आता तरी काँग्रेस राज्यात भाकरी परतणार? 

मंगेश कोळपकर
रविवार, 26 मे 2019

काँग्रेसचा एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या महाराष्ट्रात आता कॉंग्रेसजनांपुढे नेतृत्त्वाचा पेच निर्माण झाला आहे.

काँग्रेसचा एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या महाराष्ट्रात आता कॉंग्रेसजनांपुढे नेतृत्त्वाचा पेच निर्माण झाला आहे. या राज्यात पक्षाचा गाडा जोमाने हाकण्यासाठी नवे नेतृत्त्व पक्ष शोधणार का, दुसऱ्या फळीला संधी देणार, या बद्दल कुतूहल निर्माण झाले आहे. राज्यात एखादी सभा घ्यायची तर, राज्यातील फायरब्रॅन्ड नेता कोण ? , अशीही विचारणा कॉंग्रेस कार्यकर्ते करू लागले आहेत. 

राज्यातील कॉंग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, बाळासाहेब धोरात, राजीव सातव, मुकुल वासनिक, माणिकराव ठाकरे, रजनी पाटील, विलास मुत्तमवार, हर्षवर्धन पाटील हे पहिल्या फळीतील नेते आहेत. गेली अनेक वर्षे याच नेत्यांच्या परिघात राज्यातील कॉंग्रेसच्या नेतृत्त्वाची धुरा आहे. राधाकृष्ण विखे पाटील, नारायण राणे यांची क्षमता होती परंतु, कॉंग्रेसमधील गटबाजी आणि पाय खेचण्याच्या स्पर्धेमुळे ते नाईलाजाने बाहेर पडले. दिल्लीतील राजकारणात राज्यातील नेत्यांना मोठे होऊन द्यायचे नाही, याची परंपरा कॉंग्रेसमध्ये दशकानुदशके जोपासली गेली. त्याचा फटका यशवंतराव चव्हाण, शरद पवार, विलासराव देशमुख यांना अनेकदा बसला. महाराष्ट्र हा एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता, त्यात आता अवघी एखाद-दुसरी जागा मिळते, हा खरा दुर्देवविलास आहे. त्याची कारणे शेकडो आहेत. परंतु, आता तरी पक्ष दुसऱ्या फळीतील युवा नेतृत्त्वाच्या हातात कॉंग्रेस देणार का ? हाच खरा प्रश्‍न आहे. कारण नेत्यांची वये वाढली परंतु, त्या प्रमाणात नवमतदार पक्षात आले नाही. कारण त्यांना आकर्षित करू शकेल, असे राज्यातील नेतृत्त्वच पक्षाने "प्रमोट' केले नाही अन्‌ युवा नेतृत्त्वाला विद्यमान नेत्यांनी फारशी संधीही दिली नाही. तुलनेने राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे आदी युवा चेहरे आहेत. युवक-युवती विभागावर पक्षाने जाणीवपूर्वक लक्ष दिले. परंतु, कॉंग्रेसमध्ये असे काही घडले नाही. 

खरे तर, राज्यात डॉ. विश्‍वजीत कदम, राजीव सातव, सत्यजित तांबे, मिलिंद देवरा, यशोमती ठाकूर, असे नेते आहे. हर्षवर्धन पाटीलही या फळीतून मोठी जबाबदारी पार पाडू शकतात. त्यांना संधी मिळाली तर, दूर गेलेला मतदार पक्षाकडे परत आणण्याची त्यांची क्षमता आहे. संघटनात्मक बांधणीमध्येही नवे चेहरे कार्यरत राहू शकतात. परंतु, त्यांना संधी मिळणार का ? हाच खरा प्रश्‍न आहे..... 

इतर ब्लॉग्स