Loksabha 2019 : 'मिशन बारामती' विरूद्ध 'टार्गेट मोदी' 

Loksabha 2019 : 'मिशन बारामती' विरूद्ध 'टार्गेट मोदी' 

लोकसभा निवडणूकीतील तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता रविवारी सायंकाळी झाली. लोकसभेच्या 14 मतदारसंघासाठी झालेला हा प्रचार चांगलाच रंगला. व्यक्तीगत टीका हेच वैशिष्ट्य राहिलेल्या या प्रचारात घराणेशाहीला पुढे रेटताना पक्ष बांधिलकीची मुलाहिजा कोणीही बाळगली नाही. एकमेकांवर टीका टिपण्णी करण्यात आणि आरोप-्‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌प्रत्यारोपांचा फुलबाजा उडवण्यावरच प्रचाराचा भर राहिला. त्यामुळे निवडणुकीचे वातावरण खऱ्या अर्थाने तापलेच नाही. पहिल्या दिवसापासून भाजपचे "मिशन बारामती' आणि विरोधकांचे "टार्गेट' नरेंद्र मोदी हेच या प्रचाराचे केंद्रबिंदू घरले. 

पुणे जिल्ह्यातील पुणे आणि बारामती या दोन मतदारसंघासह बहुचर्चित माढा, छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यामुळे सातत्याने लक्षात राहिलेला सातारा, पक्षबदलामुळे गाजावाजा झालेला अहमदनगर, "एमआयएम'ने चुरस निर्माण केलेला औरंगाबाद, प्रथमच राजू शेट्टींना आव्हान मिळालेला हातकणंगले, आघाडीतील अदलाबदलामुळे लक्ष वेधलेला रावेर या सारख्या मतदारसंघातील निवडणुकीचा प्रचार "मोदी' विरूद्ध पवार याच केंद्रबिंदू भोवती फिरत राहिला.
 
महाराष्ट्रात विरोधकांना नामोहरम करण्यासाठी मुळावर म्हणजे "बारामती'वर घाव घालण्याचे नियोजन भाजपने सुरुवातीपासूनच केले होते. त्यामुळेच बारामतीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी देण्यात आली. शरद पवार यांच्या मुशीत वाढलेल्या कुल यांना दिलेली उमेदवारी किंवा सुळे यांच्याविरोधात उभे राहण्याचे कुल यांनी दाखविलेले धाडस हाच पवार यांना भाजपचा पहिला धक्का होता. त्यानंतर संपूर्ण प्रचारात बारामतीसाठी भाजपने सर्व प्रकारची रसद पुरवली. कुल यांना बळ दिले. मंत्री, खासदार-आमदार अशी वीस जणांची बाहेरची फौज बारामतीमध्ये धाडण्यात आली. एका बाजूला ही फौज मतदारसंघात कार्यरत असताना दुसरी बाजूला राज्यातील भाजपच्या पहिल्याच सभेत मोदी यांनी घरातील भांडणांचा उल्लेख करून शरद पवार यांना थेट लक्ष्य केले. पुढे हेच घराणेशाहीवरून डिवचण्याचे सूत्र भाजप-शिवसेनेच्यावतीने कायम राहिले. त्यामुळे सुळे यांना बालेकिल्ल्यात सतत दक्ष राहावे लागले. राज्यातील राष्ट्रवादीच्या बहुतेक सर्व नेत्यांनी बारामती मतदारसंघात कोठे ना कोठे हजेरी लावली. मोदी यांनी बारामतीत सभा घ्यायचे मान्य केले होते, पण ती सभा रद्द झाल्याने उलट सुलट चर्चाही रंगली. यावेळी पवार-मोदींच्या व्यक्तीगत संबंधांचे दाखलेही देण्यात आले. पण मोदींऐवजी अमित शहा यांनी बारामतीत हजेरी लावून या मतदारसंघाबाबत भाजप किती गंभीर आहे हे स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पुण्यातील कोथरूडमधील सभा रद्द करून खडकवासल्यात घेतली आणि प्रचाराचा समारोप इंदापूरमध्ये करून या गांभीर्यात भर घातली.

पुण्यात शरद पवार यांची प्रचारसभा झाली नाही असे सहजा होत नाही, पण यावेळी पुण्यात सभा न घेता पवार यांनी बारामती मतदारसंघ पिंजून काढला. दुसरीकडे राज ठाकरे यांनी मोदींवर चौफेर टीका करीत पवार यांना हवा असणारा परिणाम संपूर्ण राज्यात साध्य केला. ठाकरे यांची पुण्यात झालेली सभा बारामती मतदारसंघासाठीच होती. या सभेतही राज यांनी "मोदी' यांनाच लक्ष्य केल्याने महाराष्ट्रातील लढाई "पवार' विरूद्ध "मोदी' अशीच रंगली.

तिसऱ्या टप्प्यातील प्रचारात ना राज्यातील प्रमुख प्रश्‍नांवर चर्चा झाली ना देशातील. एका बाजूला भाजप पवार यांच्यावर टीका करीत राहिले. दुसरीकडे राज यांनी "लाव रे तो व्हिडिओ' म्हणून प्रचारातही "प्रेझेंटेशन' आणि "टायमिंग'चा अचूक समन्वय साधत प्रचारही हायटेक केला. या अनपेक्षित सर्जिकल स्ट्राईकने भाजपची तारांबळ मात्र उडाली. राज्यात जाणवलेली स्टार प्रचारकांची पोकळी एकट्या राज यांनी भरून काढली. विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे यांसारख्या फर्ड्या वक्‍त्यांची उणीव प्रचारात जाणवली, मात्र यावेळी अजित पवार यांची भाषणेही प्रभावी ठरली. दादांची भाषणे अभ्यासपूर्ण आणि सत्ताधाऱ्यांच्या वर्मावर नेमके बोट ठेवणारी होती. भाजपचा किल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लढविला. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी त्याला रसद पुरवली. पुण्यातील प्रचार "दादा-भाऊ'नी आपापल्या पद्धतीने रेटला.
 
पश्‍चिम महाराष्ट्रात भाजपने सहकार सम्राटांना हात घातला. शक्‍य त्या ठिकाणी कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे नेते आपल्याकडे ओढून प्रचारात रंगत आणली. महाराष्ट्रात कॉंग्रेस हा महत्त्वाचा विरोधी पक्ष असताना भाजपने राष्ट्रवादीलाच सातत्याने लक्ष्य केले. त्यावरून भाजपच्या या पुढील काळातील राजकारणाची दिशा स्पष्ट होते. शेवटच्या टप्प्यात मुंबई, उत्तर महाराष्ट्रातील 17 मतदारसंघ आहेत. पण याप्रचारातही काही वेगळे पाहायला मिळेल असे वाटत नाही. राज्यातील या "पवार' विरूद्ध "मोदी' लढाईचे पुढे नक्की काय होणार, याचा उलगडा 23 मे नंतरच होईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com