‘टर्म इन्शुरन्स’ला हवे प्राधान्य

विघ्नेश शहाणे
Monday, 18 November 2019

आयडीबीआय फेडरल लाइफ इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विघ्नेश शहाणे. ‘सकाळ मनी’शी केलेली ही खास बातचीत...

भारतात आयुर्विम्याबाबत लक्षणीयरीत्या जागरूकता वाढली आहे. विकसित देशांच्या तुलनेत आपण अजूनही तेवढे जागरूक झालो नसलो तरी गेल्या दहा वर्षांपूर्वीचा विचार करता नागरिकांमध्ये विम्याबाबतची जागरूकता वाढली आहे. या अगोदर विमा पॉलिसी काढताना माहिती किंवा जागरूकतेच्याअभावी ग्राहकांकडून कोणतीही चौकशी किंवा प्रश्न विचारले जात नव्हते. आता मात्र ग्राहक चौकस झाला आहे... सांगत आहेत आयडीबीआय फेडरल लाइफ इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विघ्नेश शहाणे. ‘सकाळ मनी’शी केलेली ही खास बातचीत...

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

प्रश्‍न - विमा क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले करून आता २० वर्षे झाली आहेत. मागे वळून पाहताना तुम्हाला खरोखरच वाटते, की याचा  ग्राहकांना फायदा झाला आहे? अजून काय करण्याची गरज आहे?
- भारतात आयुर्विम्याबाबत लक्षणीयरीत्या जागरूकता वाढली आहे. मात्र, विकसित देशांच्या तुलनेत आपण अजूनही तेवढे जागरूक झालेलो नाही. गेल्या दहा वर्षांपूर्वीचा विचार करता नागरिकांमध्ये विम्याबाबतची जागरूकता वाढली आहे. या अगोदर विमा पॉलिसी काढताना माहिती किंवा जागरूकतेच्या अभावी ग्राहकांकडून कोणतीही चौकशी किंवा प्रश्न विचारले जात नव्हते. आता मात्र ग्राहक नक्कीच चौकस झाला आहे. विशेषत- मोदी सरकारने आणलेल्या जीवन ज्योती, अटल पेन्शन, आयुष्मान भारत यांसारख्या योजनांमुळे लोकांमध्ये ही जागरूकता आली आहे. मात्र, अजूनही विमा क्षेत्रात बरेच काम बाकी आहे. विम्याविषयी नागरिकांच्या मनात असलेले समज- गैरसमज दूर होणे आवश्‍यक आहे, जेणेकरून विमा घेताना ग्राहकाला त्यापासून मिळणारे फायदे माहिती होतील; तसेच  आर्थिक नियोजनाचा भाग म्हणून ते विम्याकडे पाहू लागतील.

सामान्य लोकांना अजूनही आर्थिक नियोजनात आयुर्विम्याचा समावेश करणे आवश्‍यक वाटत नाही. याबद्दल आपण काय सांगाल?
- विम्याचे फायदे समजावून सांगताना बऱ्याचदा चुकीच्या पद्धतीने सांगितले जातात. ते सकारात्मकरीत्या समजावून सांगण्यापेक्षा ग्राहकांच्या मनात जाणते किंवा अजाणतेपणी भीती निर्माण केली जाते. उदा. ग्राहकाला विमा विकताना ‘तुमचा अचानक मृत्यू ओढवला तर’ असे सांगून विम्याचे महत्त्व सांगण्यास सुरवात करण्यात येते. त्यामुळे साहजिकच ग्राहकांना विम्याची सकारात्मकता जाणवण्याऐवजी नकारात्मकतेची झालर जास्त वाटते. याऐवजी एजंट, विमा कंपन्या किंवा आणखी कोणी मध्यस्थांनी ग्राहकांच्या सर्व शंकांचे व्यवस्थित निराकरण करणे गरजेचे आहे, त्यामुळे योग्यरीतीने महत्त्व पटवून दिल्यास लोक विम्याकडे आर्थिक नियोजनाचा भाग म्हणून बघतील.  

