β बांगलादेशचा प्रवास वहाबी अंध:काराकडे

β बांगलादेशचा प्रवास वहाबी अंध:काराकडे

बांगलादेशची प्रतिमा ही सर्वसमावेशक, लोकशाहीवादी राज्याची असल्याची येथील सरकारची भूमिका असली; तरी या देशाचा धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाविरुद्धच्या दिशेकडील प्रवास हा कितीतरी आधीच सुरु झाला आहे. आता त्याची अभिव्यक्‍ती अधिक प्रखरपणे दिसून येते आहे, इतकेच म्हणता येईल. 

बांगलादेशची राजधानी असलेल्या ढाकामधील प्रसिद्ध "होली आर्टिसन कॅफे‘वर काही दिवसांपूर्वीच घडविण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यांत 20 नागरिकांना ठार करण्यात आले. बांगलादेशमधील अशा स्वरुपाचा हा पहिलाच हल्ला असल्याने येथे खळबळ उडाली आहे. एकंदरच बांगला जनमानस ढवळून काढणाऱ्या या हल्ल्याचे पडसाद या देशामधील वैचारिक विश्‍वामध्ये तर जाणवले आहेतच; शिवाय या नव्या हल्ल्याने येथील शेख हसीना यांच्या सरकारपुढील इस्लामी मूलतत्त्ववादाचे आव्हान अधिक बिकट झाल्याचेही स्पष्ट झाले आहे. अवघ्या चार दशकांपूर्वी "एक धर्म एक राष्ट्र‘ अशा वैचारिक मांडणीस पूर्णपणे नाकारुन बंगाली अस्मितेवर आधारलेल्या राष्ट्रवादाचा पुरस्कार केलेल्या बांगलादेशमध्ये या नवा हल्ल्यासहच गेल्या काही महिन्यांत अधिकाधिक प्रखर होणाऱ्या इस्लामी मूलतत्त्ववादाच्या प्रभावामुळे इतिहासाचे एक वर्तुळ पूर्ण झाले आहे. "आमार शोनार बांगला..‘ च्या स्वप्नवादाची वाटचाल आता वहाबी मूलतत्त्ववादाच्या स्फोटक परिस्थितीकडे सुरु झाली असल्याचे या नव्या हल्ल्यामधून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. येथील हाताच्या बोटावर मोजता येतील अशा काही विचारवंतांच्या मनामधील ही भीती "ढाका ट्रिब्यून‘ यांसारख्या माध्यमांमधून व्यक्‍त होते आहे; परंतु बांगलादेशमधील सध्याची परिस्थिती पाहता हे आक्रंदन अरण्यरुदन ठरण्याची शक्‍यता जास्त आहे. बांगलादेशच्या सध्याच्या राजकीय सामाजिक परिस्थितीसंदर्भात अनेक प्रश्‍न उपस्थित करता येणे शक्‍य आहे; मात्र तत्पूर्वी या नव्या हल्ल्यासंदर्भातील माहिती पाहणे आवश्‍यक आहे. 

बांगलादेशमध्ये याआधी दहशतवादी हल्ले घडविण्यात आले असले; तरी नागरिकांना ओलिस धरले जाण्याचा प्रकार हा या देशात प्रथमच घडला आहे. दहशतवाद्यांनी ओलिस धरलेल्या नागरिकांची देश व धर्मावर आधारित स्पष्ट विभागणी केली. इस्लामचा पवित्र धर्मग्रंथ असलेल्या कुराणमधील आयतींचे उच्चारण करण्याची "आज्ञा‘ या नागरिकांना देण्यात आली. जे नागरिक यामध्ये यशस्वी झाले; त्यांना जाऊ देण्यात आले आणि उर्वरित नागरिकांची नृशंस पद्धतीने हत्या करण्यात आली. हल्ला घडविणारे बहुतेक तरुण हे उत्तम आर्थिक पार्श्‍वभूमी असणारे होते. इस्लामिक स्टेट (इसिस) या जागतिक दहशतवादी संघटनेने हा हल्ला घडविल्याचा दावा केले असला; तरी बांगलादेशमधील स्थानिक गटाकडून हा दहशतवादी हल्ला घडविण्यात आल्याचा दावा हसीना सरकारने केला आहे. या हल्ल्यामध्ये इसिसचा सहभाग कितपत आहे अथवा नाही, हे ठरविणे आता सुरक्षा दलांची जबाबदारी असली; तरी यामुळे बांगलादेशमधील मूलतत्त्ववादी चळवळीस गेल्या दशकभरापासून नवे जागतिक परिमाण मिळाल्याची बाब नजरेआड करता येणे शक्‍य नाही. किंबहुना, बांगलादेशमधील या नव्या हल्ल्यामुळे येथील राष्ट्रीय सुरक्षा व राजकीय स्थिरतेस असलेले आव्हान हे देशातील व देशाबाहेरील अशा दोन्ही घटकांकडून असल्याचे स्पष्ट आहे. गेल्या काही काळामध्ये बांगलादेशमध्ये इस्लामविरोधी मत व्यक्त करणाऱ्या ब्लॉगर्सवर हिंसक हल्ले होण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. याशिवाय 1971 मधील बांगलादेश मुक्तिसंग्रामावेळी उघड उघड पाकिस्तानपूरक भूमिका घेणाऱ्या जमात-इ-इस्लामी संघटनेच्या नेत्यांनाही फाशी येथील लवादाकडून फाशीची शिक्षा ठोठावण्यात आल्या आहेत. यांपैकी काही जणांना फाशी देण्यात आली आहे; तर जमातचा मुख्य नेता निझामी याच्या फाशीच्या शिक्षेवर येथील सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे. जमातच्या नेत्यांना मृत्युदंड ठोठावण्यात येत असताना बांगलादेशमधील परिस्थिती ही वेगाने तणावपूर्ण होत आहे. अशा पार्श्‍वभूमीवर येथील शेख हसीना सरकारपुढील आव्हान दिवसेंदिवस अधिकाधिक गंभीर होत आहे. 

