मोदीमय भारत? 

Narendra Modi
Narendra Modi

17 व्या लोकसभेसाठी सात टप्प्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचे 23 मे रोजी लागलेले निर्णय केवळ अभूतपूर्व नव्हे, तर विरोधकांना नेस्तनाबूत करणारे ठरले. राजकारणात "देअर इज नो अल्टरनेटीव" (पर्यायच नाही), अशी म्हण आहे. त्याला "टिना फॅक्‍टर" म्हणतात. निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत विरोधकांनी देशापुढे सक्षम, एकसंध व विश्‍वासार्ह पर्याय उभा केलाच नाही. त्यामुळे कडबोळे आले, तर देशाचे भवितव्य सुरक्षित राहाणार नाही. स्थिर सरकार मिळणार नाही. नेत्यातील मतभेदांमुळे आर्थिक धोरणे अंमलात येणार नाही, याची खात्री मतदाराला पटली आणि नोटाबंदीमुळे जेरीस आलेला सामान्य माणूस, जीएसटीमुळे नाराज झालेला व्यापारी वर्ग, बेरोगजगारीमुळे निराश झालेला युवक वर्ग व अत्याचारामुळे पिडलेला दलित वर्ग, रस्यावर आलेला व आत्महत्येच्या दुष्ट चक्रातून जाणाऱ्या बळीराजाला मोदींच्या एकाधिकारशाहीचा विसर पडला. मुस्लीम खिजगणतीतही नव्हते. त्यामुळे, भाजपला हिंदूसंह समाजातील प्रत्येक घटकाने घाऊक मतदान केले. 2014 मध्ये मोदी यांच्यामुळे भाजपला 282 जागा मिळाल्या व यंदा ती सीमा पार करून भाजपला 303 जागा मिळून पूर्ण बहुमत मिळाले. राष्ट्रीय आघाडी क्र.3 च्या जागांची संख्या तब्बल 353 वर जाऊन पोहोचली. 2014 मध्ये ती 336 होती. 

निकालांनी विरोधक जसे दिग्मुढ झाले, खचले, तसेच विक्रमी जागा मिळाल्याचे भाजपलाही आश्‍चर्य वाटत आहे. मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा ""भाजपला तीनशे जागा मिळतील,"" असे प्रचारादरम्यान सांगत होते. त्यावर प्रथमदर्शनी विश्‍वास बसत नव्हता. परंतु, विखुरलेले विरोधक, त्यातील प्रत्येक नेत्याची पंतप्रधान होण्याची महत्वाकांक्षा, मोदी विरूद्ध राहूल गांधी, असे निवडणुकीला आलेले स्वरूप, प्रचारातील चिखलफेकीने गाठलेला रसातळ, टीव्ही माध्यमांवरून रात्रंदिवस चाललेले शब्दयुद्ध तर होतेच, परंतु, सात टप्प्यात रेंगाळलेल्या निवडणुकांनी चुरशीचे टोक गाठले. पंतप्रधान मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी केलेला प्रचार कित्येकपटीने राहुल गांधी व अन्य विरोधी नेत्यांना भारी ठरला. निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यापूर्वीच तेलगू देसमचे अध्यक्ष चंद्रबाबू नायडू यांनी दिल्ली गाठून सरकार बनविण्याचा दावा करण्यासाठी भाजपच्या आधी राष्ट्रपतींना भेटण्याची तयारी केली. तथापि, त्यांच्या तेलगू देसमला मतदाराने रस्ता दाखविला. तेलगू देसमला केवळ 3 तर व वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगन मोहन रेड्डी यांना तब्बल 22 जागा मिळाल्या व सत्तेवर येण्याचा मार्ग मोकळा झाला. अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार असताना तेलगू देसम राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील महत्वाचा घटक पक्ष होता. प्रारंभी एनडीए 2- चा ही तो घटक पक्ष होता. परंतु आंध्रला खास राज्याचा दर्जा देण्यास केंद्राने नकार दिल्याने ते बाहेर पडले, त्याचा जबरदस्त फटका त्यांनाच बसला. जगन मोहन रेड्डी मोदी यांना अनुकूल आहेत. परंतु, त्याच्या कारकीर्दीत आंध्रला खास राज्याचा दर्जा मिळेल काय, हे पाहावे लागेल. कारण, मोदी यांना सरकार चालविण्यासाठी रेड्डी यांच्या पाठिंब्याची गरज भासणार नाही. 

