कारणराजकारण: अजूनही प्रतिक्षा जगणं सुकर होण्याचीच

संतोष शाळिग्राम
Friday, 19 April 2019

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जनमताचा कानोसा घेण्यासाठी सकाळने कारणराजकारण हा उपक्रम सुरू केला. बारामती आणि मावळनंतर तो पुढे घेऊन जाताना मी आणि माझी सहकारी शिवानी खोरगडे हिच्या वाट्याला कॅंटोन्मेंट भाग आला. त्यातील महात्मा गांधी रस्ता म्हणजे एमजी रस्ता, ताडीवाला रस्ता आणि वानवडी येथील लोकांशी बोलून आम्ही फेसबुक लाइव्ह केले. यातून जाणवलेली गोष्ट म्हणजे ही निवडणूक लोकसभेची असली, तरी लोकांचा भर या स्थानिक म्हणजे महापालिका आणि आमदाराने सोडवायच्या प्रश्‍नांवर होता.

रस्ते, पाणी, गटार, शिक्षण हेच त्यांचे प्रश्‍न होते. इतक्‍या वर्षांनंतरही निवडणुका याच प्रश्‍नांभोवती फेर धरतात, ही खटकणारी आणि सत्ताधीशांना विचार करायला लावणारी बाब वाटते. कॅंटोन्मेंट भागात काही वेगळे प्रश्‍न देखील आहेत. हा भाग कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या नियंत्रणाखाली येतो आणि बोर्ड हे संरक्षण दलाच्या नियंत्रणाखाली असते. थोडक्‍यात सांगायचे तर इथे "लष्करी' कायदा चालतो. या भागात अनेक वर्षे जुन्या इमारती आहे. त्यातील काही मोडकळीस आलेल्या आहेत. त्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्‍न महत्त्वाचा आहे. या इमारतीमध्ये राहणारी कुटुंबे विस्तारली आहेत, त्यांना जादा एफएसआय हवा आहे. पण त्यावर निर्णय होत नाही. जकातनंतर एलबीटी वसूल केला जात असे. पण केंद्र सरकारने वस्तू व सेवा कर आणला आणि त्याचा फटका कॅंटोन्मेंट बोर्डांना बसलेला आहे. कराद्वारे मिळणारा दोनशे कोटी रुपयाचा महसूल बुडाल्याने परिसरातील विकास कामांना फटका बसलेला आहे.

ताडीवाला रस्ता येथे सरकारविरोधात रोष पाहायला मिळाला. भाजप विरुद्ध कॉंग्रेस असेच वातावरण तेथे फेसबुक लाइव्ह करताना दिसले. रोजगार, शिक्षणाच्या शिष्यवृत्त्यांचा अभाव, वाढती गुंडगिरी आदी प्रश्‍न लोकांनी मांडले. वानवडी हा भाग बराचसा विकसित आहे. तेथे लोकांनी वाहतूक कोंडीचा प्रश्‍न प्रकर्षाने मांडला. हा प्रश्‍न देखील स्थानिक स्वरुपाचा होता. इथे लोकसभा निवडणुकीची जाणीव करून दिल्यानंतर देशाची सुरक्षा वगैरे गोष्टी लोक बोलू लागले. येथील कल हा विद्यमान केंद्र सरकारच्या बाजूने आढळला. पण ताडीवाला रस्ता आणि एमजी रोड येथे मात्र या उलट स्थिती होती. तेथे संमिश्र म्हणजे थोडं कॉंग्रेस, थोडं भाजप अशी स्थिती जाणवली.

तटस्थ लोकांच्या प्रतिक्रिया खूप महत्त्वाच्या वाटतात. ते लोक म्हणतात, सरकार कुणाचेही येवोत, आमचे जगण सुकर झाले पाहिजे. मूळात निवडणुका, त्याद्वारे लोकप्रतिनिधींची निवड असतेच लोकांचे जगणे सुकर करण्यासाठी. पण लोक अजूनही त्याचीच प्रतिक्षा करीत आहेत.

इतर ब्लॉग्स