esakal | करकायदा : लेखक व पेटंटधारकांसाठी...
sakal

बोलून बातमी शोधा

करकायदा : लेखक व पेटंटधारकांसाठी...

करकायदा : लेखक व पेटंटधारकांसाठी...

sakal_logo
By
ॲड. सुकृत देव

आर्थिक वर्ष २०२०-२१ साठीचे प्राप्तिकर विवरणपत्र (इन्कम टॅक्स रिटर्न) भरण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर २०२१ आहे. विवरणपत्र भरण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध केले आहेत. नव्या पर्यायात कराचे स्लॅब दर जास्त आहेत, मात्र विविध कर वजावटींचा लाभ घेता येणार नाही. जुना पर्याय निवडला तर कर वजावटी घेता येतात, पण यात कराचे स्लॅब दर कमी आहेत. लेखक आणि पेटंटधारकांसाठी (बौद्धिक मालमत्ता) काही खास वजावटी असतात आणि त्या कलम ८० क्यूक्यूबी व कलम ८० आरआरबी याअंतर्गत मिळतात. या कलमांविषयी अधिक माहिती जाणून घेऊया :

  • कलम ८० क्यूक्यूबी : या प्राप्तिकर वजावटीचा लाभ लेखकांना होऊ शकतो. ज्या लेखकांनी पुस्तक लिहून प्रकाशित केले आहे, ज्यांच्याकडे पुस्तकाचे मालकी हक्क (कॉपीराईट) आहेत किंवा त्यांनी साहित्यिक काम, कलात्मक काम, वैज्ञानिक काम केले आहे आणि त्यामधून लेखकांना रॉयल्टी उत्पन्न किंवा कॉपीराईट फी मिळालेली असेल, अशा लेखकांनी प्राप्तिकर विवरणपत्र भरताना उत्पन्नाच्या स्रोतामध्ये रॉयल्टी उत्पन्न किंवा कॉपीराईट फी दाखवावी आणि नंतर कमाल तीन लाख रुपयांपर्यंत प्राप्तिकर वजावट घ्यावी. ही वजावट घेण्यापूर्वी लेखकाने, जी व्यक्ती (प्रकाशक) पेमेंट करणार आहे किंवा पैसे देणार आहे, त्यांच्याकडून प्रमाणापत्र (फॉर्म १० सीसीडी) घेणे अनिवार्य आहे.

  • कलम ८० आरआरबी : या प्राप्तिकर वजावटीचा लाभ पेटंट किंवा संशोधन वा बौद्धिक मालमत्ताधारकांना होऊ शकतो. ज्यांनी पेटंट कायद्यानुसार, पेटंटची नोंदणी केली आहे, असे पेटंटधारक यात येऊ शकतात. ज्या पेटंटधारकांना रॉयल्टी उत्पन्न मिळाले आहे, अशा पेटंटधारकांनी विवरणपत्र भरताना, उत्पन्नाचे स्रोतामध्ये रॉयल्टी उत्पन्न दाखवावे आणि नंतर कमाल तीन लाख रुपयांपर्यंत वजावट घ्यावी. ही वजावट घेण्यापूर्वी पेटंटधारकाने पेटंट कंट्रोलरकडून पेटंटचे प्रमाणपत्र (फॉर्म १० सीसीइ) घेणे अनिवार्य आहे.

या दोन्ही वजावटींचा लाभ घेण्यासाठी संबंधितांनी आपले विवरणपत्र कलम १३९(१) नुसार दिलेल्या कालावधीत भरणे आवश्यक आहे. विहीत कालावधीत विवरणपत्र भरले नाही, तर अशा वजावटींचा लाभ मिळत नाही, हे लक्षात ठेवावे. त्यामुळे विवरणपत्र वेळेत भरणे हिताचे ठरते.

loading image
go to top