देशात तांत्रिक आर्थिक मंदी?; दुसऱ्या तिमाहीतही विकास दरात घसरण 

वृत्तसंस्था
Friday, 13 November 2020

रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरणाचे (मॉनिटरी पॉलिसी) प्रभारी आणि डेप्युटी गव्हर्नर मायकेल पत्रा यांच्या समितीने या परिस्थितीचा अहवाल तयार केला आहे. 

नवी दिल्ली - सलग दुसऱ्या तिमाहीत भारताची अर्थव्यवस्था मंदावली असल्याचे दिसते, असे मत रिझर्व्ह बँकेच्या अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. ही परिस्थिती देशाला अभूतपूर्व मंदीकडे नेत आहे. रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरणाचे (मॉनिटरी पॉलिसी) प्रभारी आणि डेप्युटी गव्हर्नर मायकेल पत्रा यांच्या समितीने या परिस्थितीचा अहवाल तयार केला आहे. 

रिझर्व्ह बँकेच्या मासिक ‘बुलेटिन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘नॉउकास्ट’मध्ये असे म्हटले आहे, की इतिहासात पहिल्यांदाच तांत्रिकदृष्ट्या भारत मंदीचा सामना करीत आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

तिमाहीत घट होण्याची शक्यता 
रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे, की सप्टेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीत विकास दरात (जीडीपी) ८.६ टक्क्यांनी घटल्याचे दिसून आले. यापूर्वी एप्रिल ते जून या तिमाहीत अर्थव्यवस्थेमध्ये २३.९ टक्के घट झाली होती. अर्थतज्ज्ञांनी असेही लिहिले आहे, की २०२०-२१ च्या उत्तरार्धात भारताने आपल्या इतिहासात प्रथमच तांत्रिक मंदीमध्ये प्रवेश केला आहे. सरकार यासंदर्भातील अधिकृत आकडेवारी २७ नोव्हेंबर रोजी जाहीर करेल. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये सुधारणा अपेक्षित 
अर्थव्यवस्थेतील ‘यू-टर्न’ कायम राहिल्यास ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत देशाची अर्थव्यवस्था वाढीस लागेल. मागील महिन्यात गव्हर्नर शक्तीकांत दास यांनीही असाच अंदाज वर्तविला होता. 

राहुल गांधींचा सरकारवर निशाणा 
रिझर्व्ह बँकेच्या अंदाजानंतर, कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्रावर निशाणा साधला. ते म्हणाले, भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी मंदी आली आहे. या मंदीला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Technical economic downturn in the country Falling growth rate in the second quarter