उशिरा भरल्यामुळे होणारा भुर्दंड टाळा. 
- वीज, दूरध्वनी, मालमत्ता कर, सोसायटी मेंटेनन्स यासारखी देणी वेळच्या वेळी फेडा आणि बिल उशिरा भरल्याने होणारा दंड टाळा. 
- प्राप्तिकर वाचविण्यासाठी आर्थिक वर्षाच्या सुरवातीपासून शक्‍य तितकी गुंतवणूक करा आणि करबचतीचा लाभ घ्या. 
- पूर्वी घेतलेल्या "एनएससी', "टॅक्‍स सेव्हिंग बॉंड' सारख्या योजनांची मुदत संपलेली असेल, तर त्याचे मुदतपूर्तीचे पैसे आठवणीने परत घ्या. 
- आधी घेतलेले जास्त व्याजदराचे गृहकर्ज कमी व्याजदराच्या पर्यायाकडे हस्तांतरीत करा. 
- अभ्यास न करता अथवा तज्ज्ञांचे मार्गदर्शन न घेता, चुकीच्या योजनांमध्ये किंवा शेअरमध्ये गुंतवणूक करू नका. 
- तुलनेने सुरक्षित; पण भविष्यात अधिक परतावा देऊ शकणाऱ्या गुंतवणूकपर्यायांचा तज्ज्ञांच्या मदतीने शोध घ्या. 
(लेखक ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार आहेत.)