आयुर्विमा खरेदीसाठी योग्य वय काय असते? पहिल्यांदा विमा घेताना कोणत्या प्रकारचा विमा घेतला पाहिजे?
- शुभस्य शीघ्रम! हेच त्याचे योग्य उत्तर आहे. कोणतेही चांगले काम लवकरात लवकर सुरू करणे आवश्‍यक असते. त्याचप्रमाणे विमा नसेल तर तो लवकर घेणे नक्कीच चांगले असते. आजच्या धावपळीच्या जगात विमा अतिशय महत्त्वाचा आहे, जेणेकरून एखादी दुर्दैवी घटना घडली, तर त्याचा आर्थिक भार तुमच्यावर पडणार नाही. तसेच, जर तुम्ही पहिल्यांदाच विमा घेणार असाल तर ‘टर्म इन्शुरन्स’ घेणे आवश्‍यक आहे. शिवाय, कमी वयात ‘टर्म इन्शुरन्स’ घेतल्यास कमीत कमी ‘प्रीमियम’ भरून मोठ्या रकमेचे ‘कव्हर’ मिळू शकते. तसेच, विमा घेतेवेळी विमा कंपनीकडून वैद्यकीय चाचण्या केल्या जातात. कमी वयात विमा घेतल्यास तुम्हाला कमी वैद्यकीय चाचण्यांना सामोरे जावे लागते. 

अनेक ग्राहक विम्याचा कालावधी संपण्याआधीच ‘प्रीमियम’ भरणे बंद करतात, असे का?
- विम्याविषयी जागरूकतेचा अभाव हेच कारण इथे अधोरेखित करता येईल. बऱ्याचदा आर्थिक वर्षाच्या शेवटी करबचतीचा लाभ घेता यावा यासाठी विमा घेतला जातो, त्यामुळे लोक काही कालावधीनंतर ‘प्रीमियम’ भरणे बंद करतात. त्याचबरोबर विमाधारकाच्या आयुष्यात आर्थिक अडचणी आल्यास सर्वांत अगोदर विमा पॉलिसीचा ‘प्रीमियम’ भरणे बंद केले जाते. तसेच, विम्याचा कालावधी मोठा असल्याने आपण नक्की काय उद्दिष्ट ठेवून विमा खरेदी केला होता, हेच लक्षात राहत नाही आणि तो आता उपयोगाचा नाही, असे समजून  ‘प्रीमियम’ भरणे थांबविले जाते. 

आजकाल विमा घेताना ‘टर्म इन्शुरन्स’ला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे, ते कशामुळे?
 : ‘टर्म इन्शुरन्स’ हा अत्यंत कमी आणि सामान्यांना परवडणाऱ्या प्रीमियमवर उपलब्ध होतो. शिवाय, कमी ‘प्रीमियम’ देऊन जास्तीत जास्त रकमेचे विमा कव्हर प्राप्त होते. शिवाय, आता बहुतांश ‘टर्म इन्शुरन्स’ हे ‘ऑनलाइन’ उपलब्ध आहेत, त्यामुळे लोक त्याबद्दल माहिती आणि फायदे समजून घेऊन ते करू शकतात. 

आयुर्विमा खरेदी करणे खरोखरच गरजेचे आहे का आणि असेल तर किती रकमेचा विमा घेतला पाहिजे?  
- आयुष्य चांगले आणि सुकर करण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करीत असतो. मात्र, सध्याच्या काळात असलेली अनिश्‍चितता किंवा आयुष्यात एखादा दुर्दैवी प्रसंग उद्‌भवल्यास त्याची झळ स्वत-बरोबरच कुटुंबाला बसत असते. त्यामुळे आपल्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सुरक्षित ठेवण्यासाठी आयुर्विमा खरेदी करणे आवश्‍यक आहे. विशेषत- कमी वयातच ही योजना घेतल्यास त्याचा दीर्घकालीन लाभ होतो. आयुर्विमा घेताना  एखादी व्यक्ती त्याच्या पगारातून स्वत-च्या गरजा आणि इतर खर्च भागवून कुटुंबासाठी जेवढी रक्कम संरक्षित करते, त्यावरून त्याचे आर्थिक मूल्य निश्‍चित करता येते. तसेच, नोकरी करीत असल्यास शिल्लक असलेल्या नोकरीच्या कार्यकाळाचा विचार करून किती रकमेचा आयुर्विमा खरेदी करायचा, ते निश्‍चित करता येईल. तसेच, वेळोवेळी घेतलेल्या विम्याच्या ‘कव्हर’चे पुनरावलोकन करणे आवश्‍यक आहे. एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न जसे वाढत जाईल, तसतसे वैद्यकीय किंवा चांगल्या जीवनमानामुळे त्याचे आयुष्यमानही वाढू शकते. त्यामुळे विम्याचे ‘कव्हर’देखील वाढविले पाहिजे.

(शब्दांकन - प्रवीण कुलकर्णी) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vighnesh Shahane CEO and Managing Director at IDBI Federal Life Insurance interview