'28 नोव्हेंबर पासून एसबीआयचे एटीएम कार्ड होणार बंद'

वृत्तसंस्था
शनिवार, 24 नोव्हेंबर 2018

जर तुम्ही अजूनही मॅग्नेटिक स्ट्रीप (चुंबकीय पट्टी) असलेले कार्ड वापरात असाल तर ते लवकरच 'ईएमव्ही' कार्डाच्या माध्यमातून बदलून घेणे गरजेचे आहे अन्यथा येत्या 28 नोव्हेंबर पासून तुमचे डेबिट कार्ड बंद करण्यात येणार आहे. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना अशा प्रकारचा मेसेज मोबाईलवर पाठवून 'अलर्ट' करण्यात येत आहे. 

नवी दिल्ली- जर तुम्ही अजूनही मॅग्नेटिक स्ट्रीप (चुंबकीय पट्टी) असलेले कार्ड वापरात असाल तर ते लवकरच 'ईएमव्ही' कार्डाच्या माध्यमातून बदलून घेणे गरजेचे आहे अन्यथा येत्या 28 नोव्हेंबर पासून तुमचे डेबिट कार्ड बंद करण्यात येणार आहे. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना अशा प्रकारचा मेसेज मोबाईलवर पाठवून 'अलर्ट' करण्यात येत आहे. 

'ग्राहकांना चांगली सेवा आणि सुरक्षा देण्यासाठी बँकेकडून हे पाऊल उचलण्यात आलं आहे. 28 नोव्हेंबर 2018 पासून SBI चं मॅजिस्ट्रिप डेबिट कार्ड ब्लॉक होईल. तुमच्या पत्त्यावर पाठवण्यात आलेलं ईएमव्ही कार्ड लवकर सुरू करा,' असं SBI ने पाठवलेल्या मेसेजमध्ये म्हटलं गेलं आहे.

भारताची मध्यवर्ती बँक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) या संदर्भातील एक परिपत्रक जाहीर केले असून, ज्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डवर मॅग्नेटिक स्ट्रीप (चुंबकीय पट्टी) आहे अशी कार्ड 31 डिसेंबर 2018 पर्यंत 'ईएमव्ही' कार्डाच्या माध्यमातून बदलून देण्यास भारतातील सर्व बँकांना सांगण्यात आले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हे कार्ड अधिक सक्षम असणार आहे. 'स्किमिंग किंवा क्लोनिंग'च्या माध्यमातून होत असणाऱ्या गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. 

'ईएमव्ही' कार्डविषयी
ईएमव्ही म्हणजे युरो-पे, मास्टरकार्ड आणि व्हिसा. म्हणजेच तीन स्वतंत्र कंपन्यांच्या नावांची आद्याक्षरे घेऊन हे नाव देण्यात आले आहे. याला 'चिप कार्ड'  किंवा 'चिप आणि पिन' कार्ड असे देखील संबोधले जाते. 

सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हे कार्ड अधिक सक्षम असणार आहे. 'पॉईंट ऑफ सेल (पीओएस)' वर एखादा व्यवहार करताना हे कार्ड स्वाईप केल्यास तुम्हाला 'पिन' टाकणे बंधनकारक आहे. यामुळे व्यवहाराला अधिक संरक्षण दिले जाणार आहे. जुन्या म्हणजे मॅग्नेटिक स्ट्रीप असलेल्या कार्डवर पिन टाकणे गरजेचे नव्हते. 

सर्वात महत्वाचे म्हणजे, हे कार्ड 'स्किमिंग किंवा क्लोनिंग' प्रतिबंधित असल्याने या कार्डाचे 'डुप्लिकेट' बनवून व्यवहार करता येत नाही. (डेबिट कार्डाचे क्लोनिंग करून नुकताच झालेले कॉसमॉस बॅंकेतील हॅकिंग यासारख्या बाबींना यामुळे आळा बसणार आहे.)     

जगभरात डेबिट किंवा क्रेडिट कार्डचे क्लोनिंग करून गैरव्यवहार करण्याचे प्रकार वाढले आहेत. कारण, हॅकर्सने ज्या ठिकाणी क्लोनिंग करणारे सॉफ्टवेअर अपलोड केले आहे त्या ठिकाणी मॅग्नेटिक स्ट्रीप असलेले कार्ड वापरल्यास ग्राहकाची सर्व 'स्टॅटिक' माहिती हे सॉफ्टवेअर कॉपी करून घेते व त्याच्या मदतीने डुप्लिकेट कार्ड बनविणे सोपे जाते. मात्र, ईएमव्ही कार्ड मध्ये ग्राहकाच्या स्टॅटिक माहितीऐवजी डायनॅमिक माहितीचा वापर असल्यामुळे डुप्लिकेट कार्ड्स बनविणे अवघड जाणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Your Sbi Debit Card Will Stop Working From 28 November