चकाकते ती चांदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

silver

भांडवल बाजार नियामक ‘सेबी’ने नोव्हेंबर २०२१ मध्ये म्युच्युअल फंडांना ‘चांदी’साठी ईटीएफ अर्थात ‘एक्सचेंज ट्रेडेड फंड’ बाजारात आणण्याची परवानगी दिली.

चकाकते ती चांदी

भांडवल बाजार नियामक ‘सेबी’ने नोव्हेंबर २०२१ मध्ये म्युच्युअल फंडांना ‘चांदी’साठी ईटीएफ अर्थात ‘एक्सचेंज ट्रेडेड फंड’ बाजारात आणण्याची परवानगी दिली. त्यानंतर ‘आयसीआयसीआय म्युच्युअल’ फंडाने जानेवारी महिन्यातच भारतामधील पहिला ‘सिल्व्हर-ईटीएफ’ बाजारात आणला. आत्तापर्यंत आयसीआयसीआय, बिर्ला, डीएसपी आणि निप्पोन या चार म्युच्युअल फंडांनी त्यांचे चांदी अर्थात सिल्व्हर-ईटीएफ बाजारात आणले आहेत; परंतु या फंडांची मागील सहा महिन्यांची कामगिरी निराशाजनक असून त्यांनी उणे (-) ११ टक्के इतका परतावा दिला आहे. अर्थात सहा महिने हा काळ कामगिरी ठरविण्यासाठी फारच कमी आहे. या सर्व योजनांचे एकूण बाजारमूल्य आज साधारणपणे १५०० कोटी रुपये आहे.

आधीच्या योजनांचा उणे परतावा असतांनासुद्धा, एचडीएफसी, या देशातील अग्रगण्य म्युच्युअल फंडाने, त्यांचा सिल्व्हर-ईटीएफ नुकताच बाजारात आणला आहे. काय कारणे असावीत आणि या योजनांमध्ये गुंतवणूक करावी का? थोडक्यात पाहूया.

चांदी ही ग्लोबल आहे अर्थात किमती देशपातळीवर नव्हे तर आंतरराष्ट्रीय घडामोडींवर अवलंबून असतात. चलनवाढ, युद्ध इत्यादींनी चांदीची किंमत वाढते. त्यामुळेच रशिया- युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर व चलनवाढ वाढल्यावर चांदीच्या किमती वर गेल्या. जानेवारी महिन्यात चांदी किलोमागे साधारणपणे ६०,००० रुपये होती. त्यानंतर भाव वाढले आणि मार्च मध्ये ते ६५,००० पर्यंत पोहोचले. मात्र युद्धानंतरसुद्धा रशियाची निर्यात सुरूच राहिल्याने आणि अमेरिकन फेड व बहुतेक सर्व मध्यवर्ती बँकांनी व्याजदर वाढविल्यानंतर चलनवाढ आटोक्यात राहण्याची शक्यता निर्माण झाल्याने चांदीच्या भावात घसरण होत गेली.

उत्पादन आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये चांदीचा उपयोग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या क्षेत्रामध्ये चांदीचा वापर २०२१ मध्ये ४५०० टन इतका होता. तो वाढून या वर्षी ६००० टनापर्यंत जाण्याची शक्यता आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे आधुनिक काळाप्रमाणे बदलणारे तंत्रज्ञान व उत्पादन पद्धतींमध्ये चांदी मिळणारे महत्त्वाचे स्थान हे आहे.

इलेक्ट्रिक वाहने आणि त्यांची चार्जिंग स्टेशन्स यामध्ये चांदीचा उपयोग मोठ्या प्रमाणात आहे कारण ती गंजरोधक आहे. यामुळे वाहन उद्योगातून चांदीला मोठी मागणी आहे व ती वाढण्याची शक्यता आहे. त्यातून कोरोना काळानंतर वाहन उद्योग तेजीमध्ये आहे.

संपूर्ण जगामध्ये वातावरणातील प्रदूषण कमी करण्याकडे भर आहे. त्यामुळे सौरऊर्जेला तसेच ‘सोलर फोटोव्होल्टाइक’ यांना महत्त्व आले आहे आणि यामध्येसुद्धा चांदीला अतिशय महत्वाचे स्थान असून चांदीचा वापर मोठ्या प्रमाणात होणार आहे. सोलर पॅनेल्स बनविण्यासाठी त्याचप्रमाणे दळणवळण क्षेत्रातील उत्पादनांमध्ये चांदीचा वापर होतो.

चांदीचा सर्वांत जास्त वापर करणाऱ्या देशांमध्ये भारताचा पहिला क्रमांक लागतो. भारतामध्ये उत्पादन आणि उत्पादन-क्षमता वाढते आहे. याला विविध कारणे आहेत, जसे की, पी.एल.आय. योजना, चीनमधून बाहेर पडून भारतामध्ये येणारे उद्योग धंदे इत्यादी. यामुळे, भारतामध्ये चांदीची मागणी वाढते आहे आणि आपली चांदीची आयात तिप्पट वाढण्याची शक्यता आहे. २०२१ मध्ये पहिल्या सात महिन्यांमध्ये चांदीची आयात फक्त ११० टन होती; परंतु २०२२ मधील पहिल्या सात महिन्यात ती तब्बल ५१०० टन पोहोचली आहे व ती वर्ष संपेपर्यंत ८००० टनांवर जाण्याची शक्यता आहे. या सर्व कारणांमुळे मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी स्थिती असल्याने किमती वर जाण्याची शक्यता आहे.

एचडीएफसी सिल्व्हर ईटीएफ

योजना संपण्याची तारीख २६ ऑगस्ट २०२२

इतर कारणे

प्रत्यक्ष चांदी विकत घेणे हे बरेच वेळा व्यवहार्य ठरत नाही. कारण त्यामध्ये भेसळ आहे का याची भीती असते. घरी कपाटात ठेवली तर चोरीची भीती. बँकेच्या लॉकरमध्ये ठेवली तर त्याचे चार्जेस असतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, किमती वर गेल्या तर आपली मानसिकता लगेच ती दुकानात जाऊन विकण्याची नसते. गुंतवणूक अशी पाहिजे की ज्यामध्ये नफा वेळीच आणि सहजपणे काढून घेता आला पाहिजे. या सर्वांमुळे सोने किंवा चांदी ही पेपर (डिजिटल) स्वरूपात घेणे केंव्हाही फायद्याचे असते.

Web Title: Suhas Rajderkar Writes Silver Etf Exchange Traded Fund Market

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..