तुम्हाला उत्तर सुचतयं ?... 

Aaple Ghar
Aaple Ghar

"आता थकल्यासारखं वाटू लागलयं...'' त्यांच्या या शब्दांनी मनात चर्रर्र झालं. 
ते फोनवर बोलतच होते, ""संस्थेची आर्थिक स्थिती खूपच गंभीर आहे हो, पगारही होऊ शकत नाहीत, अशी वेळ पहिल्यांदाच आलीये. गेल्या महिन्यात एक "एफडी' मोडून पगार केला तर याही महिन्यात आणखी एक "एफडी' मोडावी लागतीये...'' 
"संस्थेला बरीच नामवंत मंडळी मदत करत होती ना ? त्यामुळं संस्था अशा स्थितीत आली असेल, असं मला कधीच वाटलं नव्हतं...'' मी 
विजय फळणीकरांना मध्येच थांबवत विचारलं. 
"हो ना..., पण संस्थेचा पसारा वाढत गेलाय अन त्यामुळं मदत पुरी पडत नाहीये,'' 
"किती खर्च होतोय आता ?'' 
"महिन्याला सहा-साडेसहा लाख रूपये लागतात, पण तेवढे मिळत नाहीत. मी देणग्यांसाठी सतत फिरतो. आताही उद्यापासून तीन दिवस कोकणात जाणार आहे, मदत मागण्यासाठी... सतत फिरतोय, पण आता थकलोय...'' 

यांचा असा दमलेला आवाज मी पहिल्यांदाच ऐकत होतो. त्यांना सतत प्रसन्न, हसतमुख पाहण्याची जशी सवय झाली होती तसाच त्यांचा उत्साही स्वर ऐकण्याचीही. आयुष्यात अनेकविध दुःखद प्रसंग कोसळूनही हा माणूस इतका प्रसन्न कसा राहातो, याचे अप्रूप वाटत असे. नागपूरला वडलांचा सराफीचा व्यवसाय चांगला चालत असतानाच अचानक त्यांचे निधन झालं, अक्षरशः खाण्याची भ्रांत त्यांच्यावर आणि त्यांच्या भावंडांवर आली. पाणी पिऊनच दिवस काढण्याच्या स्थितीला कंटाळून ते मुंबईच्या गाडीत बसले. वडापावच्या गाडीवर काम केलं, पण गाडीच बंद पडल्यानं त्यांना मुंबादेवी मंदिरासमोर नाईलाजानं भीक मागावी लागली. त्यावेळी अशाच एका व्यक्तीनं त्यांचा हात धरला आणि त्यांना पोलिस स्थानकावर नेलं. तिथून त्यांची रवानगी झाली ती डोंगरीच्या रिमांड होममध्ये. ती व्यक्ती होती रिमांड होमचे अधीक्षक यशवंत काळे. त्यांच्यामुळं फळणीकरांचं आयुष्यच बदलून गेलं. रिमांड होममध्ये ते तीन वर्षे राहिले. त्याच काळात पोलिसांनी त्यांचा नागपूरचा पत्ता शोधला आणि त्यांना परत घरी पाठवलं. घरी परतल्यावर दिवसा नोकरी आणि रात्री शाळेत शिक्षण असं करून ते दहावी झाले. स्टेज क्राफ्टचा पदविका अभ्यासक्रम केल्यानंतर पहिल्यांदा नागपूर दूरदर्शनवर त्यांनी नोकरी केली. त्याच काळात त्यांचं लग्न झालं आणि नंतर मुलगाही झाला. 

काही काळानं त्यांना पुण्याच्या दूरदर्शनमध्ये नोकरी मिळाली. तिथं विविध पदांवर चढत जाऊन ते वरिष्ठ निर्माता झाले. चांगला पगार, वैवाहिक सौख्य अशी चांगली परिस्थिती होती... आयुष्याची नाव डौलानं पुढंपुढं चालली होती. 
पण अचानक... 
अचानक या सुखी संसाराला काळाचीच दृष्ट लागली... 
काळानं त्यांच्यावर आघात केला. त्यांच्या मुलाला रक्ताचा कर्करोग झाला आणि अचानक तो गेला.... 

"डॉक्‍टरांनी आम्हाला सांगितलं की त्याचं आयुष्य फक्त पंधरा दिवसांचच राहिलयं. तुम्ही मानसिकदृष्ट्या तयार व्हा कारण त्याचे अवयव काम करणं थांबवतील. त्याला रक्ताच्या उलट्या सुरू झाल्या. एका दिवशी एक डोळा गेला तर दुसऱ्या दिवशी दुसरा. त्याच्या नाकातनं रक्त वाहात होतं. 18 नोव्हेंबरला सकाळी तो गेला. त्याची शरीर खराब झाल्यानं डॉक्‍टरांनी त्याला थेट स्मशानभूमीत नेण्याचा सल्ला दिला, पण आम्ही त्याला घरी आणलं. रस्त्याच्या कामामुळं रूग्णवाहिका यायला तीन तास उशीर झाला. ते तीन तास आम्हाला खूप त्रासदायक गेले. त्याच्या संपूर्ण शरीरात पाणी भरलं होतं, सतत रक्त वाहात होतं. आम्ही रक्त पुसत होतो. अखेरीस त्याच्यावर अंत्यसंस्कार केले, पण त्या आठवणींनी आमची जगण्याची इच्छाच संपली होती आणि आम्ही दोघांनी आत्महत्येचा निर्णय घेतला. आम्ही दोरी घेऊन आलो आणि रात्री बाराला आत्महत्या करण्याचं ठरवलं.'' 
"अरे बापरे...'' 

