‘इन्कम टॅक्स रिटर्न’ उशिरा दाखल केल्यास? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sukrut Dev writes about Late Filing of Income Tax Return

आर्थिक वर्ष २०२१-२२ चे विवरणपत्र विलंब शुल्कासह उशिराने म्हणजेच ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत दाखल करण्याने काय होते?, ही शेवटची संधी का?

‘इन्कम टॅक्स रिटर्न’ उशिरा दाखल केल्यास?

आर्थिक वर्ष २०२१-२२ चे प्राप्तिकर विवरणपत्र (इन्कम टॅक्स रिटर्न) ३१ जुलैच्या आत भरायचे राहून गेले असेल, तर एक शेवटची संधी आहे. हे विवरणपत्र रु. १००० (जर वार्षिक उत्पन्न रु. पाच लाखांच्या आत असेल) आणि रु. ५००० (जर वार्षिक उत्पन्न रु. पाच लाखांच्या वर असेल) इतके विलंब शुल्क भरून ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत दाखल करता येऊ शकेल. आधी ही विवरणपत्रे हाताने भरून ती प्राप्तिकर विभागाच्या कार्यालयात जाऊन आणि रांगेत उभे राहून दाखल करावी लागत असत. तो त्रास वेगळाच असे. पूर्वी विवरणपत्र दाखल व्हायला उशीर झाला तरी चालायचे; पण आता संगणकीय प्रणालीमुळे एक मिनिट उशीर (३१ जुलै रात्री १२ वाजून १ मिनिट) झाला तरी लगेच विलंब शुल्क (लेट फी) लागू होते. पूर्वी करदात्यांना एकदम दोन वर्षांची विवरणपत्रे दाखल करता येत असत. ही सूट किंवा मुभा आता संपुष्टात आलेली आहे.

आर्थिक वर्ष २०२१-२२ चे विवरणपत्र विलंब शुल्कासह उशिराने म्हणजेच ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत दाखल करण्याने काय होते?, ही शेवटची संधी का?,या बद्दलचे प्रमुख मुद्दे जाणून घेऊ :

  • प्राप्तिकरदात्याचे करपात्र उत्पन्न आहे आणि त्यावर उदगम करकपात (टीडीएस) केली गेली असेल, तर अशा वेळेस एकूण प्राप्तिकरातून करकपात वजा होऊन जो देय प्राप्तिकर भरायला येतो, त्यावर व्याज व विलंब शुल्क देखील भरावे लागेल. जर एकूण प्राप्तिकरापेक्षा ‘टीडीएस’ जास्त असेल, तर परतावा (रिफंड) मिळू शकतो, पण त्यामधून विलंब शुल्क वजा होईल.

  • सर्वांत महत्त्वाचे म्हणजे करपात्र उत्पन्न नसेल किंवा उत्पन्नच नसेल; पण तुमच्या नावावर किंवा संयुक्तपणे एखादी मालमत्ता खरेदी केली असेल आणि तुमच्या ‘पॅन’ची नोंद, प्रॉपर्टी व प्राप्तिकर पोर्टलवर फॉर्म २६ एएस, वार्षिक माहितीपत्र (AIS वा TIS) मध्ये झाली असेल, तर त्या खरेदीचे सर्व तपशील दिसतात. त्यातून ‘टीडीएस’ झाला असल्यास, त्या ‘टीडीएस’चे टॅक्स क्रेडिट किंवा रिफंड मिळवायचा असल्यास आपले विवरणपत्र विलंब शुल्क भरून शक्य तितक्या लवकर दाखल करावे.

  • फॉर्म २६ एएस, वार्षिक माहितीपत्र (AIS वा TIS) मध्ये शेअर, म्युच्युअल फंड व्यवहार दिसत असेल तर त्यावर अल्पकालीन किंवा दीर्घकालीन भांडवली लाभ कर (कॅपिटल गेन टॅक्स) लागण्याची शक्यता आहे का, हे बघणे आवश्यक आहे. करपात्र उत्पन्न असतानाही प्राप्तिकर भरला नाही किंवा विवरणपत्र भरले नाही, तर प्राप्तिकर विभागाकडून नोटीस येऊ शकते.

  • प्रॉपर्टी खरेदी-विक्री केली असल्यास आजकाल सर्व माहिती (उदा. ‘पॅन’, नाव, पत्ता, फोन नंबर, ई-मेल आदी) सरकारकडे पोचते, हे लक्षात घ्या. थोडक्यात, तुम्ही प्राप्तिकर विभागाच्या ‘रडार’वर येत असता. आधीचे कोणत्याही आर्थिक वर्षांचे प्राप्तिकर विवरणपत्र भरले नसेल तरी आणि प्रॉपर्टी व्यवहार केलेला असल्यास आणि करपात्र उत्पन्न नसले, तरी देखील विवरणपत्र नक्कीच भरावे, कारण विक्री असल्यास दीर्घकालीन भांडवली लाभ कर लागू होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्याची गणना करण्याची आवश्यकता असते.

  • बँकेचे कर्ज घेण्यासाठी प्राप्तिकर विवरणपत्राची मदत होते. कारण बऱ्याचदा गेल्या दोन-तीन आर्थिक वर्षांची विवरणपत्रे मागितली जातात.

प्राप्तिकर विवरणपत्र वेळेवर भरणे नेहमीच हिताचे असते. पण काही कारणाने जमले नसल्यास, ते विलंब शुल्कासह विशिष्ट मुदतीत तरी नक्कीच भरावे. ३१ डिसेंबर २०२२ पेक्षा जास्त उशीर केल्यास विवरणपत्र भरणे बाद होऊ शकते. नंतर आर्थिक वर्ष २०२१-२२ चे विवरणपत्र भरायचे असल्यास, तुम्हाला प्राप्तिकर विभागाच्या नोटीसीनंतर दंडासह भरावे लागेल, हे लक्षात ठेवावे. त्यामुळे अनेक गोष्टींचा तोटा होऊ शकतो.

Web Title: Sukrut Dev Writes About Late Filing Of Income Tax Return

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..