अर्थवेध : टी+१ सेटलमेंट : एक भविष्यवेधी पाऊल | Share Market | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market
अर्थवेध : टी+१ सेटलमेंट : एक भविष्यवेधी पाऊल

अर्थवेध : टी+१ सेटलमेंट : एक भविष्यवेधी पाऊल

sakal_logo
By
सुहास राजदेरकर

शेअर बाजाराशी संबंधित बहुतेकांनी ‘सेबी’ला विनंती केली होती की, ‘सेटलमेंट’ प्रक्रिया अजून छोटी आणि सुलभ करणे गरजेचे आहे. त्यानुसार, सप्टेंबरमध्ये ‘सेबी’ने एक परिपत्रक जारी केले, की शेअर बाजारांनी एक जानेवारी २०२२ पासून ही प्रक्रिया दोन दिवसांवरून एका दिवसावर आणण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यानुसार ‘बीएसई’ आणि ‘एनएसई’ हे दोन्ही शेअर बाजार आगामी फेब्रुवारी २०२२ पासून ‘सेटलमेंट पिरियड’ एक दिवसांवर आणून तो टप्प्याटप्प्याने सर्व शेअरसाठी लागू करण्याची शक्यता आहे.

शेअर बाजारामध्ये खरेदी किंवा विक्री केलेल्या दिवसानंतर ब्रोकर, बॅंका, डिपॉझिटरी पार्टिसिपंट, क्लिअरिंग कॉर्पोरेशन आदींमार्फत किती काळात पैसे अथवा शेअर तुमच्या खात्यात येतात, त्या प्रक्रियेला ‘सेटलमेंट’ असे म्हणतात. ‘टी’ म्हणजे ‘ट्रेड’ अर्थात, शेअरची खरेदी किंवा विक्री ज्यादिवशी केली तो दिवस. सध्याच्या नियमांप्रमाणे ‘सेटलमेंट’ काळ दोन दिवसांचा असल्याने, त्याला ‘टी+२’ असे म्हणतात. ‘ट्रेड’ (टी) या दिवसापासून दोन दिवसांत तुमच्या खात्यामध्ये पैसे अथवा शेअर येणे अपेक्षित आहे.

एक उदाहरण घेऊया. अजयने बुधवारी इन्फोसिस कंपनीचे १० शेअर १७०० रुपयांना एक शेअर, या भावाने विकत घेतले. अजयला बुधवारी १७,००० रुपये त्याच्या ब्रोकरला द्यावे लागतील. ब्रोकर ते क्लिअरिंग कॉर्पोरेशनला देईल. गुरुवारचा दिवस या प्रक्रियेमध्ये जाईल. शुक्रवारी अजयच्या ‘डिमॅट’ खात्यामध्ये ‘इन्फोसिस’चे १० शेअर जमा होतील. याउलट, समजा अजयने बुधवारी ‘इन्फोसिस’चे १० शेअर १७०० रुपयांना विकले, तर अजयच्या ‘डिमॅट’ खात्यामधून बुधवारी ‘इन्फोसिस’चे १० शेअर ‘ब्लॉक’ केले जातील व गुरुवारी ते ब्रोकरच्या खात्यात जातील. ब्रोकर ते क्लिअरिंग कॉर्पोरेशनमध्ये जमा करेल. शुक्रवारी अजयच्या बँक खात्यामध्ये १७,००० रुपये जमा होतील. टी+२ नियमांनुसार अजयला शेअर अथवा पैशांसाठी दोन दिवस थांबावे लागते. हाच काळ आता ‘टी+१’ होणार असल्याने अजयच्या खात्यात पैसे अथवा शेअर हे दुसऱ्याच दिवशी (गुरुवारी) येतील. छोट्या गुंतवणूकदारांचे पैसे एक दिवसासाठी ब्रोकरकडे असतात. (ज्याला ‘फ्लोट’ असे म्हणतात.) मोठ्या गुंतवणूकदारांना ही अडचण येत नाही; कारण त्यांची विश्वासार्हता छोट्या गुंतवणूकदारांपेक्षा जास्त असते.

संपूर्ण जगात ‘टी+१’ असा ‘सेटलमेंट पिरियड’ असणारा चीननंतर आपला दुसरा देश असेल. ‘सेटलमेंट पिरियड’ कमी करण्यामागील उद्देश असा आहे, की सर्वसामान्य गुंतवणूकदारांना शेअर विकल्यानंतर पैसे लवकर मिळावेत व दोन दिवस थांबावे लागू नये. तसेच विकत घेतल्यावर, त्यांच्या डिमॅट खात्यामध्ये शेअर लवकर जमा व्हावेत.

आज आपल्याला बँकेतील पैसे एका खात्यामधून दुसऱ्या खात्यामध्ये त्वरित हस्तांतरित करता येतात. तसे शेअरच्या बाबतीत होईल का? नव्याने येणारा ‘टी+१’ हा काळ भविष्यात ‘टी+०’ सुद्धा होऊ शकतो. परंतु, त्यामध्ये काही कार्यप्रणालीच्या अडचणी येऊ शकतात. कारण बँक खात्यातील ‘ट्रान्स्फर’मध्ये फक्त पैसे असतात, परंतु, शेअर बाजारामध्ये पैसे आणि शेअर असे दोन घटक येतात. त्यामध्ये एक अडचण अशी आहे, की एखाद्याने जर ९.१५ वाजता शेअर घेतले, तर त्याला ३.३० पर्यंत ते लगेच विकता सुद्धा येतात. त्याचप्रमाणे, विकणाऱ्याला ते खरेदीसुद्धा करता येतात. यालाच ‘इंट्रा डे’ म्हणतात. त्यामुळे, बाजार बंद झाल्यावरच सेटलमेंट प्रक्रियेला सुरवात करता येते. दुसरी अडचण अशी, की वेगवेगळ्या देशांमधील परकी गुंतवणूकदार आपल्याकडच्या बाजारांमध्ये गुंतवणूक करीत असतात. त्यांच्याकडील वेळा, कामाचे तास वेगळे असतात, तसेच त्यांना त्यांच्या ‘कस्टोडिअन’ची परवानगी घ्यावी लागते. त्यांच्यासाठी ‘टी+०’ हा काळ फारच कठीण होऊ शकतो. आपल्याकडील विविध घटकांनासुद्धा कार्यप्रणाली बदलावी लागेल, ज्यासाठी बरेच पैसे लागू शकतात.

तात्पर्य काय... तर भारतीय भांडवली बाजारामध्ये जी कार्यप्रणाली राबविली जाते, ती इतर विकसित देशांच्या तुलनेत खूप सरस आहे आणि शेअर बाजारातील ‘टी+१’ हे पाऊल आपल्या कार्यक्षमतेचे द्योतकच आहे.

(लेखक भांडवली बाजाराचे जाणकार आहेत.)

loading image
go to top