हाती असुदे खेळते भांडवल!

हाती असुदे खेळते भांडवल!

आपण चांगला परतावा मिऴवण्यासाठी दीर्घकालीन गुंतवणूक पर्याय निवडतो. सर्व गुंतवणूक दीर्घकालीन पर्यायांमध्ये केल्यास रोजच्या खर्चांसाठी आवश्‍यक असणाऱ्या पैशांच्या उपलब्धतेवर त्याचा परिणाम होऊ शकतो. म्हणूनच दीर्घकालीन गुंतवणुकीबरोबर अल्पकाळात पैशांचे नियोजन आणि उपलब्धता याकडेदेखील लक्ष दिले पाहिजे. 

कॅश फ्लो स्टेटमेंट
सर्वप्रथम आपले स्वतःचे कॅश फ्लो स्टेटमेंट तयार करा. येणाऱ्या महिन्यातील येणी आणि देणी यांची मांडणी करून आपली संभाव्य आर्थिक परिस्थिती समजून घ्या.  येणारी रक्कम ही देय रकमेपेक्षा अधिक असेल तरच आपण गुंतवणुकीचा विचार करू शकतो. मात्र, आपली देणी ही येणाऱ्या रकमेपेक्षा अधिक असेल तर ते सत्य स्वीकारा. 

योग्य नियोजन
अल्पकाळात येणारे पैसे लवकरात लवकर वसूल करणे आणि अल्पकाळातील देण्याची रक्कम शक्‍य तेवढी पुढे ढकलणे, हे खेळत्या भांडवलाचे नियोजन यशस्वी करण्याचे मूलभूत सूत्र आहे. हे करत असताना वेळप्रसंगी थोडा तोटा सहन करावा लागला तरी ते योग्य ठरते. उदाहरणार्थ, आपली येणी वसूल करण्यासाठी थोडा ‘डिस्काउंट’ देऊन आपण ती लवकरात लवकर वसूल करू शकतो किंवा देय असलेल्या रकमेवर थोडे व्याज देऊन आपल्या देण्याची मुदत वाढवून घेऊ शकतो. असे करण्याने आपल्या खेळत्या भांडवलावरील ताण कमी होऊ शकतो. अर्थात ‘डिस्काउंट’ आणि व्याज या स्वरूपात होणारा तोटा मर्यादित असावा.

तोट्यातील गुंतवणुकीचा पुनर्विचार
सातत्याने तोट्यात चाललेल्या गुंतवणुकीचा पुनर्विचार करा. तोट्यातील गुंतवणूक खेळत्या भांडवलावर दोन प्रकारे नकारात्मक परिणाम करते. अशा गुंतवणुकीपासून परतावा मिळत नसल्यामुळे आपल्या उत्पन्नावर त्याचा परिणाम होतो आणि दुसरे म्हणजे या तोट्यातील गुंतवणुकीतील भांडवलाच्या रकमेचे बाजारमूल्यसुद्धा हळूहळू कमी होऊ शकते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कॅश इंजेक्‍शन
आवश्‍यकता भासल्यास अल्पकालीन कर्जाच्या स्वरूपात ‘कॅश इंजेक्‍शन’ घ्या; जेणेकरून आपली आर्थिक तब्येत सुधारण्यास मदत होते. अर्थात असे कर्ज घेताना त्यावरील व्याजदर, त्याचा हप्ता, परतफेडीची मुदत या सर्वांचा साधकबाधक विचार करावा.

ही नियमितपणे करण्याची प्रक्रिया आहे. केवळ आर्थिक अडचणीच्या वेळी त्यावर तोडगा शोधायचा प्रयत्न केला, तर त्याचा मोठा आर्थिक भुर्दंड बसू शकतो. खेळत्या भांडवलाचे नियोजन हे उद्योग-व्यवसायांबरोबरच वैयक्तिक आर्थिक नियोजनातसुद्धा आवश्‍यक आहे हे लक्षात ठेवावे.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


(लेखक ‘इंदिरा ग्लोबल बिझनेस स्कूल’चे संचालक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com