1971 मध्ये बांगलादेशची निर्मिती झाल्यानंतर अवघ्या चार वर्षांत झालेल्या लष्करी क्रांतीनंतर बांगलादेशमधील लष्करी राजवटीशी पाकिस्तानबरोबर पुन्हा एकदा सौहार्दाचे संबंध प्रस्थापित झाले. या काळामध्ये बांगलादेशमधील इस्लामी मूलतत्त्वादास चेतविण्याचे काम अधिकाधिक उत्साहाने करण्यात आले; आणि आज सुमारे दोन पिढ्यांच्या काळानंतर बांगलादेशमध्ये जिहादी विचासरणीचे हे पीक हळुहळू फोफावू लागल्याचे दिसून येत आहे. बांगलादेशमधील संस्कृती व समाजमन हे केवळ इस्लामकेंद्रित नसल्याचे येथील सेक्‍युलर विचारवंत अजूनही उच्चरवाने सांगत असले; तरी प्रत्यक्ष परिस्थिती मात्र विरोधी आहे. बांगलादेशमधील हिंदु व बौद्ध समुदायांना येथील कडव्या मूलतत्त्ववाद्यांच्या अत्याचारांचा सामना करावा लागत आहे. उदाहरणार्थ, 1951 मध्ये बांगलादेशमध्ये हिंदु समुदायाच्या लोकसंख्येचे प्रमाण सुमारे 22% इतके होते. आज हे प्रमाण साडेआठ टक्‍क्‍यांपर्यंत आले आहे. तेव्हा बांगलादेशची प्रतिमा ही सर्वसमावेशक, विविध धर्मीयांना समान अधिकार देणाऱ्या लोकशाहीवादी राज्याची असल्याची येथील सरकारची भूमिका असली; तरी बांगलादेशचा धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाविरुद्धच्या दिशेकडील प्रवास हा कितीतरी आधीच सुरु झाला आहे. आता त्याची अभिव्यक्‍ती अधिक प्रखरपणे दिसून येते आहे, इतकेच म्हणता येईल. 

