इलेक्ट्रिक बाईक घ्या; एक लाख रूपयांपर्यंत बचत करा 

वृत्तसंस्था
Monday, 26 August 2019

भारतातील आघाडीचा इलेक्ट्रिक दुचाकींचा ब्रँड असलेल्या हिरो इलेक्ट्रिकने आज पुण्यात डॅश इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली

 पुणे: भारतातील आघाडीचा इलेक्ट्रिक दुचाकींचा ब्रँड असलेल्या हिरो इलेक्ट्रिकने आज पुण्यात डॅश इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. कंपनीने उच्च गुणवत्तेच्या ई-स्कुटर्सच्या आकर्षक श्रेणी बाजारात आणल्या आहेत. याचबरोबर हिरो इलेक्ट्रिक भारतात ऑप्टिमा व एनवायएक्स ईआर या उच्च वेगाच्या ई-स्कुटर्स देखील सादर केल्या. ऑप्टिमा ईआर आणि एनवायएक्स ईआर आता सर्व हिरो इलेक्ट्रिक वितरकांकडे विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. इलेक्ट्रिक बाईकवर सध्या सबसिडी उपलब्ध असल्याने वाहनांच्या किंमती कमी झाल्या आहेत. शिवाय पर्यावरणपूरक वाहनांना चालना देण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांवरील जीएसटी देखील 5 टक्क्यांवर आणण्यात आला आहे. 

हिरोच्या बाईकमध्ये एलआय-आयओएन बॅटरी वापरण्यात आली आहे. परिणामी तीन वर्षांची गॅरंटी कंपनीकडून देण्यात येत असल्याने इतर कोणताही मेंटेनंस खर्च नाही. शिवाय प्रतिचार्ज 110 किमी धावण्याची क्षमता असल्याने दोन वर्षात एक लाख रूपयांपर्यंतची बचत होणार आहे. 

''अधिक स्मार्ट मोबिलिटी सोल्युशन्सचा पर्याय पसंत करणारे व पर्यावरणाबाबत जागरूक असलेल्या ग्राहकांना सर्वोत्कृष्ट इलेक्ट्रिक टू-व्हिलर मोबिलिटी सोल्युशन्स पुरविण्याकरिता हिरो इलेक्ट्रिकने नवीन डॅश बाजारात आणली आहे.  डॅश अद्ययावत आणि किफायतशीर उत्पादन असून गाडीत पोर्टेबल एलआय-आयओएन बॅटरी वापरण्यात आली आहे. आम्हाला खात्री आहे की सर्व वयोगटातील लोकांना हे उत्पादन पसंतीत उतरेल .ग्राहकांची गरज लक्षात घेऊन आम्ही नेहमीच नवीन व अधिक चांगली उत्पादने आणण्यासाठी प्रयत्नशील राहू.'' असे हिरो इलेक्ट्रिक इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सोहिंदर गिल यांनी सांगितले. 

 गाडीत नवीन काय? 
डॅश:  नवीन व आकर्षक डॅश इलेक्ट्रिक स्कुटरमध्ये 48व्ही 28 एएच एलआय-आयओएन बॅटरी 4 तासाच्या फास्ट चार्जिंगसह प्रतिचार्ज 60 किमी क्षमता आहे. भारतातील ड्राइव्हिंग कंडिशन्स लक्षात घेता 145 एनएम एवढा उच्च ग्राऊंड क्लिअरन्स डॅशमध्ये आहे. नवीन डॅशमध्ये एलईडी डीआरएल,एलईडी हेडलाईटस,डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर,युएसबी मोबाईल चार्जिंग पोर्ट,ट्युबलेस टायर्स,ड्युएल टोन बॉडी कलर व ग्राफिक्स,वास्तविकता लक्षात घेऊन रिमोट बूट ओपनिंगसारखी वैशिष्ट्ये आहेत.यामध्ये आकर्षक डिझाईन,प्रभावी फ्रंट फेशिया आणि ड्युएल टोन कलर पर्याय आहेत. डॅश इलेक्ट्रिकची किंमत 62,000 रुपयांपासून पुढे असणार आहे. 

ऑप्टिमा ईआर व एनवायएक्स ईआर
डॅश बरोबरच ऑप्टिमा ईआर व एनवायएक्स ईआर या दोन इलेकट्रीक गाड्या सादर करण्यात आल्या आहेत. ऑप्टिमा ईआर व एनवायएक्स ईआर हे दोन्ही एलआय-आयओएन बॅटरीयुक्त असून प्रतिचार्ज 110 किमी व 100 किमी क्षमता आहे .आयसीई बाईक्स आणि स्कुटर्स वापरणार्‍या व रोज बर्‍यापैकी प्रवास करणार्‍या ग्राहकांना हिरो इलेक्ट्रिक ईआर श्रेणीमधील कुठल्याही ई-स्कुटरचा पर्याय निवडून दोन वर्षांत एक लाख रूपयांपर्यंत बचत करता येईल. ऑप्टिमा ईआर व एनवायएक्स ईआर अनुक्रमे 68,721 (एक्स पॅन इंडिया)  व 69,754 ( एक्स पॅन इंडिया) या किंमतीत उपलब्ध आहेत.

भारतात इलेक्ट्रिक गाड्यांचा वापर प्रोत्साहित करण्याच्या सरकारच्या ध्येयाशी सुसंगत राहून हिरो इलेक्ट्रिक भारतात अद्ययावत उत्पादने आणण्याकरिता संशोधन व विकासात (आरअ‍ॅन्डडी) गुंतवणूक करणार आहेत. 2020 च्या अखेरपर्यंत सध्याच्या 615 टचपॉईंटपासून 1000 पर्यंत नेण्याचे हिरो इलेक्ट्रिकचे उद्दिष्ट असून देशातील सर्व भागात देखील ही उत्पादने उपलब्ध करून द्यावयाची आहेत. गुंतवणूकीच्या बाबतीत कंपनीची महत्त्वाकांक्षी योजना असून पुढील 3 वर्षांत ई-स्कुटर्सची उत्पादनक्षमता प्रतिवर्षी 5 लाख युनिटसपर्यंत नेण्यात येणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Top Electric Scooters Launching In 2019 That You Should Save Money To Buy