डेट फंडावरील संकट कशामुळे?

Date-Fund
Date-Fund

एकीकडे कोविड-१९ चे संकट दिवसेंदिवस गंभीर रुप धारण करीत असताना, दुसरीकडे गुंतवणूक क्षेत्रातही चिंता वाढविणाऱ्या घटना घडताना दिसत आहेत. फ्रॅंकलिन टेम्पल्टन म्युच्युअल फंडाने गेल्या आठवड्यात रोखे (डेट) प्रकारातील सहा योजना बंद करण्याचा निर्णय घेतल्याने या क्षेत्रात खळबळ उडाली. ‘म्युच्युअल फंड सही है’च्या कॅम्पेनमुळे गेल्या काही वर्षांत भरभराटीस आलेल्या म्युच्युअल फंड उद्योगावर अचानक संशयाचे आणि संभ्रमाचे ढग दाटून आले. अशा फंड योजनांमध्ये गुंतवणूक केलेले गुंतवणूकदार धास्तावले. आपले पैसे बुडाले की काय, असा प्रश्‍न त्यांच्या मनात साहजिकच निर्माण झाला. यानिमित्ताने नेमके काय झाले आहे, त्याचा काय परिणाम होणार आहे, हे जाणून घेऊया.

परिणाम काय?

  • या सर्व डेट प्रकारातील योजना होत्या. या योजनांतील निधी कॉर्पोरेट बाँड्‌स, सिक्‍युरिटीज, कमर्शियल पेपर, सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट्‌स अशा साधनांमध्ये गुंतविला जातो. शेअर्समध्ये नाही, हे लक्षात घ्यायला हवे.
  • या साधनांतील सर्वच पेपर ‘एएए’ सारखे सर्वोच्च पतमानांकीत नाहीत. ‘एए’ किंवा ‘एए-’ अशाही पतमानांकनाचे पेपर त्यात काही प्रमाणात आहेत. म्हणजेच त्यात जोखीम जास्त आहे. पण गुंतवणूकदारांना अधिक परतावा मिळण्याची शक्‍यताही जास्त असते. कारण ‘जेथे जोखीम जास्त, तेथे परतावा जास्त’ असे सूत्र असतेच. 
  • अल्ट्रा शॉर्ट बाँड फंडाने तर सर्व स्पर्धकांना मागे टाकून वार्षिक ७.७ टक्के परतावा दिला होता.
  • या योजना बंद केल्या याचा अर्थ या योजनेत नव्याने कोणी पैसे गुंतवू शकणार नाही आणि त्यात गुंतविलेले पैसे काढून घेऊ शकणार नाही. एकप्रकारे गुंतवणूकदारांच्या हितासाठी हा निर्णय घेतला गेला.

नक्की काय झाले?

  • देशातील नवव्या क्रमांकाची मोठी म्युच्युअल फंड कंपनी असलेल्या ‘फ्रॅंकलिन टेम्पल्टन’कडून गेल्या आठवड्यात सहा डेट योजना बंद करण्याची अचानक आणि अभूतपूर्व घोषणा. त्यात फ्रॅंकलिन इंडिया लो ड्युरेशन फंड, डायनॅमिक ॲक्रुअल फंड, क्रेडिट रिस्क फंड, शॉर्ट टर्म इन्कम प्लॅन, अल्ट्रा शॉर्ट बाँड फंड आणि उन्कम ऑपॉच्युर्निटीज फंड यांचा त्यात समावेश.
  • या सर्व योजनांची एकूण व्यवस्थापनाखालील मालमत्ता (एयूएम) जवळजवळ ३० हजार कोटी रुपये. हा आकडा फ्रॅंकलिन टेम्पल्टनच्या एकूण ‘एयूएम’च्या एक चतुर्थांश इतका.

असे का केले?

