esakal | मेडिक्लेम गरजेचा का आहे? तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे

बोलून बातमी शोधा

Mediclaim
मेडिक्लेम गरजेचा का आहे? तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे
sakal_logo
By
नामदेव कुंभार

दुपारी मित्राचा फोन आला. गप्पागोष्टी अन् विचारपूस झाल्यानंतर दबक्या आवाजात तो म्हणाला, "मला काहीतरी महत्वाचं विचारायचं आहे. खूप दिवसांपासून मनात प्रश्नांचा भडीमार होतोय. तुझ्यासाठी हे प्रश्न अतिशय बालबोध असतील, पण मला त्या सर्वांची उत्तरं हवीत." मित्रानं असा अचानक प्रश्न विचारल्यामुळे सुरुवातील अचंबित झोलो होतो. पण पुढच्या क्षणी धीर देत म्हणालो," आधी तू शांत हो त्यानंतर प्रश्न विचार. तुझ्या मनातील वादळ शांत करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन".

मित्र:- मेडिक्लेम (आरोग्य विमा) खरंच गरेजचा आहे का?

मी:- हो नक्कीच. आरोग्य विमा म्हणजे वैद्यकीय भरपाई विमा योजना. आरोग्य विमा हा फायद्यासाठी नसून भरपाईसाठी असतो. अचानक आलेल्या आजारपणामुळे किंवा अपघातामुळे होणाऱ्या खर्चाची तरतुद किंवा भरपाईचे उत्तम असे साधन आहे. अचानक दवाखान्यात भरती व्हावे लागल्यास खर्चाची पूर्व कल्पना आणि पुरेशी आर्थिक तरतूद केलेली नसल्याने प्रचंड आर्थिक आणि मानसिक ताण येतो. त्यासाठी आरोग्य विमा घेऊन ठेवणे कधीही गरजेचे.

मित्र:- मेडिक्लेम केंव्हा घेऊ शकतो आणि कोणी घ्यावा?

मी:- खरा तर आरोग्य विमा हा सगळयांनीच घेतला पाहिजे आणि त्याचं वेळोवेळी नुतनीकरण केलं पाहिजे. जेंव्हा आपल्याला आरोग्य विमाची आवश्यकता नाही तेंव्हा तो घेतला पाहिजे. कारण जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा कदाचित आरोग्य विमा मिळणार नाही, आणि जरी मिळाला तरी त्याचा लगेच फायदा होणार नाही. कारण पूर्व आजारांना २ किंवा ४ वर्षांचा कालावधी जावा लागतो मगच त्या आजाराचा खर्च मिळतो.

मित्र :- मेडिक्लेम कोणता घ्यावा? तो घेताना काय काळजी घ्यावी?

मी:- IRDAI म्हणजेच विमा नियामक आणि विकास प्राधिकरण. ही स्वायत्त आणि विधी नियमन आणि प्रोत्साहन देण्याचे कार्य करणारी वैधानिक संस्था आहे. सध्या सर्व विमा कंपनी ह्या नियामक संस्थाच्या देखरेखी खाली आहेत. पॉलिसीधारकांच्या हिताचे रक्षण करणे हा मुख्य उद्देश ह्या संस्थाचा आहे . त्यामुळे बाजारात असलेल्या कोणत्याही कंपनीचा विमा घेणे योग्यच आहे. तरी पण आपल्याला हवे असणारे सर्व फायदे त्यामध्ये आहेत का? आणि वयानुसार किती पटीने विमा घेतला पाहिजे हे सुनिश्चित करूनच घेणे. विमा उतरवण्यापूर्वी विमा कंपनीला प्रमाणिक प्रस्ताव देणे अत्यंत महत्त्वाचे असते. तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत या प्रस्तावात दिलेल्या माहितीनुसारच कंपनी तुमच्यासाठी विमा योजना निश्चित करते. यामध्ये तुम्हाला होऊ शकणारे संभाव्य आजार, त्यासाठी येणारा खर्च आणि त्यासाठी आकारला जाणारा हप्ता, या गोष्टींचा यामध्ये समावेश असतो. म्हणूनच विमा उतरवताना सध्या असलेले आजारच नव्हे, तर पूर्वी झालेल्या आजारांची माहितीदेखील देणे महत्त्वाचे असते.

मित्र:- मेडिक्लेमचा दावा कसा आणि कधी करावा?

