जेटलींमुळेच भारतात आर्थिक मंदी; भाजप खासदाराची कबुली

वृत्तसंस्था
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

अरुण जेटली यांच्या कार्यकाळात स्वीकारलेल्या चुकीच्या धोरणांमुळेच अर्थव्यवस्था मंदावली आहे, अशी टीका खासदार सुब्रमण्यन स्वामी यांनी केली आहे

पुणे: माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या कार्यकाळात स्वीकारलेल्या चुकीच्या धोरणांमुळेच अर्थव्यवस्था मंदावली आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेतील खासदार सुब्रमण्यन स्वामी यांनी केली आहे.  'मला वाटतं अरुण जेटली यांच्या कार्यकाळात राबवलेल्या चुकीच्या धोरणांमुळेच ही मंदी आली आहे. तीच काही चुकीची धोरणे अजूनही तशीच राबविली जात आहेत. सध्या सरकारकडून मोठ्या प्रमाणावर आकारण्यात येणाऱ्या करांचाही त्यात समावेश आहे.त्याचबरोबर रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्यावरही स्वामींनी निशाणा साधला आहे. राजन यांनी व्याजदर वाढवले होते त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर आता दिसून येतो आहे. 

रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी त्यांच्या कार्यकाळात वाढवलेले व्याजदर हेही मंदीसाठी कारणीभूत आहे', असे वक्तव्य स्वामी यांनी केले आहे. केंद्र सरकारने अनुच्छेद 370 रद्द करण्याचा निर्णय घेतल्याच्या पार्श्वभूमीवर स्वामी बोलत होते. अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्याची गरज आहे. सरकारने अनुच्छेद 370 रद्द करण्याच्या संदर्भात माझे मत विचारात घेतले होते मात्र अर्थव्यवस्थेच्या आघाडीवर माझा कोणताही सल्ला घेण्यात आला नव्हता. 

अर्थव्यवस्थेला प्राधान्यक्रम दिलाच पाहिजे. राजकीय निर्णय आणि आर्थिक धोरणे दोन्हीही राष्ट्रबांधणीसाठी महत्त्वाची आहेत, असेही पुढे स्वामी म्हणाले. थोरले बाजीराव पेशवे यांच्या 319व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमासाठी स्वामी पुण्यात आले होते. अरुण जेटलींना अर्थशास्त्र समजत नाही अशीही टीका त्यांनी याआधी केली होती. सध्या जेटली (वय 66) सध्या प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणास्तव दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असून ते आयसीयुमध्ये आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wrong policies adopted during tenure of Arun Jaitley, reasons for slowdown, says BJP MP Subramanian Swamy