खरे केअरटेकर....! 

राजेश अग्निहोत्री,नाशिक
शनिवार, 2 फेब्रुवारी 2019

कधी कधी आपल्या आयुष्यात असे काही प्रसंग घडत असतात की ज्यातुन आपल्याला बोध होतो की खरंच, आपलीही काळजी घेणारं कुणीतरी आहे. आवश्‍यकता नसते की काळजी घेणारी ती व्यक्ती तुमच्या निकटची किंवा परिचित असली पाहिजे. कित्येक वेळा अज्ञात व्यक्ती सुध्दा अप्रत्यक्षपणे आपली काळजी घेत असल्याचं दिसुन येतं. असो.

कधी कधी आपल्या आयुष्यात असे काही प्रसंग घडत असतात की ज्यातुन आपल्याला बोध होतो की खरंच, आपलीही काळजी घेणारं कुणीतरी आहे. आवश्‍यकता नसते की काळजी घेणारी ती व्यक्ती तुमच्या निकटची किंवा परिचित असली पाहिजे. कित्येक वेळा अज्ञात व्यक्ती सुध्दा अप्रत्यक्षपणे आपली काळजी घेत असल्याचं दिसुन येतं. असो.

मे महिन्यामधली घटना आहे. कुटुंबासमवेत मी मुंबईहून नाशिकला कारने प्रवास करत होतो. कसारा घाटात पोहोचायला आम्हाला रात्रीचे नऊ वाजले होते. जेवणासाठी म्हणुन आम्ही घाटापूर्वीच लागत असलेल्या एका धाब्यावर थांबलो. व्यवस्थित जेवण झाले. दिवस मे महिन्याचे असल्यामुळे जेवणानंतर सर्वांना थंडगार लस्सी पिण्याची लहर आली. तेथील स्पेशल लस्सीचे पोस्टर्स भिंतीवर झळकतच होते. वेटरला बोलावुन आम्ही लगेच चार लस्सीची ऑर्डर दिली. 
मित्रहो, एखादा वेटर असता तर ऑर्डर घेऊन चटकन गेला असता. परंतु तो वीस-बावीस वर्षे वयाचा वेटर तिथेच घुटमळला. माझ्याकडे पाहू लागला. मला काही उमजेना की याला ऑर्डर निट कळाली आहे की नाही? तेवढ्यात त्यानेच मला विचारलं, "साब, ड्रायव्हर भी है क्‍या आपके साथ?" मी सांगितलं "नाही. का बरं असं विचारतो आहेस?" मग त्याने परत नम्रपणे विचारले, "साब फिर गाडी आपही चलाने वाले हो क्या ?" मी सांगितले हो.! मग मात्र त्याने अगदी कळकळीने सांगितले, "फिर साब आप खुद लस्सी मत लिजिए, दुसरा कुछ लिजीए. आपको ड्रायव्हिंग करना है और लस्सी पिनेसे आपको निंद लग सकती है!"
मित्रांनो, त्याची ही प्रामाणिक सुचना ऐकली आणि मी एकदम नि:शब्द झालो. मला काय बोलावे तेच सुचेना कारण त्याचं हे वागणं, ही ग्राहकांबद्दल घेतलेली मनापासुनची काळजी माझ्यासाठी अगदी अनपेक्षित होती. एक साधारण म्हणून समजली जाणारी व्यक्ती या स्तरावर विचार करून धीटपणे थेट ग्राहकाला सूचना देत त्याच्याप्रति असलेली काळजी व्यक्त करीत होती. त्याच्या डोळ्यातून खरेपणा अगदी ओसंडून वहात होता. मी मात्र हसत हसत त्याची सुचना स्वीकारली अन् तीन लस्सी व एक चहाची ऑर्डर देऊ केली. बिल देऊन निघतांना त्याच्याकडे परत डोळे भरून पहावसं वाटलं कारण हा त्याने दिलेला सल्ला केवळ त्या दिवसापुरता नव्हता, तर आयुष्यभर लक्षात राहिल असाच होता. सवयीप्रमाणे बिल पे केल्यानंतर टिप देणे आलेच. पण आज टिप देतांना मलाच ती त्याच्या लाखमोलाच्या सल्ल्यासमोर अत्यंत तुच्छ अशी वाटत होती. 
पुढच्या प्रवासात डोक्‍यात अनेक विचार आले. आपल्याला असं वाटत असतं की ठराविक मंडळीच, म्हणजे अगदी आपल्या जवळची मंडळीच फक्त आपली काळजी करत असतात. पण खरंच तसं नसतं. आपल्या आसपासची कितीतरी ज्ञातअज्ञात मंडळी आपली प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या काळजी घेत असतात. कित्येकवेळा आपल्याकडून त्याची दखलही घेतली जात नाही. पहा ना, कुणी बाईकवर जात असतांना स्टँन्ड खालीच राहिला असेल तर त्याला कुणीतरी अज्ञात इसमच सांगतो की "भाऊ, स्टँड खाली राहिला आहे.!" स्टँन्ड असाच खाली राहिला तर वळणावर एखादा अपघात होऊ शकतो व तो टळला जावा असं त्या अज्ञात हितचिंतकाला वाटत असतं. कारचा दरवाजा नीट लागला नसेल तर अनोळखी लोकंच "दरवाजा उघडा आहे" असं सांगुन पुढे जातात. कुणी तरुण आपली गाडी थांबवुन रस्त्याच्या मधोमध पडलेला एखादा दगड बाजुला करून ठेवतो. का? तर एखाद्या वाहनाचा अपघात नको व्हायला.! असे फक्त निवडक नाही, तर कितीतरी लोक त्यांचं आपल्याशी काही नातं नसतांना आपली काळजी घेत असल्याचं दिसुन येतं. संकट येण्यापूर्वीच आपण सावध केले जात असतो म्हणून अनेकवेळा आपल्याला त्याचं महत्वं वाटत नाही. पण अशावेळी दुष्परिणामांचा आवर्जून विचार करावा म्हणजे आपल्याला त्या काळजीचं मोल लक्षात येतं. 
मित्रहो, फक्त विधात्याने ठिकठिकाणी पेरून ठेवलेली, आपली काळजी घेणारी अशी मंडळी जरी आपण लक्षात घेतली तरी तोंडातून चुकुनही कधी निघणार नाही की देवा, तु माझ्यासाठी काय केलंस? पटतंय ना? 

- post.rajeshagni@gmail.com

इतर ब्लॉग्स

संपादकीय बातम्या