Decluttering.. आनंदी आयुष्यासाठी !

शुभदा लोंढे, पुणे
सोमवार, 18 मार्च 2019

.

.

  परवा सहज घर आवरायचं म्हणून एकेक करत कपाटं आवरायला काढली. कुठली वस्तु उपयोगी आहे, कुठली ठेवायला हवी हे सगळं ठरवता ठरवता दुपारच्या जेवणाची वेळ जवळ येऊन ठेपली. मग सर्व पसारा तसाच टाकुन मी उठले आणि स्वयंपाकघरात गेले. फ्रीज उघडला. भाजी कोणती करावी यासाठी भाजीच्या कप्प्यात नजर टाकली तर काही बऱ्याच दिवसांपुर्वीच्या, काही वाळुन गेलेल्या, काही खराब तर काही अगदी थोड्याच की त्यात इतर भाज्यांची भर घालूनच काहीतरी करावं लागणार होतं. सुचतंच नव्हतं काय करावं ते आणि तेवढ्यात माझी मुलगी तिथे आली आणि म्हणाली, 'आई, न लागणाऱ्या गोष्टी का जमा करत बसतेस ग? वेळेत फेकुन का देत नाहीस अशा गोष्टी? का बरं एवढं सारं साठवुन ठेवतेस?'
तिचं बोलणं ऐकलं. मी मनाशीच हसले, पण नकळतपणे त्यावर खोलवर विचार करु लागले.... 

   लेकीचं हे बोलणं मी फक्त कपाटं आणि फ्रीजमध्ये अनावश्यकपणे साठवुन ठेवलेल्या वस्तुंबाबत नाही गृहीत धरलं. या प्रसंगामुळे लगेच माझ्या मनात विचार आला की खरंच आपण आपल्या मनात पण किती निरर्थक गोष्टी जमा करुन ठेवत असतो. त्या सुध्दा वेळोवेळी काढुन टाकायला नकोत का? आयुष्यात अशा कितीतरी गोष्टी असतात ज्या आपण मनात कायमच्या साठवुन ठेवत असतो. आठवुन पहा... 

   कितीतरी प्रसंग आपल्या मनामध्ये कायमचे घर करून असतात. आपण त्यांचा वेळीच निचरा नाही करत. या सगळ्यामुळे नकळतपणे आपल्याला एक प्रकारचा त्रास होत असतो आणि मनावरचा ताणतणावही वाढत असतो. हे कचरारुपि अनावश्यक विचार काहीजणांच्या जीवनात नैराश्य निर्माण करतात तर अनेकांचं जीवन सर्वस्वीपणे व्यापुन टाकतात.
मग आता या सगळ्याचा निचरा कसा करायचा? ही विचारांची जळमटं कशी साफ करायची? उत्तर अगदी सोपे आहे. आपण स्वतःसाठी आवर्जुन थोडा वेळ दिला पाहिजे. आपल्याला नेमकं काय हवं आहे, काय नको आहे, काय फेकुन द्यायला हवं हे एकदा का स्पष्ट झालं की मग बघा आयुष्य कसं सुंदर, आनंदी होऊन जातं आणि हलकं हलकं वाटतं.
शेजारीपाजारी, ऑफिसमधले सहकारी, मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, आणि कधी तर अगदी आपल्याच घरातुन मनामध्ये कित्येकदा नको त्या गोष्टींचा, शब्दांचा कचरा आपण प्राप्त करत असतो आणि तो साठवतही जातो. 
ह्या सगळ्या गोष्टींना अधुनमधुन नीट निरखुन पारखुन मग ठरवायचं असतं की कोणत्या गोष्टी जतन करायच्या आणि जाणायचं असतं की नेमका कशामुळे आपल्याला त्रास होतोय.!
    कुणाचं बोलणं आपल्याला कधीतरी लागलं असेल तर त्या व्यक्तीने त्यावेळी असं का म्हटलं असावं याचा नक्की विचार करावा परंतु मग विचारांती ठरवावं की ते मनात ठेवावं की त्याचाही निचरा करणं गरजेचं आहे. 
जीवनातील नावडत्या गोष्टींचा, विचारांचा तसेच माणसांबाबतचाही आपल्या डोक्यात जो सदैव गोंधळ चाललेला असतो तो मनाबाहेर टाकणे मन:शांतीसाठी आवश्यक ठरते. जर याच त्रासदायक गोष्टी आपण डोक्यात धरुन बसलो आणि मनाची अमुल्य जागा या कचऱ्याने संपूर्णपणे व्यापुन टाकली गेली तर मग नवीन सकारात्मक गोष्टी आपण कशा काय आत्मसात करणार? तसेच कुणाशी वैचारिक चर्चा करतांना, किंवा कुणाला भेटतांना आपण पूर्वग्रह किंवा मनात आढी ठेवुन भेटलो तर नवीन नवीन पोषक विचार कसे काय मनात रुजवणार? आपल्याला हवं तसं आयुष्य साकार करत असतांना प्रथम त्यात जे आवश्यक नाही त्याच्यापासुन कायमची सुटका करुन घेणे ही आनंदी आयुष्याची पहिली पायरी असते. म्हणूनच Let's declutter our mind and live a happy life.

इतर ब्लॉग्स

संपादकीय बातम्या