  • ‘कोविड-१९’मुळे सध्या लॉकडाउन सुरू आहे. कंपन्या बंद असल्याने त्यांच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. साहजिकच डेट योजनांतील निधी ज्या कंपन्यांच्या विविध साधनांमध्ये गुंतविला गेला आहे, त्याचे व्याज वा मुदतपूर्तीची रक्कम वेळेवर परत येईल की नाही, अशी भीती निर्माण झाली आहे. 
  • धोक्‍याची जाणीव आधीच झालेल्या संस्थात्मक गुंतवणूकदार तसेच अतिउच्च उत्पन्न गटातील (अल्ट्रा एचएनआय) या डेट योजनांतून बाहेर पडण्याचा सपाटा लावला. दुसरीकडे घसरलेल्या डेट साधनांची बाजारातील ‘लिक्विडीटी’ कमी झाली. 
  • डेट योजनांतील गुंतवणूक मिळेल त्या किमतीला विकून पैसे देणे किंवा तात्पुरत्या काळासाठी या योजना खरेदी-विक्रीसाठी बंद करणे असे दोन पर्याय होते. दुसऱ्या पर्यायामुळे योजनांच्या ‘एनएव्ही’त आणखी घसरण होणार नाही आणि भविष्यात परिस्थिती सुधारली आणि संबंधित डेट साधनांचे पैसे व्यवस्थित आले तर गुंतवणूकदारांचे संभाव्य नुकसान टळेल, या हेतूने या योजना तात्पुरत्या काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेला असणार.

‘गुंतवणूकदारांनी घाबरण्याचे कारण नाही’
फ्रॅंकलिन टेम्पल्टन म्युच्युअल फंडाने त्यांच्या रोखे (डेट) प्रकारातील सहा योजना गुंडाळण्याच्या घोषणेने म्युच्युअल फंड विश्वात मोठी खळबळ उडाली, यात आश्‍चर्य वाटत नाही. ‘कोविड-१९’च्या भीतीने जगभरातील अर्थव्यवस्था ठप्प झालेली असताना आणि परदेशी वित्तीय संस्था भारतातून आपली गुंतवणूक काढून घेत असतानाच, सुमारे ३० हजार कोटी रुपयांचा ‘एयुएम’ असलेल्या सहा योजना एकाएकी बंद झाल्यामुळे आपली रक्कम बुडाली, असे वाटून अनेकजण हवालदिल झाले आहेत. परंतु, रोखे बाजारातील या अभूतपूर्व परिस्थितीत जर एकाच वेळी अन्य म्युच्युअल फंडांच्या डेट योजनेतील रक्कम एकदम काढायला सुरवात केली तर त्या फंडांची स्थितीसुद्धा ‘फ्रॅंकलिन’सारखी होऊ शकते. असे होऊ नये यासाठी रिझर्व्ह बॅंकेने म्युच्युअल फंड कंपन्यांसाठी ५० हजार कोटी रुपयांची विशेष कर्ज देण्याची सोय बॅंकांमार्फत उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी घाबरण्याचे कारण नाही आणि गरज नसेल तर डेट किंवा इक्विटी योजनेतील रक्कम काढू नये.
- अरविंद परांजपे, ज्येष्ठ म्युच्युअल फंड सल्लागार

‘सर्व पैसे बुडणार नाहीत’
फ्रॅंकलिन टेम्पल्टनच्या योजनांतील ४० टक्के गुंतवणूक चांगल्या पतमानांकीत साधनांमध्ये आहे आणि त्यांची विक्री होऊ शकते. कोणत्याही कंपनीच्या साधनाने ‘डिफॉल्ट’ केलेला नाही. अगदी वाईट परिस्थितीचा विचार केला तरी १० टक्‍क्‍यांपर्यंत नुकसान होऊ शकते. परंतु, तेही होऊ नये, यासाठी फ्रॅंकलिन टेम्पल्टन आटोकाट प्रयत्न करेल. त्यामुळे या योजनांतील गुंतवणूकदारांना पैसे मिळायला थोडा वेळ लागू शकतो. पण  सर्व पैसे बुडणार नाहीत. या घटनेमुळे सर्वच कंपन्यांच्या डेट फंडातून पैसे काढण्याचा सपाटा सुरू झाला आहे. त्यांची ‘क्रेडिट क्वॉलिटी’ किंवा ‘लिक्विडीटी’ न पाहताच लोक पैसे काढून घेत आहेत. परंतु, तसे घाबरून जाण्याचे कारण नाही. या क्षेत्रातील तज्ज्ञ सल्लागारांची मदत घेऊनच गुंतवणुकीचे निर्णय घेणे हिताचे असते, हे यानिमित्ताने अधोरेखित होते.
- भूषण महाजन, ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com