लॉकडाऊनमुळे मध्यवर्गीयांच्या ‘भविष्यावर’ घाला, दोन महिन्यात EPF मधून उचलले जवळपास पाच हजार कोटी

विनोद राऊत
Friday, 31 July 2020

पैसै काढण्यात 15 हजार पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या अधिक

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात मध्यवर्गीय परिवारांना घर चालवणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे संसाराचा गाडा रेटण्यासाठी आपल्या भविष्यासाठी केलेली बचत मोडण्याशिवाय अनेकांना पर्याय उरला नाही. लॉकडाऊनच्या काळात भविष्य निर्वाह निधीतून अनेकांनी उचललेल्या रक्कमेवरुन हे सहज लक्षात येते. एप्रिल, मे या दोन महिन्यात कोविड अँडवान्स अंतर्गत जवळपास पाच हजार कोटीची रक्कम काढण्यात आली आहे. पैसै काढणाऱ्यांमध्ये सर्वाधिक संख्या 15 हजार रुपयांपेक्षा कमी पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांची होती. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी मंडळाने ही माहिती दिली आहे.

लॉकडाऊनमुळे हक्काच्या प्रॉव्हिडंट फंडमधून पैसै काढण्याची वेळ लाखो कर्मचाऱ्यांवर आली. या काळातील भिषण परिस्थिती बघता केंद्र सरकारने पीएफ फंडातील जमा रक्कमेच्या 75 टक्के रक्कम काढण्यास मंजूरी दिली होती. या अंतर्गत येणाऱ्यां दाव्यांचा निपटारा करण्यासाठी केंद्र सरकारने 29 मार्चला ऑनलाईन  व्यवस्था उभी केली होती. बेरोजगार झालेल्या व्यक्तीला त्याच्या पीएफ फंडात जमा रक्कमेच्या 75 टक्के रक्कम काढण्याची मुभाही या अंतर्गत देण्यात आली होती.

मोठी बातमी कोरोनाची 'उलटी गिनती' कधी सुरु होणार? आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केला 'मोठा' खुलासा...

एप्रिल आणि मे या दोन महिन्यात तब्बल 36 लाख कर्मचाऱ्यांनी पीएफ खात्यातून पैसै काढण्यासाठी अर्ज केले. या दाव्यापोटी भविष्य निर्वाह मंडळाने 11,540 कोटी रुपये वितरीत केले. कोविड अँडवान्स योजने अंतर्गत 15 लाख 42 हजार कर्मचाऱ्यांनी अर्ज केले होते. ईपीएफ बोर्डाने  या अंतर्गत 4850 कोटी रुपयाचे वितरण केले. विशेष म्हणजे या  2 महिन्याच्या कालावधीत बोर्डाने दिवसाला 80 हजार अर्जांचा निपटारा केला. तर दिवसाला  192 कोटी रुपयाचे वाटप केले.

कोविड अँडवान्स योजनेअंतर्गत 15 हजार रुपयापेक्षा कमी पगार असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या सर्वाधिक म्हणजे 74 टक्के होती. दर महिन्याला 50 हजारांपेक्षा जास्त वेतन असणाऱ्या केवळ 2 टक्के कर्मचाऱ्यांचे पैसै काढण्यासाठी अर्ज आले. तर 15 ते 50 हजार पर्यंत पगार कमावणाऱ्या 24 कर्मचाऱ्यांची या अंतर्गत अर्ज दाखल केले होते. 

अर्ज दाखल केल्यानंतर 3 ते 10 दिवसाच्या कालावधीत या अर्ज मंजूर करण्यात आलेत. लॉकडाऊनमुळे या वर्षी पैसै काढण्यासाठी अर्जाच्या संख्येत वाढ झाली. 2019 मध्ये एप्रिल-मे या महिन्यात एकुण 33 लाख दावे निकालात काढण्यात आले होते. मात्र यावेळी तब्बल 36.02 दावे निकालात काढण्यात आल्याची माहिती कार्यालयाने दिली आहे.

( संपादन - सुमित बागुल )

under covid advance around five thousand crore withdrawn from EPF accounts amid corona

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: under covid advance around five thousand crore withdrawn from EPF accounts amid corona