द इंग्लिश पेशंटः स्मृतिरंजन आणि आत्मक्लेशाचं चिंतन

english-patient-blog
english-patient-blog

मॅन बुकर प्राईज, इंग्रजी साहित्यातील या सर्वोच्च पुरस्काराला यंदा ५० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त गेल्या पाच दशकांतील बुकर प्राईज पुरस्कारप्राप्त कादंबर्यांतून सर्वोत्कृष्ट कादंबरीला गोल्डन बुकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.

७०, ८०, ९०, ०० आणि १० या पाच दशकांतून प्रत्येकी एक अशा पाच बुकर विजेत्या पुस्तकांना अंतिम नामांकन मिळालं होतं. त्यामध्ये व्ही. एस. नायपॉल यांची ‘इन अ फ्री स्टेट’ (१९७१), पेनोलपी लाईव्हली यांची ‘मून टायगर’ (१९८७), मायकल ओन्डाची यांची ‘द इंग्लिश पेशंट’ (१९९२), हिलरी मॅंटेल यांची ‘वुल्फ हॉल’ (२००९) आणि जॉर्ज साँडर्स यांची ‘लिंकन इन द बार्डो’ (२०१७) या कांदबर्यांचा समावेश होता. 

जगभरातील वाचकांनी गोल्डन बुकरचा बहुमान मायकल ओन्डाची (Michael Ondaatje) लिखित ‘द इंग्लिश पेशंट’ या कादंबरीला दिला. प्रकाशनापासूनच ही कादंबरी वाचकांमध्ये तुफान लोकप्रिय ठरली. आतापर्यंत जवळपास ४० भाषांमध्ये तिचा अनुवाद आणि दहा लाखांपेक्षा अधिक प्रतींचा खप झाला आहे. अँथनी मिंघेला या उमद्या दिग्दर्शकानं १९९६ साली या कादंबरीला रुपेरी पडद्यावर आणलं. बॉक्स ऑफिस कमाईबरोबरच सर्वोत्कृष्ट चित्रपटासह नऊ ऑस्कर पुरस्कारही पटकावले. गोल्डन बुकरची घोषणा झाल्यानंतर बऱ्याच दिवसांपासून पाहायचा राहिलेला हा सिनेमा पाहिला. 

दुसरं महायुद्ध शेवटच्या टप्प्यात आलेलं असताना हॅना (ज्युलियट बिनोश) नावाची विशीतील एक कॅनेडियन नर्स इंग्लंडच्या सैन्यसाठी काम करत असते. तिच्या तुकडीत एक पूर्णपणे भाजलेला रुग्ण येतो. त्याला नाव आठवत नसल्यामुळे सर्वजण त्याला इंग्लिश पेशंट म्हणून ओळखू लागतात.

पलंगाला खिळून पडलेल्या या पेशंटला प्रवासामुळे होणाऱ्या वेदना पाहून हॅना त्यांच्यासह इटलीच्या एका खेड्यात मागे राहण्याचा निर्णय घेते. ते दोघे बॉम्ब हल्ल्यात पडझड झालेल्या मोनेस्टरीमध्ये आश्रय घेतात. पेशंटची सुश्रुषा आणि इमारतीला राहण्यालायक करण्यातच हॅनाचा दिवस जातो. काही दिवसांनी डेव्हिड कॅराव्हॅजिओ (विल्यम डेफो) नावाचा एक कॅनेडियन हेर आणि दोन ब्रिटिश बॉम्बशोधक सैनिक त्यांच्यासोबत मुक्काम ठोकतात. हॅना पेशंटला त्याच्याकडील पुस्तकातील उतारे वाचून ऐकवित असताना त्याच्या आठवणी जागृत होऊ लागतात.

