एग रिपब्लिक

egg republic article by varun sukhraj
egg republic article by varun sukhraj

2019 ची पहिली सोशल मिडिया ब्रेकिंग न्यूज होती- एका अंड्याचा फोटो जगात सर्वाधिक आवडता ठरल्याची. या आधीचा सर्वाधिक आवडता फोटो होता 'कायली जेनर' ह्या अमेरिकन सेलिब्रिटीच्या नवजात मुलीचा. 

'इन्स्टाग्राम' जगभरातील अनेक उत्तम फोटो पोस्ट होत असतात. त्यातल्या काहींमागे कित्येक तासांची - दिवसांची- वर्षांची देखील मेहनत असते. तो आवडल्यावर सेकंदापेक्षा कमी वेळात डबल टॅप केलं जातं आणि त्या चित्रावर हार्टशेप सिम्बॉल चमकून जातो. त्या एका सेकंदापेक्षा कमी वेळात
होणाऱ्या निर्णयासाठी ती सगळी मेहनत असते. जगभरातून आलेल्या अशा उत्तमोत्तम फोटोंमधून एका अंड्याच्या 'स्टॉक' इमेजला केवळ 15 दिवसात इतके लाईक्स मिळणं, ही गोष्ट सोशल मिडीयावर घडलेली एक गमतीदार घटना एवढ्या पुरती मर्यादित राहत नाही. कारण कोणताही मिडीया हा त्या-त्या काळातल्या समाजाच्या मानसिकतेचं प्रतिबिंब असतो. सोशल मिडीया म्हणजे तर थेट समाजचं Virtual रूपच. मग हे फोटोतलं अंड कोणता गंभीर संदेश देतंय?

मुळात झालं असं होतं की, काही मुलांना वाटलं की जेनरने टाकलेल्या फोटोपेक्षा अधिक लाईक्स एका अंड्याच्या फोटोला मिळवून
द्यायचेच. त्यासाठी त्यांनी @world_record_egg  अशा नावाचं अकाऊंट इन्स्टाग्रामवर सुरु केलं आणि अंड्याचा 'स्टॉक' फोटो 4 जानेवारीला पोस्ट केला आणि बघता बघता हा फोटो करोडो डबल टॅप्स मिळवत पहिल्या पंधरा दिवसातच 4 कोटी 80 लाखाच्या पार गेला. 

सोशल मिडियावर लाईक देण्याचा अर्थ आवडणं इतकाच मर्यादित नाहीय, त्या क्रियेमध्ये अनेक भावना आहेत. कदाचित या अंड्याने लोकांच्या आत घुसमटलेल्या त्या अंडरडॉगला वाट करुन दिली असेल किंवा अनेकवेळा 'अंड्यावर आऊट' होणाऱ्या त्यांच्या मनाला,  विश्वविक्रमाची स्वप्नं दाखवली असतील. अशांनीच एका क्षणात लाईक करत या अंड्याच्या प्रवासाला हातभार लावला असेल. विपरित परिस्थितीमध्ये जगणाऱ्या कोणी, स्वप्नवत आयुष्य जगणाऱ्या सेलिब्रिटीवरचा आपला राग व्यक्त करण्यासाठी तसे केले असेल. काही लोकांनी तर न बघताच नेहमीच्या सवयीप्रमाणे स्क्रोल डाऊन करताना पटकन लाईक करुन टाकलं असेल. कारणं काहीही असली तरी या अंड्याने इतिहास घडवला हे मात्र नक्की.

एका अर्थी या अंड्याने आपल्या समाजातील सध्याचा सर्वात मोठा गोंधळ समोर आणलाय. सेन्सिबल फॉलोअर्स आणि चिअर लिडर्स यांच्या मधला फरक हळूहळू नष्ट होत चाललाय ही चिंतेची बाब. हिरो असणं हे वाईट नाही पण त्याची निर्मिती प्रक्रिया उथळ होत चाललीय ही चिंतेची बाब आहे. गांधी, टिळक, आझाद बनायला अनेक दशकांची तपश्चर्या लागली. आता मात्र परिस्थिती भितीदायक बनलीय. कोणा एखाद्या माणसाची एखादी तुरुंगवारी फेसबुकवर लाईव्ह ब्रॉडकास्ट झाली की असंख्य स्क्रीन वॉरिअर्स पटापट व्यक्त होतात. लाईक, शेअर आणि कमेंट करतात. 

भांडुपला गर्दीमुळे न उतरता आल्याने मुलुंडला उतरुन चरफडत ब्रिज क्रॉस करताना, त्याच क्षणी कोणीतरी, कुठेतरी, कशाच्या तरी विरोधात आवाज उठवलेला पाहतात आणि 'या' गर्दीचा
राग येऊन ते 'त्या' गर्दीत सामिल होतात, चटकन लाईक करुन एका क्रांतीचा भाग बनतात. यातली दुर्देवाची गोष्ट अशी की, त्या क्रांतीच्या खोलाशी जायला त्यांना सवड नाहीय कारण पलिकडच्या प्लॅटफॉर्मवरुन पुन्हा मागे जाणारी पुढची लोकल त्यांना पकडायची आहे. पण या धडपडीत ते एका अर्थी त्यांचं 'मत' त्या नवख्या क्रांतिवीराला देऊन जातात. यात एक धोका नक्की आहे तो म्हणजे, दुसऱ्याच दिवशी सकाळी कदाचीत ह्यांनाच फास्ट ट्रेनमध्ये विंडो सिट मिळते, कानात इअरफोनमधून 'ऑल इज वेल' या गाण्याच्या ओळी वाजत असतात, त्या उर्मीच्या भरात देशाच्या प्रगतीचे पुरावे मांडणाऱ्या सत्ताधिशांचं ट्विट सुद्धा ते रिट्विट करुन टाकतात. तोपर्यंत काल रात्रीचे क्रांतिवीर सर्वच चॅनल्सवर झळकत असतात. त्यांच्या क्रांतीचं पुढे काय झालं हे पहायला आमच्या स्क्रीन वॉरिअर्सकडे वेळच नसतो, पण त्या एका दिवसात देशाने आणखी एक हिरो जन्माला घातलेला असतो. 

