गुड न्यूज: आता गुंतवणूकदारांना कर बचतीसाठी मिळाली 30 जूनपर्यंत संधी

वृत्तसंस्था
Wednesday, 25 March 2020

पॅन-आधार जोडणीस मुदतवाढ
​पॅन-आधार क्रमांकाशी जोडणी करण्याची मुदत येत्या 30 जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे. या आधी चालू महिन्यात 31 मार्चपर्यंत पॅन आणि आधार कार्ड जोडणी करणे गरजेचे होते.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या पार्श्ववभूमीवर केंद्र सरकारने गुंतवणूकदारांना दिलासा दिला आहे. आता आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये करबचतीसाठी करण्यात येणाऱ्या गुंतवणुकीसाठी मुदत वाढविण्यात आली आहे. 31 मार्चपर्यंत केलेली गुंतवणूक कर बचतीसाठी पात्र असते. आता मात्र गुंतवणूकदारांना कर बचतीसाठी 30 जून 2020 पर्यंत मुदत मिळाली आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांनी 30 जूनपर्यंत केलेली गुंतवणूक कर बचतीसाठी पात्र असेल.

गुंतवणूकदार दरवर्षी कर बचत करण्यासाठी मार्च महिन्यात विविध गुंतवणूक साधनांमध्ये गुंतवणूक करत असतात. उदा. पीपीएफ, आयुर्विमा योजना किंवा म्युच्युअल फंड (ईएलएसएसमध्ये), मेडीक्लेम किंवा संस्थांना दिलेले डोनेशन यांचा तसेच इतर काही गुंतवणुकीचा यामध्ये समावेश होतो.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जगभर थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसच्या पार्श्ववभूमीवर करदात्यांना देखील मोठा दिलासा दिला आहे. सीतारामन यांनी प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याच्या मुदतीत वाढ केली आहे.

अनेक राज्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. प्राप्तिकर आणि वस्तू आणि सेवाकर (जीएसटी),विवाद से विश्वास योजना आणि  पॅन-आधार जोडणीला तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. आता करदात्यांना 30 जून 2020 पर्यंत विवरणपत्र सादर करता येणार आहे. याआधी 31 मार्च ही अंतिम मुदत होती. 

2018-19 या आर्थिक वर्षाचे विवरणपत्र 30 जुनपर्यंत भरता येईल. तसेच उशिरा कर भरणाऱ्यांकडून आकारण्यात येणाऱ्या व्याजाच्या दरात कपात केली आहे. त्यांच्याकडून 12 टक्क्यांऐवजी 9 टक्के दराने व्याज आकारण्यात येईल. तसेच मार्च, एप्रिल आणि मे महिन्याच्या वस्तू आणि सेवा कराचे (जीएसटी) विवरणपत्र भरण्याची मुदत देखील 30 जून 2020 करण्यात आली आहे. याचबरोबर 'विवाद से विश्वास' योजनेच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे.

मुदतीवाढीमुळे जे करदाते प्राप्तिकराशी संबंधित प्रकरणांचा निपटारा करू इच्छित आहेत, त्यांच्यासाठी विवाद से विश्वास या योजनेचा 30 जूनपर्यंत लाभ घेता येणार आहे. यापूर्वी या योजनेची अंतिम मुदत 31 मार्च आहे. त्यासाठी फॉर्म क्रमांक 18 भरून देणे आवश्यक आहे. तसेच पाच कोटींहून कमी उलाढाल असलेल्या कंपन्यांना विलंब आकार आणि दंड माफ करण्यात आला आहे. त्यापुढील उलाढाल असलेल्या कंपन्यांना ९ टक्के दराने व्याज आकारले जाईल.

पॅन-आधार जोडणीस मुदतवाढ
पॅन-आधार क्रमांकाशी जोडणी करण्याची मुदत येत्या 30 जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे. या आधी चालू महिन्यात 31 मार्चपर्यंत पॅन आणि आधार कार्ड जोडणी करणे गरजेचे होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tax-saving investments for FY 2019-20 allowed till June 30 2020