Loksabha Election 2019 : राजकारणात तसं सगळं अधांतरीतच

शिवानी खोरगडे
मंगळवार, 12 मार्च 2019

पक्ष कार्यकर्ता वा पदाधिकारी यांची पक्षावरील निष्ठा महत्त्वाची ठरते. अन्यथा आज मुख्यमंत्र्यांना नगर कार्यकर्त्यांनी ऐकवलेली घोषणाबाजीही पक्ष निष्ठा घालविण्याला निमित्त ठरु शकते. 

लोकसभा निवडणूक 2019 मध्ये कोणतीच लाट नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार यांनी आज म्हटले आहे. हे अगदी योग्य असल्याचे चित्र आज दिवसभरातील बातम्यांमधून दिसून आले. राजकारणात तसं सगळं अधांतरीतच असतं, हे देखील नेहमीच आपण बघत आलो आहोत. 

कोण, कधी, कुठे प्रवेश करेल किंवा कुणाची साथ सोडेल हे धक्कातंत्र तर आता भारतीय राजकारणाची ओळख बनले आहे. गेल्या दोन-तीन दिवसात अनेक गोष्टी घडल्यात. राज्यात लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अनेकवेळा राजकीय उलथापालथ बघायला मिळाली. त्यापैकीच एक म्हणजे सुजय विखे पाटील यांना नगरची जागा न मिळाल्याने त्यांनी केलेला भाजप प्रवेश (अधिकृत घोषणा नाही.). काँग्रेसचे विश्वासू नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय हे निवडणूकीसाठी दुसऱ्या पक्षात जाऊन पक्षाविरुध्द बंडखोरी करण्याच्या मार्गावर आहेत. तर दुसरीकडे पुणे महापालिकेतील काँग्रेसचे गटनेता अरविंद शिंदे यांची अनेक वर्षापासून खासदारकी लढविण्याची ईच्छा आहे. पण त्यांचं दुर्दैव असं की ते कॅन्टोनमेंट विधानसभा मतदार संघात येतात. परंतू मागील पाच विधानसभा निवडणूकांपासून हा मतदारसंघ अनूसुचित जातीसाठी आरक्षित असल्यामुळे त्यांना विधानसभा लढवता आली नाही. तरीही त्यांची पक्ष निष्ठा टिकून आहे!

केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी युतीचे गुणगान तर भरपूर गायले. पण युतीकडून 'आठवले' हे या लोकसभा निवडणूकीसाठी 'विसरले' गेल्याची चिन्हे आहेत. कारण युतीने राज्यात रिपब्लिकन पक्षाला एकही जागा दिलेली नाही. तरी 'काँग्रेसच्या जागा साठ ते सत्तरच्या पुढे जाणार नाहीत. याची जबाबदारी माझ्यावर सोपविली आहे,' असे सांगून आठवले यांनी पक्षप्रेम बोलून दाखवले आहे. तर दुसऱ्या बाजूने 'राज्यात आम्हाला एकतरी जागा सोडावी. दक्षिण मुंबईच्या जागेसाठी आम्ही आग्रही आहोत. जागा न सोडल्यास सत्ताही राहणार नाही,' असा इशाराही आठवले यांनी दिला. यावरुन मात्र त्यांच्या पक्षनिष्ठतेवर प्रश्नचिन्ह उभे राहते. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना अल्टिमेटम दिला. आघाडीच्या नेत्यांनी दोन दिवसांत याबाबत निर्णय कळवावा अन्यथा स्वाभिमानी 15 जागांवर स्वतंत्रपणे उमेदवार रिंगणात उतरवेल, असा इशाराच राजू शेट्टी यांनी दिला. दूध दर आंदोलनात सरकारची कोंडी करुन काँग्रेस-राष्ट्रवादीशी सलगी वाढवलेले शेट्टी यांची आगामी निवडणुकीत काँग्रेससोबत जाण्याविषयी चर्चा अंतिम टप्प्यात होती. त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीला त्यांनी दिलेला अल्टिमेटम मित्रपक्षाच्या निष्ठेबाबतच्या अनिश्चिततेबाबत सूचीत करतो. 

प्रत्येक निवडणूकीत तिकीट वाटपावरुन पक्षांना कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या नाराजीला सामोरे जावे लागतेच. पण घराणेशाही हा भाग सोडला तर पक्षाचे काम करणाऱ्याला पक्ष नाराजीत ठेवत नाही, असे अनेकवेळा दिसून आले आहे. कारण एकतर पक्षाचे काम करणाऱ्यामुळे पक्षाचाच निवडणूकीत फायदा होतो आणि दुसरे म्हणजे काम करुन मिळवलेली लोकप्रियता ही वैयक्तिक असली तरी त्याचा बहुतांश फायदा पक्षाला करुन घेण्यास बराच वाव असतो. शिवाय पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांच्याही पक्षाबाबतच्या निष्ठेला धक्का लागत नाही. म्हणून पक्ष कार्यकर्ता वा पदाधिकारी यांची पक्षावरील निष्ठा महत्त्वाची ठरते. अन्यथा आज मुख्यमंत्र्यांना नगर कार्यकर्त्यांनी ऐकवलेली घोषणाबाजीही पक्ष निष्ठा घालविण्याला निमित्त ठरु शकते. 

इतर ब्लॉग्स