लढा दुष्काळाशी : आजीबाईच्या आयुष्यातला दुष्काळ 

सुषेन जाधव 
शुक्रवार, 10 मे 2019

सिंदीफळ (ता. तुळजापूर) येथील वृद्ध आजींच्या आयुष्यातील दुष्काळ मात्र वेगळाच आहे. अगदी जगण्यासाठी संघर्ष करण्याच्या प्रकारातला म्हणावा लागेल. 

औरंगाबाद : हंडाभर पाण्यासाठी वृद्ध, तरुण, चिमुकले वणवण फिरताना, चाऱ्याविना दावणीला बांधलेली जनावरे, बोडकी (उघडी) झालेली शेत शिवारं, भकास झालेली गाव परिसर या शब्दात आपण दुष्काळाची दाहकता व्यक्त करत असतो. पण असं असलं तरी प्रत्येकाचा दुष्काळ मात्र वेगळा आहे. दुष्काळी भागात राहणाऱ्या दुष्काळग्रस्ताचे प्रश्न रोजचे चारा पाणी व्यतिरिक्त आणखी वेगळेही असतात. काहींना नाईलाजाने गावात राहावे लागते, तर काहींना नाईलाजाने गाव सोडावे लागते, कारणं नक्कीच वेगळी असतात. सिंदीफळ (ता. तुळजापूर) येथील वृद्ध आजींच्या आयुष्यातील दुष्काळ मात्र वेगळाच आहे. अगदी जगण्यासाठी संघर्ष करण्याच्या प्रकारातला म्हणावा लागेल. 

... तर रविवारी (5 मे 2019) उस्मानाबाद जिल्ह्यातल्या करजखेडा गावच्या जनावरांच्या बाजारात गेलो. तिथली काही दृश्‍य अजूनही डोळ्यांसमोर जशीच्या तशी दिसताहेत. कधी नव्हे तितका मोठा बाजार भरल्याचे स्थानिक भागातील लोकं सांगत होते. विमल दणके या (सिंदफळ) च्या आजीबाई व्यापाऱ्यासोबत दोन शेळ्यांचा भाव करत होत्या. जरावेळ थांबून आजीला बोललो तसं तिच्या डोळ्याच्या कडा ओल्या व्हायला लागल्या होत्या. याची मला जाणीव झाली तसं खुप प्रश्‍नही उभे राहिले. तुमी का आलाव बाजारात ? या प्रश्‍नानं आजीला काय बोलावं कळत नव्हतं. आजी कसं बसं बोलू लागली, घरात कर्ता माणून कोणीच न्हाय...मालक (पती) मिरचीवर औषध फवारताना नाकातोंडातून वास आत गेल्यानी मेलं. आधीच कर्जाचा डोंगर त्यात लेकानीबी आत्महत्या केलीय, सुन आणि मी राहतावं. कितीबी दुष्काळ पडू द्या पण आपलं माणूस आपल्याजवळ असलं की दुष्काळ जाणवत न्हाय. असं म्हणत आजीबाईचं अवसान गळून गेल्याचं मला दिसत होतं. ही येळ कसीबी टळंल, पण या बारचीनं आल्याला दुष्काळ ईसरण्यासारखा न्हाय असं आजीबाई म्हणत होत्या. तुळजापूरच्या धीरज पाटलानी तीन लेक हैतं म्हणून तीन शेरड्या दिल्त्या, शेरड्यांना मोठं करुन इकतेय त्याच्यावरच जगणं चालंलय. असं सांगताना आजीला भर बाजारात रडू आवरलं नाही. दुष्काळ काय असतो हे बघताना मला मात्र नवी जाणीव होत होती, केवळ चारा पाण्याशी आपलं गणित अडून बसत नाही तर जगण्यासाठी खुप गोष्टी लागतात, याची जवळून ओळख झाली. आजीला बोलून मी बाजारातून निघालो खरा पण आजींचा चेहऱ्यावर सुरकूत्या पडलेला चेहरा, उन्हाने घाम येऊन त्याचेही व्रण पडलेल्या चेहऱ्यावर अजूनही खुप भाव होते, पण आजीबाईला व्यक्त होता येत नव्हते. बायकांना मरता येत न्हाई बाब्या, तिला लाख अडचणी असत्यात तरी ती कायम उभी असते. मग मला बी हूभा ऱ्हावचं लागंल ना ? या आजीसारखेच दुष्काळग्रस्तांचे सगळे प्रश्‍न सुटतील का ? या प्रश्‍नाच्या उत्तराच्या विचारात मी बाजारातून बाहेर आलो.

इतर ब्लॉग्स

संपादकीय बातम्या