बांगलादेशमध्ये आता पुन्हा एकदा मूळ धरु पाहणारा इस्लामी विचार हा या देशाच्या निर्मितीवेळी निश्‍चित करण्यात आलेल्या मूल्यांविरोधात तर आहेच; शिवाय तो त्यापेक्षाही अधिक कडवा व हिंसकदेखील आहे. म्हणजेच बांगलादेशमधील या धार्मिक आव्हानाची व्याप्ती केवळ इस्लामविरोधी लेखन करणाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांपुरती नाही; तर इस्लाममधील परंपरांचे कोणत्याही किंतुविना पालन करण्याच्या अट्टाहासापर्यंत आता या आव्हानाचे कार्यक्षेत्र विस्तारले आहे. वर्तमानामधील बांगलादेश हा कडव्या इस्लामची परंपरा अत्यंत सनातनीपणे जपण्याची दीक्षा देणाऱ्या वहाबी विचरसरणीकडे प्रवास करणारा देश बनू लागला आहे. तेव्हा दहशतवादाचे समर्थन करणारी ही विचारसरणी बांगलादेशसारख्या वैशिष्ट्यपूर्ण देशामध्ये फोफावणे हे येथील नेतृत्वासाठी आपत्तीजनक आहेच; मात्र या वैचारिक आवर्तास यापेक्षाही गंभीर परिमाण आहे. बांगलादेशमध्ये यापुढे केवळ इस्लाममताचाच आदर केला जाईल, अशा स्वरुपाचा दृढमूल होत जाणारा आग्रहीपणा म्हणजे अतिजहाल इस्लामी विचारसरणीने राष्ट्रवादासारख्या मानवी मूल्यावर मिळविलेला विजय असल्याचे मान्य करावयास हवे. बांगलादेशचा प्रवास वहाबी पंथाकडे वेगाने होत असल्याची साक्ष देणारी अनेक उदाहरणे नजीकच्या काळात घडली आहेत. धर्मसत्ताविरोधी सेक्‍युलर ब्लॉगर्सवर झालेले अत्यंत हिंसक हल्ले; गेंच्या अधिकारांसाठी संघर्ष करणाऱ्या कर्यकर्त्यांवर झालेले हल्ले; इतकेच नव्हे, तर संगीत विद्यालयाची स्थापना केल्यामुळे झालेले हल्ले, अशा अनेक वेगवेगळ्या पातळ्यांवर घडत असलेल्या हिंसाचारामधून बांगलादेशचे भविष्य अंध:कारमय होण्याची शक्‍यता अधिकाधिक प्रखरपणे अधोरेखित होते आहे. वहाबी विचारसरणीचा मुद्दा येथे अधिक गंभीरपणे समजावून घेण्याची आवश्‍यकता आहे. बांगलादेशमधील संघर्ष हा केवळ इस्लाम व इस्लामविरोधी या पातळीवर चाललेला नाही. तर धर्माने मुसलमान असूनही इस्लामी धर्ममत मान्यता देत नसलेले मुस्लिम प्रागतिक विचारवंत, पत्रकार व कार्यकर्त्यांचेही तितक्‍याच हिंसकपणे खून पाडले जात आहेत. म्हणजेच बांगलादेश हा निव्वळ इस्लामिक देश होऊन मूलतत्त्ववाद्यांचे समाधान होणार नाही; तर तो कडवा, सनातनी इस्लाम पाळणारा असावा, अशी त्यांची स्पष्ट भूमिका आहे. या भूमिकेमुळे बांगलादेशमधील या अंतर्गत राजकीय संघर्षास आपोआपच जागतिक परिमाण मिळाले आहे. वहाबी विचार आणि इसिसमध्ये काहीही फरक नाही. किंबहुना वहाबी विचारसरणीचीच आपण सौदी अरेबियासारख्या देशांपेक्षा अधिक कठोर अंमलबजावणी करत असल्याचा इसिसचा दावा आहे. अशा पार्श्‍वभूमीवर वहाबी विचारसरणीकडे ओढ घेऊ पाहणारी बांगला भूमी इसिसह एकंदरच जागतिक दहशतवादी चळवळीसाठी नंदनवन झाल्यास ते नवल ठरणार नाही. 

बांगलादेश आणि एकंदरच आंतरराष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनामधून जागतिक दहशतवादी चळवळीची वाढणारी व्याप्ती हा अत्यंत काळजीचा विषय आहे, यात काही शंका नाही. दहशतवादाच्या या आव्हानावरील उपाययोजना ही एका देशाच्या आवाक्‍यातील बाब असूच शकत नाही. मात्र यासंदर्भात जागतिक पातळीवर एकत्रित उपाययोजना करण्यासाठीही मुळात वैचारिक सुस्पष्टता आणणे आवश्‍यक आहे. इस्लामी दहशतवादासंदर्भात सामान्यत: दोन मुद्दे उपस्थित केले जातात. जगभरात अशा स्वरुपाचे हल्ले घडविणाऱ्या दहशतवाद्यांना खरा इस्लाम कळलेलाच नाही; वा इस्लाम आणि अशा स्वरुपाच्या "इस्लामिस्ट‘ दहशतवाद्यांमध्ये फरक आहे, अशा दोन प्रकारची मांडणी दहशतवादाचा इस्लाम धर्माशी काहीही संबंध नसल्याची भूमिका घेण्यासाठी केली जाते. कळत वा नकळतपणे, धार्मिक भोळेपणाने केली जाणारी अशा स्वरुपाची मांडणी जागतिक दहशतवादी चळवळीचा इस्लामशी असलेला अतूट संबंध प्रत्यक्षात नाहीच, अशा स्वरुपाचा भ्रम निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. अर्थात, यासंदर्भात प्रचंड वैचारिक वैविध्य दर्शविणाऱ्या अक्षरश: शेकडो भूमिका असल्या; तरी इस्लाममध्ये आज एका नव्या आधुनिक वैचारिक मांडणीची आवश्‍यकता आहे, यामध्ये काहीही शंका नाही. जगभरामधील धर्मांमध्ये घडलेल्या प्रचंड वैचारिक उलथापालथीनंतर त्यांचे आजच्या आधुनिक काळामधील रुप आकारास आले आहे. मात्र इस्लाममध्ये अशा स्वरुपाची आधुनिक सुधारणावादी चळवळ होण्यास जवळपास नसलेली शक्‍यता, हे आज जागतिक दहशतवादी चळवळीचा स्फोट होण्यामागील मुख्य कारण आहे, हे कधीनाकधी मान्य करावेच लागेल. परंतु, बांगलादेशसारख्या देशांमधील सध्याची स्फोटक परिस्थिती पाहता हा दिवस नजीकच्या भविष्यकाळामध्ये येण्याची शक्‍यता अक्षरश: शून्य आहे, ही बाब अत्यंत व्यथित करणारी आहे. दहशतवादाचा धर्म कोणता हे आता ठरवून दिलं पाहिजे; नाहीतर दहशतवादी कुणाचा धर्म काय असावा ते ठरवतील ...
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com