मी:- आरोग्य विम्याचा दावा दोन प्रकारे करता येतो..कॅशलेस(२४ तासा पेक्षा अधिक कालावधी साठी जर ऍडमिट करावे लागेल तर ही सुविधा प्रापत करता येते) किंवा रिएम्बर्समेंट (प्रतिपूर्ती). कॅशलेससाठी दाव्यामध्ये विमा कंपनी आणि संबंधित हॉस्पिटल एका नेटवर्कचा भाग असतात. त्याद्वारे संबंधित हॉस्पिटल विमाधारकाचे वैद्यकीय अहवाल आणि बिल संबंधित विमा कंपनीला पाठवते. यामध्ये विमाधारकाला फार काही करावे लागत नाही. प्रतिपूर्तीच्या दाव्यासाठी मात्र, विमाधारकाला दाव्याचा फॉर्म भरणे, त्यात वैद्यकीय उपचारांबाबतचे सर्व तपशील अचूक भरणे, विविध तपासण्यांचे मूळ अहवाल, मूळ बिले आणि अन्य आवश्यक कागदपत्रे जोडून ती विमा कंपनीकडे सादर करावी लागतात. त्याआधारेच विम्याचा दावा मंजूर केला जातो. दावा करण्याआधी आपल्या योजनेच्या अटींनुसार यात कोणत्या बाबी समाविष्ट आहेत, याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. शक्यतो दावा हा लगेच करावा किंवा घटनेच्या कमीतकमी ७ दिवसांमध्ये केल्यास उत्तम. प्रत्येक कंपनीनं टोल फ्री क्रमांक दिला आहेच. त्याशिवाय मोबाईल अॅप्लिकेशनद्वारेही नोंद करायची सुविधा उपलब्ध करुन दिली.

मित्र:- मेडिक्लेम असेल तर कोणते खर्च मिळतात?

मी:- काही कंपन्या सर्व खर्च देतात पण मुळात व्यवस्थापन खर्च सोडून खालील सर्व खर्च मिळतात.

खोलीभाडे ,नर्सिंग चार्जेस,डॉक्टर तपासणी चार्जेस,डॉक्टर फेरी चार्जेस,आय सी यू चार्जेस,एन आय सी यू चार्जेस,गोळ्या, औषधे- ड्रग्स , सलाइन खर्च,सोनोग्राफी खर्च,एम आर आय खर्च,सिटी स्कॅन खर्च (सिटी स्कॅन).रक्त लघवी तपासणी खर्च,रक्त पिशवी खर्च,विशेष लॅबोरेटरी तपासण्याचे खर्च,रुग्णवाहिका खर्च,ओपरेशन थेटर चे भाडे खर्च ,डॉक्टर सर्जरी खर्च असे व आणखी इतर खर्च मिळतात. मुळात आपल्या विम्यामध्ये विविध रायडर असतात त्या योजनेप्रमाणे खर्च मिळतात.

मित्र;- कोरोना मेडिक्लेममध्ये आहे का ?

मी;- होय कोरोना किंवा त्यामुळे झालेला रुग्णालयातील खर्च पुर्णपणे मिळतो. अश्यातच IRDAI ने एक परिपत्रकात म्हटले आहे की, सर्व कंपनीने कोरोनाच्या उपचारासाठी कॅशलेस सेवा देणे अनिवार्य आहे. त्यामुळे सध्या असलेल्या महामारीच्या काळात आरोग्य विमा घेणे गरजेचे आहे.

कुठलाही इन्शुरन्स नसला तरी चालतो पण "आरोग्य विमा हा प्रथम काढावा. आरोग्य विमा असल्यास, आपण निश्चितपणे कुठल्याही प्रकारच्या हॉस्पिटलच्या खर्चाला सामोरे जाऊ शकतो. हॉस्पिटलमध्ये डिपॉझिट भरण्याची शक्यतो गरज पडत नाही. बँक, खाजगी सावकाराकडून कर्ज घ्यायची गरज नाही. घर,गाडी,जमीन,प्लॉट,फ्लॅट, विकण्याची वेळ येत नाही. चांगल्या रुग्णालयात ताठ मानेने उत्तम प्रकारची सेवा रुग्णाला घेता येते. नातेवाईक मित्रमंडळी यांच्याकडे हात पासरण्याची वेळ येत नाही. भारतात कोठेही मान्यताप्राप्त रुग्णालयात उपचारासाठी दाखल होता येते. म्हणूनच वेळ असतानाच आरोग्य विमा घेणे फायद्याचे आहे. कारण सध्या ही काळाची गरज आहे.

मित्र:- खरंच आज मला आरोग्य विमा बद्दलचे असेलेले अधिकतर पुर्वग्रह दूर झालेत. मुळात विमा म्हटलं की बऱ्याचशा चुकीच्या समजुती आहेत. योग्य ती माहिती आणि निर्देशन देणारी व्यक्ती मिळाली तर उत्तम.

मी:- विम्याबद्दल भारतीयांच्या मनात खूप गैरसमज आहेत. पण काळानुरुप त्यामध्ये बदल होताना दिसतोय. आपल्यासारखे तरुण आणि ज्याला खर्चाचा अनुभव आलाय ते विम्याबद्दल आग्रही आहेत. तुझ्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली असल्यास संपूर्ण परिवारासाठी आरोग्य विमा घेशील.

- प्रितीष किशोर गोविंदपुरकर, pritishkg@yahoo.com (लेखक पुण्यातील केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनीमध्ये क्लस्टर हेड या पदावर कार्यरत आहेत.)