येस बॅंकेला २,६२९ कोटींचा नफा

पीटीआय
Thursday, 7 May 2020

येस बॅंकेने मार्चअखेर सरलेल्या तिमाहीत  २,६२९ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे. बॅंकेने वादग्रस्तरित्या बॉंड गुंतवणूकदारांची गुंतवणूक निकाली काढल्याने बॅंकेला मिळालेल्या ६,२०० कोटी रुपयांमुळे २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत बॅंकेला नफा झाला आहे. जर बॉंडच्या गुंतवणूकीसंदर्भात येस बॅंकेने हा निर्णय घेतला नसता तर मार्चअखेर बॅंकेला ३,६६८ कोटी रुपयांचा तोटा नोंदवावा लागला असता.

येस बॅंकेने मार्चअखेर सरलेल्या तिमाहीत  २,६२९ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे. बॅंकेने वादग्रस्तरित्या बॉंड गुंतवणूकदारांची गुंतवणूक निकाली काढल्याने बॅंकेला मिळालेल्या ६,२०० कोटी रुपयांमुळे २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत बॅंकेला नफा झाला आहे. जर बॉंडच्या गुंतवणूकीसंदर्भात येस बॅंकेने हा निर्णय घेतला नसता तर मार्चअखेर बॅंकेला ३,६६८ कोटी रुपयांचा तोटा नोंदवावा लागला असता. 

* मार्चअखेर बॅंकेला  २,६२९ कोटी रुपयांचा निव्वळ नफा
* २०१९-२० या आर्थिक वर्षात बॅंकेला एकूण १६,४८१ कोटी रुपयांचा तोटा
* बॅंकेच्या एकूण थकित कर्जाचे प्रमाण १६.८० टक्के

येस बॅंक आर्थिक संकटात सापडल्यानंतर स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील बॅंकांच्या गटाने येस बॅंकेत गुंतवणूक केली आहे. डिसेंबर २०१९ अखेर येस बॅंकेला १८,५६० कोटी रुपयांचा तोटा झाला होता. तर मार्च२०१९ अखेर येस बॅंकेला १,५०६ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. येस बॅंकेने अतिरिक्त टिअर-१ बॉंडधारकांच्या ८,४१९ कोटी रुपयांच्या गुंतवणूकीसंदर्भात घेतलेल्या निर्णयामुळे बॅंकेला मार्च२०२०अखेर नफ्याची नोंद केला होता. 

२०१९-२० या आर्थिक वर्षात येस बॅंकेला एकूण १६,४८१ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. तर त्याआधीच्या आर्थिक वर्षात बॅंकेने १,७२० कोटी रुपयांचा नफा नोंदवला होता. 

केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंकेने ५ मार्चला बॅंकेची आर्थिक स्थिती संकटात सापडल्यामुळे येस बॅंकेवर निर्बंध लादले होते. त्यानंतर स्टेट बॅंक आणि इतर खासगी बॅंकांनी येस बॅंकेत गुंतवणूक केल्यानंतर येस बॅंकेच्या नव्या संचालक मंडळाची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर येस बॅंकेवरील निर्बंध रिझर्व्ह बॅंकेने उठवले होते आणि बॅंकेचे नियमित कामकाज सुरू झाले होते. 

सध्या येस बॅंकेच्या संचालक मंडळावर स्टेट बॅंकेचे नियंत्रण आहे. येस बॅंकेचे नेतृत्व स्टेट बॅंकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत कुमार करत आहेत. मार्चअखेर येस बॅंकेच्या एकूण थकित कर्जाच्या प्रमाणात थोडी सुधारणा झाली आहे. बॅंकेच्या एकूण थकित कर्जाचे प्रमाण १६.८० टक्के इतके आहे. डिसेंबर २०१९ अखेर येस बॅंकेच्या एकूण थकित कर्जाचे प्रमाण १८.८७ टक्के इतके होते. 

चौथ्या तिमाहीत बॅंकेच्या निव्वळ व्याजातून मिळणाऱ्या उत्पन्नात १९.६ टक्क्यांची वाढ होत ते १,२७४ कोटी रुपयांवर पोचले आहे. तर व्याजाव्यतिरिक्त उत्पन्न १२.३ टक्क्यांनी वाढून ५९७ कोटी रुपयांवर पोचले आहे. बॅंकेकडील भांडवलाच्या उपलब्धतेचे प्रमाण ३१ मार्चअखेर ८.५ टक्के इतके आहे. 

आर्थिक संकटात सापडलेल्या येस बॅंकेचे कोसळणे थांबवण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने निर्बंध लादून त्यानंतर येस बॅंक पुनर्रचना योजना २०२० अंमलात आणली होती. त्या योजनेअतंर्गत स्टेट बॅंक आणि इतर बॅंकांच्या गटामार्फत येस बॅंकेत १०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली होती. स्टेट बॅंकेसह आयसीआयसीआय बॅंक, अॅक्सिस बॅंक, कोटक महिंद्रा बॅंक, आयडीएफसी फर्स्ट बॅंक, बंधन बॅंक, फेडरल बॅंक आणि एचडीएफसी यांनी येस बॅंकेत गुंतवणूक केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yes bank reports profit of 2,629 crore