हा पेशंट म्हणजे काऊन्ट लाझलो दी अल्मशी (Ralph Fiennes- रेफ फाईन्झ) नावाचा हंगेरियन नकाशाकार. दुसरे महायुद्ध सुरू होण्यापूर्वी १९३८ साली तो रॉयल जिओ ग्राफिकल सोसायटीसाठी इजिप्त-लिबियाच्या सीमेवर काही सहकाऱ्यांबरोबर सहारा वाळवंटाच्या सर्वेक्षण मोहिमेवर असतो. त्याच्या चमुमध्ये जेफरी आणि कॅथरीन क्लिफ्टॉन हे ब्रिटिश जोडेपं सामील होतं. जगापासून दूर या ओसाड वाळवंटात कॅथरीनसारखी हुशार, साहसी आणि सुंदर मुलगी आल्यावर स्वभाविकच लाझलो तिच्याकडे आकर्षित होतो. त्याच्या नजरेतील आकर्षण तिच्यापासूनही लपून राहत नाही. तळपत्या सहारा वाळवंटात त्यांची प्रेमकहाणी बहरते.

एकमेकांत गुंतत जात असताना कॅथरीनला अपराधीपणाची भावना खाऊ लागते. एकीकडे पती आणि दुसरीकडे प्रेम अशी दुहेरी घालमेल तिला अस्वस्थ करू लागते. तिच्या नवऱ्यालादेखील आता तिच्या अफेयरबद्दल संशय येतो. अखेर मन घट्ट करून कॅथरीन लाझलोसोबतचे प्रेमसंबंध तोडते.

दरम्यान, दुसऱ्या महायुद्धाचे बिगुल वाजताच लाझलोची मोहीम थांबते. सर्वजण मायदेशी परतू लागतात. अफेयरमुळे दुखावलेला जेफरी मात्र, लाझलोला मारून कॅथरीनसह आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये लाझलो थोडक्यात वाचतो. जेफरी मात्र ठार होतो. लाझलो गंभीर जखमी झालेल्या कॅथरीनला जवळच्या एका गुहेत ठेवतो आणि तिच्यासाठी मदत आणण्यासाठी रणरणत्या वाळवंटात तीन दिवस पायपीट करत इंग्रजांच्या एका चौकीवर पोहोचतो. त्याला मदत कराण्याऐवजी इंग्रज त्याला जर्मन गुप्तहेर समजून पकडतात. तो तेथून कसाबसा पळ काढतो. इंग्रजांकडून झालेली निराशा आणि दुर्गम वाळवंटात त्याची प्रेयसी मृत्यूशी झुंज देत असल्यामुळे तो जर्मन सैन्याला त्याच्याकडील सर्व नकाशे देऊन, त्याबदल्यात मदत मिळवतो. मात्र, तो पोहोचेपर्यंत कॅथरीनची प्राणज्योत मालवलेली असते. 

हे झालं मूळ कथानक. याच्या जोडीला हॅनाचं उपकथानक आहे. ती किप ऊर्फ क्रिपाल सिंग (नवीन अँड्य्रू) या ब्रिटश सैन्यातील शीख बॉम्बशोधकाच्या प्रेमात पडते. इटलीतील त्या खेड्यात जर्मन सैन्याने जागोजागी दडवून ठेवलेले माईन्स (छुपे बॉम्ब) शोधून निकामी करण्याची किपवर जबाबदारी असते. तोदेखील हॅनाच्या प्रेमात पडतो. मात्र, त्या अनिश्चततेच्या काळात त्यांचीदेखील ताटातूट होते.

डेव्हिड कॅराव्हॅजिओ हा हेर जेफरीसोबत इजिप्तमध्ये काम करत असतो. जर्मन सैन्याच्या तावडीत सापडल्यावर त्याच्या हाताचे अंगठे कापतात. कशीबशी सुटका झाल्यावर त्याला लाझलोने जर्मनीला नकाशे दिल्याचे कळते. तसेच कॅथरीन आणि जेफरीचाही त्याने खून केला, असा त्याचा गैरसमज होतो. म्हणून तो बदला घेण्यासाठी लाझलोच्या शोधात तेथे येतो. परंतु, सत्य कळाल्यानंतर त्याचं मत बदलतं.

किप गेल्यानंतर हॅनाचं दुःख लाझलोपासून लपून राहत नाही. तिची आणि स्वतःची सुटका करण्यासाठी तो तिला त्याची जीवनयात्रा संपवण्यास सांगतो. साश्रुनयनांनी ती मॉर्फिनचा ओव्हरडोस देऊन आठवणी आणि पश्चातापाच्या पाशातून त्याची कायमची मुक्तता करते. 

