इक्विटी फंडातील गुंतवणूक संयम महत्त्वाचा !

 investment in equity funds is important
investment in equity funds is important

आपल्या गुंतवणुकीचा काटेकोरपणे आढावा, त्यातील नफा-तोटा, अपेक्षा, गुंतवणूक तशीच ठेवण्याचा कालावधी आणि परतावा यांचा मेळ घालत इक्विटी योजनांचा मागोवा घेत आणि आर्थिक स्थिती पारखून निर्णय घेणे उपयुक्त ठरू शकते.

गेल्या वर्ष-दीड वर्षापासून अर्थव्यवस्थेत आणि शेअर बाजारात मंदीचे वातावरण आहे. ओघाने म्युच्युअल फंडच्या इक्विटी योजनांची कामगिरीही खराब झाली. अनेक म्युच्युअल फंड योजनांच्या उणे परताव्यामुळे गुंतवणूकदार काळजीत आहेत. सर्व स्तरांवरच्या मंदीमुळे गुंतवणूकदार संभ्रमात आहेत. ३१ जानेवारी २०१८ नंतर आजपर्यंत सेन्सेक्‍स उणे ४.३७%, निफ्टी उणे ८.२५%, एनएस मिडकॅप-१०० निर्देशांक उणे १४.५२%, एनएसई स्मॉलकॅप-१०० निर्देशांकानी उणे १८.२८% दराने परतावा दिलाय. यामागे जागतिक मंदी आणि राष्ट्रीय अर्थव्यवस्थेतील घसरण अशी कारणे आहेत. 

अर्थव्यवस्थेतील या स्थितीची जाणीव आणि गांभीर्य सरकारला असून, त्यावर मात करण्यासाठी प्रयत्नही होताहेत. निरनिराळ्या उद्योगांच्या समस्यांच्या अभ्यासाअंती उपाययोजनांसाठीही काम सुरू आहे. धोरणातील बदल आणि व्यवस्थेतील सुधारणा यापुढेही चालूच राहतील. सरकारचे हे निर्णय दीर्घकालावधीत परिणामकारक असतील, मात्र अल्पावधीत ते कदाचित पुरेसे वाटणार नाहीत. इतर जागतिक घटनांचाही शेअरबाजारावर परिणाम होतो. उदा. जागतिक मंदीची चाहूल, विविध देशांमधले तणाव, अमेरिका-चीन यांच्यातील आर्थिक तणाव. या बाबी पाहता अर्थव्यवस्थेतील आणि शेअर बाजारातील मंदीचे सावट दूर व्हायला काही महिने लागतील, हे निःसंशय. गुंतवणूकदारांनी याची जाणीव ठेवावी. मात्र याचा अर्थ असाही नाही की, सध्यस्थितीत इक्विटीमधील गुंतवणुकीतून बाहेर पडून ती इतरत्र गुंतवावी. कारण शेअर बाजारात तेजीबाबत छातीठोकपणे सांगणे कठीण आहे. 

