शेअर बाजारात तेजी अवतरली; सेन्सेक्‍समध्ये 2,476, तर निफ्टीमध्ये 708 अंशांची वाढ 

पीटीआय
Wednesday, 8 April 2020

जागतिक शेअर बाजारामधून मिळालेल्या सकारात्मक संकेतानंतर भारतीय शेअर बाजारात मंगळवारी त्याचे पडसाद उमटले.

मुंबई - जागतिक शेअर बाजारामधून मिळालेल्या सकारात्मक संकेतानंतर भारतीय शेअर बाजारात मंगळवारी त्याचे पडसाद उमटले. गुंतवणूकदारांनी चौफेर खरेदी केल्याने दोन्ही मुख्य निर्देशांक वधारून बंद झाले. दिवसाअखेर मुंबई शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्‍स 2 हजार 476 अंशांनी वधारून 39 हजार 67 अंशांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक निफ्टीमध्ये 708 अंशांची वाढ झाली. तो 8 हजार 792 अंशांवर स्थिरावला. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

प्रामुख्याने अमेरिका, इटली आणि स्पेन या देशांमधील नव्याने कोरोनाने बाधित होणाऱ्यांची संख्या आणि मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या कमी होत असल्याने जागतिक गुंतवणूकदारांना आशेचा किरण दिसत आहे. परिणामी अमेरिका, युरोपासाहित आशियाई शेअर बाजारांमध्ये तेजी दिसून आली. गुंतवणूकदारांच्या चौफेर खरेदीमुळे क्षेत्रनिहाय पातळीवर बीएसई आणि एनएसईवरील सर्वच निर्देशांक तेजीत होते. यामध्ये बॅंकिंग, फार्मा, ऑटो, एनर्जी आणि टेलिकॉम निर्देशांक सर्वाधिक वधारले होते. 

सेन्सेक्‍सच्या मंचावर सर्व प्रमुख 30 कंपन्यांचे शेअर वधारले होते. यात इंडसइंड बॅंक (25 टक्के), ऍक्‍सिस बॅंक (19.41), महिंद्रा अँड महिंद्रा (13.64), आयसीआयसीआय बॅंक (13.31), हिंदुस्थान युनिलिव्हर (13.69) आणि मारुती सुझुकीचे (12.82) शेअर सर्वाधिक वधारले. 

गुंतवणूकदार मालामाल 
शेअर बाजारात आलेल्या तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या भांडवलात 7.69 लाख कोटींची भर पडली आहे. मुंबई शेअर बाजारातील कंपन्यांचे बाजारभांडवल 108.37 लाख कोटींवरून दिवसभरात 116.36 लाख कोटी रुपयांवर पोचले आहे. मंगळवारी आलेल्या तेजीमुळे सुमारे 453 कंपन्यांच्या शेअरला "अप्पर सर्किट' लागले. 

उच्चांकी पातळीपासून 27.12 टक्के खाली 
सेन्सेक्‍स अजूनही वर्षाच्या सुरुवातीला असलेल्या उच्चांकी पातळीपासून 27.12 टक्के (11,186 अंश) खाली आहे, तर निफ्टीदेखील याच कालावधीत 27.75 टक्के (3,376) गमावले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: World stock markets received a positive signal from the Indian stock market