वरकरणी पाहायला गेलं तर ही टिपीकल प्रेमकथा वाटते. पण चित्रपटाची महत्त्वकांक्षा आणि त्याचा पट त्याहून कितीतरी अधिक व्यापक आहे. केवळ कथा न सांगता तो पात्रांचा प्रवास रेखाटतो. एखाद्या कमर्शियल दिग्दर्शकानं लव्ह स्टोरीवर फोकस करून ‘कॅसाब्लांका’ची आवृत्ती काढण्याचा प्रयत्न केला असता. पण मिंघेलाला त्याच्याकडे असणाऱ्या सोर्स मटेरियलची डेप्थ माहित होती. ही केवळ प्रेमकथा नाही तर प्रेमातील आठवणी, पश्चाताप, दुःख, आत्मशोध आणि आशावाद यांचं मिश्रण आहे. इथं प्रेम गमावण्याचं वरवरचं दुःख नाही. प्रेमात असफल ठरलेल्या व्यक्तीचा आत्मक्लेश आहे. 

लाझलो एक्सप्लोरर आहे. अनोळखी आणि आव्हानात्मक प्रदेशांच्या शोधात तो सहारा वाळवंटामध्ये फिरतोय. प्रेमाचा मुलुखही त्याच्यासाठी दुर्गम आणि अनोळखीच. प्रेमात पडल्यावर त्याच्या स्वतःबद्दलच्या सगळ्या संकल्पना गळून पडतात. सुरवातीला तो कॅथरीनला म्हणतो, माझ्यावर कोणाचाच हक्क नाही. मात्र, प्रेमात गुंतत गेल्यावर तिच्या मोहिनीतून बाहेर पडणं त्याला शक्य होत नाही. त्याला त्याची हळवी बाजू कळते. तिची आसक्ती त्याच्या अंतरंगातील नवे रूप समोर आणते. 

‘स्मृतिरंजन’ (Reminiscence) या चित्रपटाची महत्त्वाची थीम आहे. एखादं पुस्तक किंवा चित्रपट पुन्हा पुन्हा वाचावं किंवा पाहावा आणि दरवेळी काही तरी नवीन सापडावं, असा काहीसा स्मृतिरंजनाचा अनुभव असतो. कॅथरीनच्या मृत्यूला स्वतःला जबाबदार मानणारा लाझलो आठवणींना रिवाईंड करून आत्मदोषाचे नवेनवे कारण शोधत असतो. त्याला पुर्णत्त्वाकडे घेऊन जाणारे प्रेम तिच्यासाठी अभिशाप ठरते आणि यासाठी तो स्वतःला कधीच माफ करू शकत नाही.

कॅथरीनच्या दृष्टीकोनातून विचार केला तर जेफरी आणि ती बालपणाचे मित्र. 'रुढार्थाने' त्यांच्या लग्नात काही कमी किंवा प्रॉब्लेम नाही. मग सगळं चांगलं असतानाही ती लाझलोकडे का आकर्षित होते? हा प्रश्न पडू शकतो. हीच तर या चित्रपटाची खासियत आहे. विवाहबाह्य संबंधामध्ये आपण नेहमी काही तरी कारण शोधत असतो. प्रेमाला ‘जस्टीफाय’ करण्याचा प्रयत्न करतो. तसा येथे प्रयत्न केलेला नाही. लग्नामुळे प्रेम होऊ शकत नाही, असा काही नियम नाही. केवळ त्या वाटेवर पुढे जायचे की नाही, हा ज्याचा त्याचा प्रश्न. प्रेमाचं विश्लेषण करायचं नसतं. कॅथरीनवर आपल्या नैतिकतेच्या चौकटी लादणं चुकीचं ठरेल. तिचा भावनिक संघर्षच तिच्या पात्राला खूप इंटरेस्टिंग करतो.

