'टीव्हीएस मोटर'कडून कर्मचाऱ्यांच्या वेतनात २० टक्के कपात

वृत्तसंस्था
Tuesday, 26 May 2020

एप्रिल महिन्यात लॉकडाऊनमुळे टीव्हीएस मोटरने देशांतर्गत बाजारपेठेत शून्य विक्री नोंदवली आहे.तर कंपनीने८,१३४दुचाकींची आणि १,५०६तीनचाकींची निर्यात याच कालावधीत केली आहे

टीव्हीएस मोटर कंपनी आपल्या  कर्मचाऱ्यांच्या वेतनात २० टक्क्यांपर्यत कपात करणार आहे. कंपनीकडून यासंदर्भातील घोषणा करण्यात आली आहे. कोविड-१९ महामारीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाचा मोठा फटका वाहन उत्पादन क्षेत्राला बसला आहे. टीव्हीएस मोटरलाही याचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळेच कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनातील कपात ही तात्पुरत्या स्वरुपाची असणार आहे. पुढील सहा महिन्यांसाठी कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

'देशातील दुचाकी वाहनांच्या खपात मोठी घट झाली आहे. या अभूतपूर्व संकटाच्या पार्श्वभूमीवर टीव्हीएस मोटर कंपनी पुढील सहा महिन्यांसाठी (मे ते ऑक्टोबर २०२०) कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करणार आहे. यात सर्वच स्तरातील कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे', अशी माहिती कंपनीने दिली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

'मात्र कामगारांच्या पातळीवर ही वेतन कपात केली जाणार नाही. ज्युनियर एक्झिक्युटीव्ह पातळीवर ५ टक्के वेतन कपात, आणि वरिष्ठ व्यवस्थापनाच्या पातळीवर १५ ते २० टक्के वेतन कपात करण्यात येणार आहे. अशा संकट काळात कर्मचाऱ्यांनी स्वत:हून पुढे येत वेतन कपात करण्याचा पर्याय कंपनीसमोर ठेवला आहे ही बाब खूपच ह्रदयस्पर्शी आहे', असे टीव्हीएस मोटरकडून सांगण्यात आले आहे.

* कोविड-१९ महामारीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाचा वाहन उत्पादन क्षेत्राला मोठा फटका 
* कर्मचाऱ्यांच्या वेतनात २० टक्क्यांपर्यत कपात
* पुढील सहा महिन्यांसाठी (मे ते ऑक्टोबर २०२०) कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात 
* कामगारांच्या पातळीवर ही वेतन कपात केली जाणार नाही
* लॉकडाऊनमुळे दुचाकी वाहनांच्या विक्रीत मोठी घट

 

टीव्हीएस मोटर कंपनीने मार्च महिन्यात दुचाकी वाहनांच्या विक्रीत ५५ टक्क्यांची घट नोंदवली आहे. मार्च २०२० मध्ये कंपनीने १,३३,९८८ दुचाकी वाहनांची विक्री केली आहे. तर मार्च २०१९ मध्ये टीव्हीएस मोटरने ३,१०,८८५ दुचाकींची विक्री केली होती. देशांतर्गत बाजारपेठेत मार्च महिन्यात ९४,१०३ दुचाकींची विक्री केली आहे, तर मागील वर्षी याच कालावधीत कंपनीने २,४७,६९४ दुचाकींची विक्री केली होती. यावर्षी मार्चमध्ये १,४१,०८६ मोटरसायकलची विक्री झाली आहे. तर स्कुटरच्या खपात मात्र घट होत तो ९८,४४७ वरून घटून ३४,१९१ वर आली आहे.

एप्रिल महिन्यात लॉकडाऊनमुळे टीव्हीएस मोटरने देशांतर्गत बाजारपेठेत शून्य विक्री नोंदवली आहे. तर कंपनीने ८,१३४ दुचाकींची आणि १,५०६ तीनचाकींची निर्यात याच कालावधीत केली आहे. चेन्नई बंदरातील कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर कंपनीने निर्यात सुरू केली होती. एप्रिल महिन्यात अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी शून्य विक्रीची नोंद केली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: TVS Motor to cut employees salary upto 20 percent