यातले काही हिरो हे खरोखरीच एखाद्या विचारधारेसाठी भांडतात पण अनेकजण केवळ उथळ विनोद करुन, स्लॅंग भाषा आणि शिवीगाळ करुन किंवा एखादी अनाकलनीय स्टंटबाजी करुन सोशल मिडीयावर ‘सेन्शेशन’ बनतात. आपल्या आयुष्यातील निरसपणाचा उबग आलेले लाखो लोक या वेगळ्या वाटणाऱ्या माणसामध्ये आपल्या नसलेल्या आयुष्याचे चित्र बघतात, ते एस्थेटिक जरी नसलं तरी रंगीत असतं आणि तेवढंचं त्यांना पुरतं.

या विषयाच्या अनेक सकारात्मक बाजूही आहेतच आणि तितक्याच महत्वाच्या देखील आहेत. अनेक छोट्या-छोटया सामाजिक संस्था याच समाजमाध्यमांच्या जीवावर मोठा पल्ला गाठत आहेत. कैलास सत्यार्थीं सारखी उत्तुंग काम करणारी माणसंदेखील आपल्याला रोज इथं भेटतायत. पण या सगळ्याचा Ratio तितकासा चांगला नाहीय. उद्या जर गोष्टी तशा जुळून आल्याच तर यातलेच काही हिरो संसदेत बसून आपल्या भविष्याची दिशा देखील ठरवतील अगदी आता तिथे बसलेल्या पैकी सुद्धा काहीजण अशातूनच पुढे आलेले आहेत.

तसाही आधी हिरो बनवायचं आणि मग देव बनवायचं हा आपला राष्ट्रीय छंद आहे, आणि त्यात आता, आपल्या हातात देव बनवायची उत्तम व्यवस्था झुकरबर्ग आदी तंत्रज्ञांनी आयती आणून दिली आहेच. यातल्या कोणत्याही हिरोला विरोध असण्याचं काही कारण नाहीय पण महिन्याभरात त्याच हिरोच्या ‘लीक’ व्हिडीओ फुटेजला सुद्धा शेअर करणारे स्क्रीन वॉरिअर्स आहेत, नसल्यास ते तयार करण्याची सोय नक्कीच आहे आणि या सगळ्यात होणाऱ्या नियोजनबद्ध राजकीय हस्तक्षेपामुळे या दोन्ही क्रियांमधील खरेपणावर नेहमीच शंका येत राहणार आहे.

या वर्षीच्या निवडणूका म्हणजे महाभारतापेक्षा मोठं युद्ध होणार आहे आणि युद्ध म्हटलं की पहिला बळी हा सैनिकांचा जातो हा इतिहास आहे. आपल्या कळत नकळत हातातल्या मोबाईलवर आलेले मेसेज फॉरवर्ड करत-करत आपण या युद्धातले स्क्रीन वॉरियर्स बनलोय आणि या धुमश्चक्रीत मुळातच अतीवेगवान झालेल्या आपल्या समाजात त्याहून जास्त वेगाने ‘हिरो’ जन्माला घालतोय. ह्यातून वेळीच थोडं सावरून, खरेखुरे सोशल Reformers आणि सोशल मिडीया Sensations यांच्यातला फरक अधिक ठळक करता आला पाहिजे.

सोशल मिडीयाच्या या जादूई गतीने देशाला India Against Corruption (IAC) सारखी लोक चळवळ दिली आणि तिच्या अनिर्बंध वेगाने त्या चळवळीची शकले देखील केली. पटकन जन्माला येणाऱ्या आणि तितक्याच पटकन लयाला जाणाऱ्या या हिरोजमुळे येणारा काळ हा सर्वच बाबतीत अतिशय अस्थिर असणार आहे. गेल्या अनेक दशकांनी पाहिलेला अतिशय संयत, कर्तव्यकठोर आणि दृढनिश्चयी लोकनेत्यांचा 'काळ' संपून लाईक्सच्या लाटेवर स्वार असलेल्या ‘ट्रेन्डींग’ नेत्यांची अतिशय कमी आयुर्मान असलेली `टाईमलाईन’ आपल्यासमोर उरणार आहे. इच्छा फक्त एकच आहे की या वर्षाच्या शेवटी ‘Largest Democracy‘ चा छाप पुसला जावून `Egg Republic’ चा छाप आपल्या माथी लागू नये. कारण अनेक होउ घातलेले हीरोज, एॅन्टी-हीरोज सध्या आपल्याच आजूबाजूला, आपल्याच फ्रेंड लिस्टस् मध्ये आहेत, त्यातल्या प्रत्येकाच्याच कानात सध्या एकच गाणं दणदणतंय... 'अपना टाईम आएगा' ! 

या सर्वांमधून अंडी बाजूला सारली जावीत आणि खरे चमकदार चेहरे पुढे यावेत हे आपल्या सर्वांसमोरील मोठं आव्हान आहे.

office.varun@gmail.com (लेखक माध्यमतज्ञ आहेत.)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com