परदेशातील रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करायचीय?

सुहास राजदेरकर
Monday, 14 December 2020

भारतीय म्युच्युअल फंड उद्योगांमध्ये ‘आरईआयटी’ विभागातील ही पहिली योजना आहे. या आधी बाजारात आलेल्या ‘रिट्स’ योजनांपेक्षा याचे वेगळेपण काय आहे, याविषयी जाणून घेऊया. 

कोटक म्युच्युअल फंडाने ‘कोटक इंटरनॅशनल रिट्स फंड ऑफ फंड्स’ ही योजना नुकतीच बाजारात आणली आहे, ती २२ डिसेंबरपर्यंत खुली आहे. भारतीय म्युच्युअल फंड उद्योगांमध्ये ‘आरईआयटी’ विभागातील ही पहिली योजना आहे. या आधी बाजारात आलेल्या ‘रिट्स’ योजनांपेक्षा याचे वेगळेपण काय आहे, याविषयी जाणून घेऊया. 

‘घरबसल्या सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, हॉँगकॉँग येथील रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याची सुविधा आणि तीसुद्धा भारतीय चलनात करणे शक्य आहे का?’ 

अर्थविषयक इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

‘होय, सात डिसेंबरपासून सुरू झालेली कोटक म्युच्युअल फंडाची ‘कोटक इंटरनॅशनल रिट्स फंड ऑफ फंड्स’ योजना ही सुविधा देत आहे.’

‘सकाळ’च्या माध्यमातून ‘आरईआयटी’ (रिट्स) या संकल्पनेविषयी वेळोवेळी प्रबोधन केले गेले आहे. त्यामुळे थेट या योजनेकडे वळून योजनेची वैशिष्ट्ये जाणून घेऊया. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारतीय म्युच्युअल फंड उद्योगांमध्ये ‘आरईआयटी’ विभागातील ही पहिली योजना आहे. या योजनेमध्ये जमा झालेले पैसे, सुमिटोमो मित्सुई डी. एस. ॲसेट मॅनेजमेंट कंपनी यांच्या ‘एशिया रिट्स सब ट्रस्ट फंडा’मध्ये गुंतविले जाणार आहेत. ‘एशिया रिट्स सब ट्रस्ट फंड’ सर्व पैसे सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, हॉंगकॉंग येथील विविध कमर्शिअल; तसेच रेसिडेन्शिअल रिअल इस्टेटमध्ये गुंतवते. या संकुलामधील कारखाने, ऑफिसमधून आलेले भाडेउत्पन्न हे गुंतवणूकदारांमध्ये लाभांश स्वरूपात वाटले जाते. तसेच प्रॉपर्टीच्या किमतींमध्ये मध्ये वाढ झाल्यास शेअरची किंमत वाढून भांडवली लाभसुद्धा मिळतो.

योजनेचे वेगळेपण आणि फायदे 
‘एशिया रिट्स सब ट्रस्ट फंड’ इतर देशांमध्ये गुंतवणूक करताना त्या-त्या देशाच्या चलनामध्ये करतात. त्यामुळे, कोटकच्या योजनेची कामगिरी बाजूला ठेवली तरी या इतर देशांच्या चलनांच्या तुलनेत भारतीय चलनामध्ये घट झाल्यास आपोआपच भारतीय गुंतवणूकदारांचा फायदा होईल. भारतामध्ये सध्या फक्त दोन ‘आरईआयटी’ आहेत. सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, हॉंगकॉंग या देशांमध्ये बरेच ‘आरईआयटी’ असल्यामुळे जोखीम विभागली जाते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सुमिटोमो मित्सुई डी.एस. ॲसेट मॅनेजमेंट ही कंपनी तब्बल ११ लाख कोटी रुपयांच्या वर मालमत्तेचे व्यवस्थापन बघत आहे. त्यामुळे, त्यांच्या अनुभवाचा फायदा आपल्या गुंतवणूकदारांना मिळेल.

बाहेरील देशांत स्थावर मालमत्ता भाड्याने देऊन मिळणारे उत्पन्न अधिक आहे. त्यामुळे, लाभांश; तसेच भांडवली लाभ जास्त मिळण्याची शक्यता आहे. 

भारतामधील ‘आरईआयटी’ फक्त कमर्शिअल ऑफिसमध्ये गुंतवणूक करतात. परंतु, बाहेरील देशांमधील ‘आरईआयटी’च्या गुंतवणुकीमध्ये विविधता असते. त्यामुळे जोखीम कमी होते. 

तरलता अर्थात लिक्विडीटी आहे. गुंतवणूकदारांना, निव्वळ मालमत्ता मूल्यानुसार (एनएव्ही) कधीही योजनेमधून बाहेर पडणे शक्य आहे. त्यासाठी शेअर बाजारात जायची गरज नाही.

प्राप्तिकराचे काय?
ही ‘डेट’ योजना असल्याने त्यानुसार प्राप्तिकर आणि भांडवली कर द्यावा लागेल. तसेच लाभांश तुमच्या उत्पन्नामध्ये मिळविला जाऊन तुमच्या कर पातळीप्रमाणे प्राप्तिकर लागू होईल.

जोखीम काय आहे?
म्युच्युअल फंडामधील कोणत्याही योजनेमध्ये परतावा अथवा मुद्दल, याची खात्री नसते. ही योजना फक्त रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये गुंतवणूक करीत असल्याने प्रॉपर्टीच्या किमती घसरल्या तर भांडवली तोटा होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही.

‘कोविड १९’चा प्रभाव
‘कोविड’मुळे, हॉटेल आणि रेसिडेन्शिअल हे दोन विभाग जास्त प्रभावित आहेत. परंतु, ‘एशिया रिट्स सब ट्रस्ट फंडाची’ या दोन्ही विभागांमध्ये गुंतवणूक शून्य असल्याने ती एक जमेची बाजू आहे. तसेच ‘कोविड’वर येणाऱ्या लसींचा विचार केला तर भविष्यामध्ये रिअल इस्टेटच्या किमती वाढू शकतात. 

तात्पर्य : ज्या गुंतवणूकदारांना इक्विटीपेक्षा कमी जोखीम घ्यायची आहे, पण डेट योजनांपेक्षा थोडी अधिक जोखीम घ्यायची तयारी आहे आणि पोर्टफोलिओमध्ये विविधता हवी आहे, त्यांनी अशा योजनेचा अवश्य विचार करावा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: suhash rajderkar write article about Foreign investment in real estate