या चित्रपटात मला सर्वाधिक आवडलेली बाब म्हणजे किप या भारतीय शीखाचे पात्र. क्वचितच इंग्रजी सिनेमांमध्ये भारतीय पात्र कोणताही स्टेरिओटाईप न बाळगता, इतक्या संवेदनशीलतेने दाखवले जाते. जी गोष्ट हिंदी सिनेमांत मराठी कलाकारांची असते, तीच गत भारतीयांची इंग्रजी चित्रपटात असते. दुसऱ्या महायुद्धात लाखो भारतीय सैनिकांच्या शौर्याला म्हणावे तसे क्रेडिट दिले जात नाही. त्यादृष्टीने ‘द इंग्लिश पेशंट’ हा चित्रपट वेगळा आणि उल्लेखनीय ठरतो. नवीन अँड्य्रू या कलाकराने साकारलेला क्रिपाल सिंग टिपिकल सरदार नाही. तो या महायुद्धात इंग्रजांचा गुलाम म्हणून नाही तर त्याच्या बॉम्ब निकामी करण्याच्या कौशल्यामुळे आहे. तो चाकरी नाही तर लोकांचे प्राण वाचवण्याचे काम करतो. त्याला चित्रपटात दिलेली ‘इक्वल ट्रीटमेंट’ अपवादानेच इतर इंग्रजी चित्रपट पाहायला मिळते.

चित्रपटातील एका नितांत सुंदर प्रसंगात तो जखमी लाझलोला रुडियार्ड किपलिंग लिखित ‘किम’ कादंबरी वाचून ऐकवित असतो. वाचताना तो अडखळतो. त्यावर लाझलो त्याला फार छान सल्ला देतो. तो म्हणतो, “तु फार घाईघाईने वाचतोयस. वाचत असताना लेखकाने ते शब्द कसे लिहिले याचा विचार कर. किपलिंग टेबलावर बसून ज्या वेगाने पेनाने लिहित असेल, तो वेग समजून त्यानुसार वाच.’’ मग लाझलो स्वतः एक पॅरेग्राफ स्वल्पविराम आणि पूर्णविरामसह ऐकवतो. लाहोर संग्राहलयातील झमझमा तोफेचा त्यात उल्लेख असतो. 

त्यावर किप म्हणतो की, “ती तोफ अजुनही लाहोर संग्रहालयाबाहेर आहे. टॅक्सच्या नावाखाली लाहोरमधील लोकांच्या घरातून स्टील-लोखंडाची भांडी गोळा करून ती तोफ तयार केलेली आहे. नंतर इंग्रजांनी हीच तोफ त्या लोकांवर डागली. मी कितीही हळू वाचले तरी किपलिंगच्या म्हणण्यानुसार, भारतीयांच्या भल्यासाठी इंग्रजांचे शासनच योग्य आहे - हाच अर्थ निघतो.’’ वसाहतवादाविरोधातील ही टिप्पणी या प्रसंगात विलक्षण परिणाम करून जाते. 

चित्रपटात युद्धविरोधी सूर भाषणबाजी किंवा उपदेशातून नाही तर, पात्रांच्या वागण्या-बोलण्यातून उमटतो. जर्मन सैन्याला नकाशे दिल्यामुळे हजारो जणांचे बळी गेल्याचा दोष कॅराव्हॅजिओ जेव्हा लाझलोला देतो तेव्हा तो म्हणतो, ‘’मी नकाशे दिले नसते तरी हजारो लोक मेले असते. फरक एवढाच की, मारले गेलेले लोक दुसऱ्या बाजूचे असते.” लाझलो हंगेरीचा, हॅना व कॅराव्हॅजिओ कॅनाडाचे, किप भारतीय, जेफरी व कॅथरीन इंग्लंडचे आहेत. यावरून चित्रपटातील युनिव्हर्सिलीटी दिसून येते. 

