दरमहा 10 हजार रुपये पेन्शन हवीये?

मुकुंद लेले
Saturday, 21 March 2020

किमान आणि कमाल पेन्शनसाठीचा गुंतवणूक तक्ता

- काही महत्त्वाची वैशिष्ट्ये...

शेअरच्या भावात मोठी घसरण, म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीच्या मूल्यात घट आणि बॅंकेतील "एफडी'च्या व्याजदरात कपात झाल्याने सर्वसामान्य गुंतवणूकदार सध्या धास्तावलेले दिसतात. विशेषतः व्याजावर गुजराण करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना तर याची मोठी झळ बसताना दिसत आहे.

अशा मंडळींसाठी केंद्र सरकारच्या "सिनियन सिटीझन्स सेव्हिंग्ज स्कीम' (एससीएसएस) आणि प्रधानमंत्री वय वंदना योजना (पीएमव्हीव्हीवाय) या दोन योजना दिलासा देऊ शकतात. यापैकी प्रधानमंत्री वय वंदना योजनेवर आज एक नजर टाकूया. कारण या योजनेची वाढीव मुदत येत्या 31 मार्च रोजी संपणार आहे.

त्याआधी जे ज्येष्ठ नागरिक या योजनेत सहभागी होतील, त्यांना पुढील 10 वर्षे आजच्याच व्याजदराने (8 ते 8.30 टक्के) पेन्शनसारखी रक्कम हमखास मिळू शकते. एक व्यक्तीला पुढील 10 वर्षे दरमहा 10 हजारांपर्यंतच्या पेन्शनची हमी या योजनेतून मिळते आणि हेच त्याचे वैशिष्ट्य आहे.

कोणाला, किती गुंतवणूक करता येईल?

किमान वय ः 60 वर्षे पूर्ण
कमाल वय ः मर्यादा नाही.
योजनेची मुदत ः 10 वर्षे
किमान गुंतवणूक ः एका व्यक्तीला दीड लाख रुपये (मासिक पेन्शनसाठी)
कमाल गुंतवणूक ः एका व्यक्तीला 15 लाख रुपये (मासिक पेन्शनसाठी)
(महत्त्वाचा बदल ः पूर्वी एका कुटुंबासाठी 15 लाख रुपये ही मर्यादा होती.)
किमान पेन्शन ः 1 हजार रुपये
कमाल पेन्शन ः 10 हजार रुपये
व्याजदर ः 8.00 ते 8.30 टक्‍क्‍यांदरम्यान
पेन्शन देयता पर्याय ः मासिक, तिमाही, सहामाही, वार्षिक (थेट बॅंक खात्यात जमा)

किमान आणि कमाल पेन्शनसाठीचा गुंतवणूक तक्ता

देयता              किमान                             कमाल        
                  गुंतवणूक  --- पेन्शन                   गुंतवणूक   --- पेन्शन

वार्षिक         1,44,578 --- 12,000           14,45,784 --- 1,20,000
सहामाही      1,47,601  ---6,000              14,76,014  ---60,000
तिमाही       1,49,068 --- 3,000              14,90,684  ---30,000
मासिक      1,50,000  --- 1,000                  15,00,000  ---10,000

काही महत्त्वाची वैशिष्ट्ये...

- या योजनेला वस्तू व सेवाकरातून (जीएसटी) सूट देण्यात आली आहे. त्यामुळे गुंतवणुकीच्या रकमेवर "जीएसटी' लागू केला जात नाही.
- एका व्यक्तीच्या नावाने गुंतवणूक करून नॉमिनेशन करण्याची सुविधा आहे.
- योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर मूळ रक्कम आणि शेवटच्या पेन्शनची रक्कम गुंतवणूकदारास परत केली जाते.
- योजनेच्या काळात गुंतवणूकदाराचा मृत्यू झाल्यास नॉमिनी किंवा कायदेशीर वारसदारास मूळ रक्कम परत दिली जाते.
- योजनेतील गुंतवणुकीला तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर कर्ज घेता येऊ शकते. मूळ गुंतवणुकीच्या कमाल 75 टक्‍क्‍यांपर्यंत कर्ज मिळू शकते.

- गुंतवणूकदार किंवा त्याच्या जोडीदाराच्या गंभीर आजारपणासारख्याप्रसंगी या योजनेतून मुदतीआधी बाहेर पडण्याचा पर्याय उपलब्ध. अशा वेळी मूळ गुंतवणुकीच्या 98 टक्के रक्कम परत दिली जाते.
- योजनेतील गुंतवणुकीला कलम 80 सी खाली करवजावट मिळत नाही.
- योजनेतून मिळणारी पेन्शनची रक्कम सध्याच्या कायद्यानुसार करपात्र ठरते.
- ही योजना फक्त "एलआयसी'च्या माध्यमातून राबविली जाते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: want Rs 10 thousand per month as Pension know how to get this