
प्रसाद प्रधान
एकरकमी गुंतवणुकीसाठी मोठी रक्कम जमा केली आहे का? बऱ्याचदा अशा गुंतवणूकदारांना निर्णय घेताना मोठी पेचाची परिस्थिती निर्माण होते. डेट फंडांसारख्या तुलनेने सुरक्षित साधनांत एकरकमी सर्व पैसे गुंतवावेत आणि नंतर पुढे समभागसंलग्न (इक्विटी) योजनांमध्ये टप्प्याटप्प्याने हा पैसा गुंतवीत नेण्याच्या ‘सिस्टेमॅटिक ट्रान्स्फर प्लॅन’ (एसटीपी)ची व्यवस्था अशा स्थितीत उपयोगात आणली जाते. तथापि, हा पारंपरिक मार्ग सोडून स्मार्ट गुंतवणूकदार जरा हटके पाऊल टाकू शकतो, जसे बाजाराचे मूल्यांकन आकर्षक असते, तेव्हा अधिक गुंतवणूक करून चांगला लाभ तो मिळवेल आणि मूल्यांकन महाग झाल्यावर गुंतवणूक कमी करून सबुरीने घेईल. (Systematic Transfer Plan: The Smart Way To Cater To Your Goals)
गुंतवणुकीसाठी योग्य रक्कम आणि कार्यकाळ किती असावा व ते कसे ठरवायचे? तसेच, बाजार स्वस्त किंवा महाग आहे हे कसे ओळखावे? हे बऱ्याच गुंतवणूकदारांपुढे व्यावहारिक स्वरूपाचे दुहेरी आव्हान असते.
गुंतवणूकदारांची ही कोंडी सोडविण्याचे साधन म्हणून ‘आयसीआयसीआय प्रुडेंशियल बूस्टर एसटीपी’ सुरू केली आहे. येथे रक्कम आणि कालावधी हे दोन्ही प्रमुख निकष हे पारंपरिक ‘एसटीपी’प्रमाणे निश्चित नसून, ते बदलते असतात.
‘बूस्टर एसटीपी’ची संकल्पना
‘बूस्टर एसटीपी’मागील मुख्य संकल्पना हीच, की जेव्हा बाजार स्वस्त असतो तेव्हा गुंतवणूकदाराने अधिकाधिक युनिट्स जमा करत जावेत आणि उलट स्थिती असेल तेव्हा उलट वर्तन करण्यास मदत करणे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने ‘बेस एसटीपी’ रक्कम म्हणून दरमहा १०,००० रुपये निश्चित केले आहेत, असे समजू या. नंतर बाजाराच्या स्थितीनुसार ‘एसटीपी’ची रक्कम ही ‘बेस एसटीपी’ रकमेच्या ०.१ पट ते ५ पट या श्रेणीत बदलू शकते, असे ठरविले गेले. म्हणजेच ती १००० रुपये ते ५०,००० रुपयांपर्यंत असू शकते. ही युक्ती गुंतवणूक निधीच्या विभाजनास मदत करते, जेणेकरून बाजारातील संधींना कार्यक्षमतेने हेरले जाऊ शकते.
गुंतवणूकदारांसाठी ही बाब फायदेशीर कशी ठरते, हे समजण्यासाठी ‘ए’ आणि ‘बी’ या गुंतवणूकदारांचे उदाहरण लक्षात घेऊ या.
गुंतवणूकदार ‘ए’ने जानेवारी २०१९ मध्ये १२ लाख रुपये मूळ स्रोत योजनेत एकरकमी गुंतविले आणि दरमहा एक लाख रुपयांची पारंपरिक ‘एसटीपी’ ही लक्ष्यित समभागसंलग्न (इक्विटी) योजनेत एक वर्ष कालावधीसाठी वर्ग करण्याचे त्याने ठरविले. या पद्धतीने त्याच्या गुंतवणुकीचे जून २०२१ मध्ये मूल्य हे १५.९ टक्के चक्रवाढ दरासह १७,३४,५२७ रुपये झाले आहे. गुंतवणूकदर ‘बी’ने २०१९ मध्ये १२ लाख रुपये मूळ स्रोत योजनेत एकरकमी गुंतविले आणि समभागसंलग्न (इक्विटी) योजनेत त्याने ‘बूस्टर एसटीपी’ केली. या पद्धतीप्रमाणे, त्याच्या गुंतवणुकीचे जून २०२१ मध्ये मूल्य हे २६.४ टक्के चक्रवाढ दरासह २१,५६,३५५ रुपये झाले आहे. यावरून हे स्पष्ट दिसते की, ‘बूस्टर एसटीपी’च्या माध्यमातून हप्ता आणि कार्यकाळातील गतिमान बदल एकूणच पोर्टफोलिओसाठी अधिक परतावा प्रदान करेल.
गुंतवणुकीसाठी योग्य वेळ
यापूर्वीही आपण पाहिले आहे की, जेव्हा बाजारात सुधारणा होत असते, तीच बाजारात गुंतवणुकीची सर्वांत चांगली वेळ असते. परंतु घबराटीमुळे बरेच लोक घसरणीच्या वेळी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करीत नाहीत. बाजारात पडझड झाल्यावर अधिक गुंतवणूक करा, असे मार्केटगुरू नेहमीच म्हणत असतात.
‘बूस्टर एसटीपी’ची निवड केल्यास हे आपोआपच घडून येईल. बाजार उच्च पातळीवर असताना इक्विटी योजनांत तुमची गुंतवणूक कमी होईल आणि बाजाराच्या उताराच्या वेळी तुम्ही इक्विटी योजनांत अधिकाधिक गुंतवणूक कराल. बाजाराची वेळ साधण्याच्या अवघड फंदात पडण्यापेक्षा, आपण तेच फायदे ‘बूस्टर एसटीपी’तून सक्षमपणे मिळवू शकतो.
(लेखक सजग सिक्युरिटीज प्रा. लि.चे संचालक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.