Women's day 2019- परंपरा जोपासणारी 'सुपर ऍक्‍टीव्ह वुमन' 

residentional photo
residentional photo

   कौटुंबिक जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत विविध आघाड्यांवर तथा विविध क्षेत्रात आपल्या कर्तबगारीचा ठसा उमटविणाऱ्या महिलांना समाजामध्ये 'सुपर वुमन' म्हणुन संबोधले जाते. कोकणपट्यात अशाच एका सुपरवुमनशी गाठ पडलेल्या आणि आपल्या दिव्य परंपरा जोपासत स्वतःच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या या भगिनीचे गुण पाहून खरोखर थक्कं व्हायला होतं.... 

दोन वर्षापुर्वीची रामनवमी. आमचा मित्रपरिवार सहकुटूंब कोकण पर्यटनासाठी बाहेर पडला होता. मुरुड जंजीरा अलिकडील नांदगाव गावात एका घरगुती लॉजमध्ये आमचा मुक्काम होता. लॉजसमोरच अमृतेश्‍वराचे मंदीर आहे आणि तेथे रामनवमीचे किर्तन सुरु होते. विशेष म्हणजे एक तरूण महिला किर्तनकार किर्तन सादर करीत होत्या. आम्ही सर्वजणांनी त्या किर्तनाला हजेरी लावली आणि रामजन्म होवोस्तर श्रवणभक्ती केली. किर्तन संपल्यावर प्रसाद घेऊन बाहेर पडलो आणि ज्या घरी उतरलो होतो त्यांच्याकडे जेवणासाठी दाखल झालो. जेवणास सुरुवात केली आणि काही वेळाने पहातो तर काय..? आत्ता थोड्या वेळापुर्वी आम्ही ज्यांचं किर्तन ऐकत होतो त्या स्वतः आम्हाला पंगतीमध्ये वाढत होत्या. अगदी तितक्‍याच सहजपणे जितक्‍या सहजपणे त्या किर्तन करीत होत्या. आम्हाला आश्‍चर्यच वाटले. पण त्या या घरच्या मंडळींच्या नातेवाईक होत्या आणि म्हणून त्यांना या कामात पुढाकार घेत मदत करीत होत्या. आम्हा सर्वांनाच हे साधेपणाचे वर्तन खूप भावले कारण ते साधेपणाचे असले तरी असामान्य असेच होते. असो. किर्तनसेवेपश्चात हे सक्रीय योगदान दिल्यावर या किर्तनकार बाई आपल्या मूळगावी निघूनही गेल्या. 

संध्याकाळी अमृतेश्वर लॉजचे मालक जोशी दांम्पत्यांशी चर्चा करतांना अधिक माहिती मिळाली आणि किर्तनकारबाईंबद्दल आमचा आदर अधिकच वाढला. त्यांचं नाव सौ. अवनी गद्रे. इतिहास हा विषय घेऊन बी.ए. झालेल्या. माहेर पनवेलचे. विवाहानंतर रायगड जिल्ह्यातील अष्टविनायक क्षेत्र पाली येथे स्थायिक झाल्या. त्यांचे पती श्री. धनंजय गद्रे हे पौराहित्य करतात तथा ते स्वतः किर्तनकार आहेत. असो. आता पाहुयात अवनीताईंच्या कार्याचा आवाका.....! 

दादर येथील अ.भा. किर्तन संस्था येथून किर्तन विशारद हि पदवी प्राप्त करुन, तथा पती धनंजय यांचे मार्गदर्शन घेत अवनीताईंनी किर्तनसेवेस प्रारंभ केला. नारदीय प्रकारचे किर्तन करणाऱ्या अवनीताईंचे आतापर्यत महाराष्ट्रात मुंबई, नाशिक, ठाणे, पुणे आदी ठिकाणी किर्तने झाली असून मध्यप्रदेशात देखील त्यांनी आपली किर्तनसेवा रूजू केली आहे. आजपर्यत १२५ च्या वर किर्तने सादर करणाऱ्या अवनीताई धार्मिक, पौराणिक, ऐतिहासिक, संत आख्याने आदी अत्यंत कौशल्याने सादर करतात. किर्तन हे जनसंवादाचं एक प्रभावी माध्यम आहे आणि निरोगी समाजासाठी अत्यंत आवश्‍यक असं आहे या उदात्त हेतूने व किर्तनाचा जास्तीत जास्त प्रसार होण्यासाठी अवनीताईंनी श्री बल्लाळेश्‍वराच्या क्षेत्री, म्हणजेच पाली येथे अ.भा. किर्तन संस्थेची शाखा सुरु केली आहे. याठिकाणी होतकरु किर्तनकारांना प्रशिक्षण दिले जाते आणि महिन्यातून एकदा बाहेरील किर्तनकाराचे किर्तन आयोजित केले जात असते. अवनीताई स्वतः 'किर्तन विशारद' नंतर 'किर्तन मधुकर' हा अवघड अभ्यासक्रम पूर्ण करीत आहेत. या व्यतिरिक्त त्या उत्तम लेखन व कविता सुध्दा करतात. तसेच त्यांचा दासबोधाचा सखोल अभ्यास सुरु असून त्या दासबोधाच्या परिक्षा सुध्दा देत आहेत. त्यांना किर्तनसेवेबद्दल 'जिजामाता पुरस्कार' प्राप्त झाला असून अनेक संस्थांतर्फे त्यांच्या कार्याचा गौरव झाला आहे. 

अवनीताईंमध्ये उर्जा तथा उत्साह ठासून भरला आहे कारण या सर्व कामांव्यतिरिक्त त्या त्यांचा केटरिंगचा व्यवसाय यशस्वीपणे चालवतात. त्यांच्या पाली येथील मालकीच्या मंगल कार्यालय व लॉजचे व्यवस्थापन करण्यात पतीराजांना बरोबरीने मदत करतात. घरी आलेल्या पाहुण्यांचे हसतमुखाने स्वागत करत असतात व हे सर्व करत असतांना कौटुंबिक जबाबदाऱ्याही उत्कृष्टपणे पार पाडतात. खरोखरच परंपरा जोपासत, व्यवसाय सांभाळत, कर्तव्ये पार पाडत आपल्या कर्तबगारीचा ठळक असा ठसा उमटविणाऱ्या अवनीताई एक 'सुपर ऍक्‍टीव्ह वुमन'च आहेत. जागतिक महिला दिनी त्यांच्या या प्रेरणादायी कार्याला प्रणाम. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com