लेखक-दिग्दर्शक अँथनी मिंघेलापाशी अभिजात चित्रकाव्यात्मकता आहे. मग ते वाळुच्या वादळातील लाझलो-कॅथरीनचं रोमँटिक संभाषण असो किंवा, किप-हॅनाची चर्चमधील पेन्टींग डेट असो. छोट्या छोट्या गोष्टीमधून प्रेमात पडण्याच्या त्या मॅजिकल प्रोसेसचा भाग होण्याची तो आपल्याला संधी देतो. मायकल ओन्डाची यांच्या कादंबरीचं कॉप्लेक्स स्ट्रक्चर आणि भाषेतील काव्यत्मकता कायम राखून कादंबरीला सिनेमँटिक रुप देण्याचं त्याचं कसब खरंच वाखाणण्याजोगं आहे. फ्लॅशबॅक आणि वर्तमानातील कथानकाची अशी सुरेख गुंफण घातली की, पाहताना कुठेच व्यत्यय किंवा कन्फ्युजन होत नाही. याचं मोठं श्रेय वॉल्टर मर्च या प्रसिद्ध एडिटरला जातं. ‘गॉडफादर पार्ट २’ चा अनुभव पाठीशी असल्यामुळे मर्च यांच्यासाठी ते काही नवं नव्हतं.

चित्रपटाची ट्रीटमेंट आणि सेटिंगमुळे डेव्हिड लीनच्या ‘लॉरेन्स ऑफ दि अरेबिया’ची आठवण येते. दोन्ही चित्रपट महायुद्धांच्या पार्श्वभूमीवर असून, कथानक मिडल ईस्टमध्येच घडतं. ‘मॅड मॅक्स’, ‘हॅरी पॉटर १’ यासारख्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध असणारे सिनेमॅटोग्राफर जॉन सिले यांनी या सिनेमाला लागणारी भव्यता प्रदान केली आहे. विशाल, विस्तीर्ण, रुक्ष वाळवंटाचं भुरळ घालणारं सौंदर्य टिपण्याबरोबरच त्याची दाहकतासुद्धा त्यांनी अधोरेखित केली आहे. तीच बाब बॅकग्राउंड स्कोरची. गॅब्रिएल यार्ड यांचं संगीत एकाचवेळी इंटिमेट आणि ग्रॅंड फीलिंग देणारे आहे. मेन थीम तर सध्या माझ्या प्लेलिस्टमध्ये लूप वर आहे. 

कलाकारांच्या बाबातीत बोलायचे तर ‘शिंडलर्स लिस्ट’मधील क्रूर नाझी अधिकाऱ्याच्या भूमिकेमुळे आठवणीत राहिलेल्या रेफ फाईन्झला (नावाची इंग्रजी स्पेलिंग वेगळी असली तरी उच्चार असाच आहे!) अशा रोमँटिक अवतराता पाहणं खरं तर खूप छान अनुभव आहे. प्रेमात आकांत बुडालेला लाझलो असो किंवा शेवटच्या घटका मोजणारा इंग्लिश पेशंट असो, दोन्ही भूमिकांमध्ये तो काबिल-ए-तारीफ आहे. दुर्गम भागांत भटकणारा, मर्यादित सोशल लाईफ असलेला लाझलो रेफच्या बॉईश चार्ममुळे रिलेटेबल वाटतो.

क्रीस्टीन स्कॉट थॉमस आणि कोलिन फर्थ (कॅथरीन व जेफरी क्लिफ्टन) व विल्यम डेफो यांनी त्यांच्या वाट्याला आलेल्या भूमिका चांगल्या साकारल्या आहेत. ज्युलिएट बिनोश (हॅना) हिला तर सहअभिनेत्रीचा ऑस्कर मिळाला. विशेष उल्लेख करावा लागेल तो नवीन अँड्य्रूचा. त्याने ज्या ‘नो-नॉन्सेस’ पद्धतीने किप साकारला त्यामुळे चित्रपटात एक वेगळा फ्लेव्हर आला आहे. जेथे इतर पात्र वैयक्तीक दुःखामुळे ग्रस्त आहेत तेथे किपची समोरचे प्रश्न, त्याची अस्वस्थता एका व्यापक समस्येकडे बोट दाखवणारी आहे. चित्रपटाविषयी काही तक्रार असेल तर, ती किपची भूमिका आणखी मोठी नसल्याची.

शेवटी प्रसिद्ध (आणि माझे सर्वात आवडते) सिनेसमीक्षक रॉजर ईबर्ट यांच्या शब्दांत सांगायचं तर, हा चित्रपट दोनदा पाहण्यासारखा आहे. पहिल्यांदा त्यातील प्रश्नांसाठी आणि दुसऱ्यांदा उत्तरे शोधण्यासाठी.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com