"त्या रात्री पत्नीच्या भावानं मला फोन केला अन लग्नपत्रिका देण्यासाठी तो येणार असल्याचं त्यानं सांगितलं. आम्ही फाशी दुसऱ्या रात्रीपर्यंत पुढं ढकलली, पण पत्रिका देताना त्यानं लग्नाला यायचा शब्द आमच्याकडनं घेतला. लग्नात पाच सुवासिनींमध्ये हिचं नाव आलं, पण "यांचा मुलगा गेलाय, या नकोत,' असं एकानं सांगितल्यानं पत्नी दुखावली. आम्ही तिथनं बाहेर पडलो, पण कुणीतरी आम्हाला "मूल दत्तक घ्या' असं सुचवलं. पण "एकच का दहा मुलं दत्तक घेऊ' असं म्हणत आम्ही बाहेर पडलो.'' 

विजयरावांनी मग मुलाच्या, वैभवच्या विम्याच्या आलेल्या पैशांतून वारज्याला जागा घेतली, त्याच्या नावानं फाउंडेशन केलं, तिथं अनाथाश्रमच सुरू केला. सुरवातीला असणारी चौदा मुलं पुढं वाढत गेली. त्यामुळं सिंहगड पायथ्याला, डोणज्याला पावणेदोन एकर जागा घेतली. तिथं अनाथ मुलांप्रमाणंच वृद्धाश्रम सुरू केला. पुढं तिथं रूग्णालय उभारून सिंहगड परिसरातील दऱ्याखोऱ्यांमधल्या गावांमधील रहिवाशांना आरोग्यसेवा पुरवली. त्यात प्रसूतिगृह, इनक्‍युबेटर, एक्‍स रे तपासणी, इसीजी, फिजिओथेरपी, नेत्र आणि दंत चिकित्सा कक्ष आणि शस्त्रक्रिया कक्ष आदी अत्याधुनिक सामग्री आहे. अतिदुर्गम भागासाठी फिरत्या रूग्णालयाची सोय केली. डोणज्याच्या रुग्णालयात बायाबापड्यांची होणारी गर्दी त्या सेवेची किती गरज आहे, ते पटवते. मोठ्या झालेल्या मुलांना रोजगार मिळण्यासाठी वेगवेगळ्या कौशल्याचे प्रशिक्षण संस्थेत दिले जाते. त्यात शिवणकाम, एम्ब्रॉयडरी, हातकागदाच्या पिशव्या, धूप, फिनेल, कागदी प्लेटस्‌, द्रोण आदींचा समावेश असतो. 

विजयरावांनी सुरू केलेल्या या साऱ्या सेवेचं वैशिष्ट्य म्हणजे ही सेवा संपूर्णपणे मोफत आहे. अधिकाधिक लोकांना सेवा पुरवत गेल्यानं खर्च वाढत गेला. तो भरून काढण्यासाठी सरकारची मदत त्यांनी कधी घेतली नाही. केवळ संवेदनशील माणसांकडून मिळणाऱ्या मदतीवरच ते अवलंबून राहातात. या साऱ्या खटाटोपाचा आजचा मासिक खर्च आहे सहा लाख रूपयांचा. म्हणजेच वर्षाला साधारणतः सत्तर लाख रूपये त्यांना लागतात. तेवढ्या देणग्या मात्र मिळत नाहीत. 
... या स्थितीनं संस्थेला पगारासाठीही एफडी मोडाव्या लागताहेत आणि म्हणूनच फोनवरचा विजयरावांचा आवाज मला वेगळाच वाटला होता. 
"विजयराव, तुमचा खर्च भागवण्यासाठी काय करता येईल ? '' मी त्यांना प्रश्‍न केला. 

"लहानपणी नागपूरहून मुंबईला गेलो तेव्हा स्वतःसाठी भीक मागत होतो आता अनाथालयातील मुलांसाठी मागतोय..., तेच करण्यासाठी फिर-फिर फिरतोय. उद्यापासनं तीन दिवस कोकणात फिरणार आहे, पण आता थकल्यासारखं वाटतयं...'' 
यांचं हे फिरणं कसं कमी होईल ? फक्त खर्चासाठी देणगी मिळवण्यासाठी ताकद खर्च होण्याऐवजी संस्थेची सेवा अजून चांगली होण्यासाठी त्यांना वेळ कसा मिळू शकेल ? विचार केला तर वर्षाला साठ-सत्तर लाख कायमस्वरूपी मिळवण्यासाठी सहा-सात कोटींचा निधी त्यांच्याकडं असला पाहिजे. तो मिळू शकेल ? समाजानं मनावर घेतलं तर "देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी' अशी स्थिती नक्कीच येते. मदत करू इच्छिणाऱ्यांनी प्रत्येकी दहा हजार दिले तर किती जणांना ते द्यावे लागतील ? का "सीएसआर'साठी काही कंपन्यांना साद घालता येईल ? का आरोग्यसेवेसाठी थोडं शुल्क आकारायला हवं ? प्रश्‍नांचं मोहोळ सुरू झालं...पण एक असं उत्तर सुचेना. 
तुम्हाला उत्तर सुचतयं ? 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com