गुंतवणूकदारांनी या स्थितीत इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीचे करायचे काय, हा विचार स्वाभाविक आहे. सध्याच्या इक्विटी योजनांमधील गुंतवणुकीत बराच तोटा दिसत असेल. शेअरमधील घसरणीने एनएव्ही खालच्या पातळीवर आहेत. यापेक्षा पातळी खालावू शकते, पण संयमाने गुंतवणूक सुरू ठेवल्यास मध्यम आणि दीर्घ कालावधीत चांगला परतावा मिळू शकेल. गुंतावणुकीतून निधी काढल्यास झालेलं नुकसान भरून काढून त्यावर नफ्याची संधी गमावली जाईल. गुंतवणूकदराने पोर्टफोलिओचा अभ्यास कारून त्यात पुढीलप्रमाणे बदल केल्यास गुंतवणुकीची अंतर्गत जोखीम आणि परतावा याचा समतोल साधू शकतो. सर्वप्रथम सर्वच गुंतवणुकीचा आढावा घेऊन त्यातील घटकांची जोखीम आणि पतदर्जा अभ्यासावा. गुंतवणुकीपासूनच्या अपेक्षा, निधीच्या परतफेडीचा कालावधी, गुंतवणूक कालावधी, जोखीम घ्यायची क्षमता हे सर्व ओळखून संपूर्ण गुंतवणुकीचा पोर्टफोलियोत किती प्रमाणात डेट (रोखे, ठेवी इत्यादी), किती प्रमाणात शेअर बाजाराशी निगडित योजना आणि किती प्रमाणात सोने असावे, हे ठरवावे. यालाच ‘ॲसेट ॲलोकेशन’ म्हणतात. सध्याच्या गुंतवणुकीत डेट-इक्विटी-सोने यांचे किती प्रमाण, ते पाहून त्याचे अपेक्षित प्रमाण राखण्यासाठी गुंतवणुकीत फेरबदल करावेत. इक्विटी योजनांपैकी ज्यांची कामगिरी इतरांच्या तुलनेत सातत्याने खराब आहे, अशांमधील गुंतवणूक काढून घ्यावी. जर गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओमध्ये इक्विटीचे प्रमाण अपेक्षित प्रमाणापेक्षा जास्त असेल तरच खराब कामगिरीच्या योजनांमधून निधी काढून त्याची डेट साधनात गुंतवणूक करावी. इक्विटीचे प्रमाण अपेक्षित प्रमाणाइतके असेल तर खराब कामगिरीच्या योजनांमधील निधी चांगल्या कामगिरीच्या योजनांकडे वळवावा. एसआयपी बंद करू नयेत. एसआयपी जर खराब कामगिरी असणाऱ्या योजनेत असेल तर त्या बंद करून चांगल्या कामगिरीच्या योजनांतून चालू करावी. चांगल्या योजना निवडताना तिचे गुंतवणूक उद्दिष्ट काय, ते आपल्या योग्य का ते पाहावे. तसेच त्या योजनांची गुंतवणूक कशात, किती हे फॅक्‍टशिटमधून तपासावे. तसेच या योजनांची आतापर्यंतची कामगिरी, सातत्य, परताव्याची तुलना आणि त्यातील सातत्य, योजनेच्या फंड मॅनेजरचा अनुभव इत्यादींच्या अभ्यासांती योजनेची योग्यता ठरवावी. इक्विटी योजनांमधील गुंतवणुकीत बाजारमूल्यानुसार मोठ्या कंपन्या, मध्यम कंपनी आणि छोट्या कंपन्या यात गुंतवणूक किती असावी हेदेखील ठरवणे फायद्याचे ठरते. 

जर दीर्घ कालावधीसाठी इक्विटी योजनांमध्ये गुंतवणुकीसाठी निधी असेल तरीही एकरकमी गुंतवणूक करू नये. सिस्टिमॅटिक ट्रान्सफर प्लॅनमार्फत गुंतवणूक करावी. त्याचा कालावधी किमान वर्षाचा ठेवावा. एकदा गुंतवणूक पोर्टफोईओची पुनर्रचना केली की तो वरचेवर बदलू नये. वर्ष संपल्यानंतर पोर्टफोलिओचा आढावा घेऊन त्यात फेररचना करू शकता. अशा प्रकारे गुंतवणूक पुरेशा अवधीत होईल किंवा ज्ञान असलेल्या नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागाराची मदत घ्यावी. 

सार्वत्रिक निवडणुकीनंतर भांडवली बाजारात तेजी होती. निर्देशांक स्थिरस्थावर होईल, असे वाटत असतानाच जुलैमधल्या अर्थसंकल्पाने गुंतवणूकदारांचा घात केला. अतिश्रीमंतांवरील कर अधिभाराचे जबरदस्त पडसाद भांडवली बाजारावर उमटले. परकी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर-एफपीआय) ही घोषणा मागे घेईस्तोवर शेअर्सच्या जोरदार विक्रीतून हजारो कोटींची गुंतवणूक काढून घेतली. गेल्या दोन महिन्यांत कधी निर्देशांकाची हजार अंशांची झेप, तर कधी त्याहून अधिक अंशांची घसरण झाली. अशा प्रतिकूल स्थितीत काय करावे, हे सांगताहेत भांडवली बाजार विश्‍लेषक आणि गुंतवणूक तज्ज्ञ...

उज्ज्वल मराठे, गुंतवणूक सल्लागार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com