मोदींना लाभ मिळाला, तो त्यांनी विकास, हिंदुत्व, राष्ट्रवाद, बालाकोटमधील हल्ला व राष्ट्रीय सुरक्षा या चढत्या भाजणीने केलेल्या प्रचारामुळे. बालाकोटमधील हल्ल्यानंतर त्यांचे कणखर नेतृत्व देशाला दिसले. पाकिस्तानने कैद केलेल्या वैमानिक अभिनंदन थोराती वापसी व पाकिस्तानी दहशतवादी जैश ए महंमदचा म्होरक्‍या मसूद अजहर याला राष्ट्र संघाच्या दहशतवाद्यांच्या यादीत समाविष्ट करण्यास चीनने घेतलेली हरकत मागे घेणे, ही महत्वाची कारणे होत. जनसंपर्काची अत्याधुनिक साधने वापरून केलेले संघटन व प्रभावी प्रचार यांची त्यात भर घातली. तळागाळाच्या पातळीवर रास्वसंघाच्या कार्यकर्त्यांन भाजपच्या समर्थनासाठी बव्हंशी मतदारसंघ पिंजून काढले. 

2014 मध्ये प्रभावी असलेले प्रादेशिक पक्ष यंदा अधिक प्रभावी ठरतील व त्यांच्या पाठिंब्याने भाजपला सरकार स्थापन करावे लागेल, हा अंदाज सपशेल चुकला. उलट, सपा, बसपा, तेलगू देसम, तेलंगणा राष्ट्र समिती, तृणमूल काँग्रेस यांचा दारूण पराभव झाला. यात टिकून राहिले, ते ओडिशाचा बिजू जनता दल व तामिळ नाडूतील द्रविड मुन्नेत्र कझगम व पश्‍चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस हे विरोधक. अण्णा द्रमुकबरोबर केलेल्या समझोत्यात भाजप व अण्णाद्रमुक या दोन्ही पक्षांचे नुकसान झाले. विरोधकांच्या दुफळीमुळे भाजपचा फायदा झाला हे निर्विवाद. 2014 व 2019 मधील निवडणुकातून भाजपने अल्पसंख्याक मुस्लिम, ख्रिश्‍चन यांना स्पष्ट संदेश दिला, की तुमच्या पाठिंब्याची आम्हाला काही एक गरज नाही. त्याविना भाजपला हुकमी बहुमत मिळू शकते. मुस्लिमांमध्ये भयाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांना आश्‍वासित करण्यासाठी की काय पंतप्रधान मोदी यांनी आज संसदीय पक्षाच्या बैठकीत केलेले वक्तव्य महत्वाचे ठरते. काँग्रेसचा उल्लेख न करता ते म्हणाले, ""देशातील अल्पसंख्याकांबरोबर या पूर्वी छल-कपट करण्यात आले. त्यांना भयभीत स्थितीत ठेवले गेले. त्यांच्याकडे केवळ व्होट बॅंक म्हणून पाहिले गेले. त्यांना दूर करून व दाबून ठेवण्यात आले. या गोष्टीलाही आपल्याला भेदायचे आहे. त्यांचा विश्‍वास जिंकायचा आहे. हे मोठे उत्तरदायित्व असेल. जे घोर विरोध करीत आहेत (मुस्लिम) तेही आपलेच आहेत."" मोदी यांनी केलेल्या या वक्तव्याने अल्पसंख्याकांना दिलासा मिळेल. तथापि, ज्या दलित व मुस्लिमांचे "लिंचिंग" करण्यात आले, त्यांना अद्याप कोणताही न्याय मिळाला नाही, त्याचे काय? ज्यांनी अत्याचार केले, ते अद्याप मोकाट आहेत. उलट, मोदी परतल्याने त्यांना आणखी चेव येईल व अल्पसंख्यांकावर व विरोधकांवर हात उचलण्यासाठी त्यांचे हात अधिक सरसवातील, अशी शंका व्यक्त होत आहे. तिचे निरसन केवळ कृतीद्वारे व्हावे लागेल. 

सरकारला बहुमत मिळाल्यानंतर दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात झालेल्या स्वागत समारंभात मोदी यांनी "धर्मनिरपेक्षता" या मुद्यावर भर दिला. काही वर्षांपूर्वी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांनी काँग्रेसच्या तथाकथित धर्मनिरपेक्षतेला "बेगडी धर्मनिरपेक्षता" (स्यूडो सेक्‍युलॅरिझम) हे शब्द वापरले होते. भाजप आज त्यावर कायम आहे. याच बेगड्या धर्मनिरपेक्षतेपायी मुस्लिमाचे तुष्टीकरण काँग्रेसने वर्षानुवर्ष केले. त्यांना नेहमी रास्वसंघ व भाजप सत्तेवर येण्याचे भय दाखविले व त्यांची मते घेतली. परंतु, काँग्रेसच्या या धर्मनिरेक्षतेला तडा गेला, तो भाजपने बाबरी मशिद पाडली तेव्हा. त्यावेळी काँग्रेसचे पी.व्ही.नरसिंह राव यांचे सरकार केंद्रात होते. त्यांनी भाजपबरोबर हातमिळवणी करून बाबरी पडेपर्यंत कोणतीही कारवाई केली नाही, असा जाहीर आरोप झाला. तेव्हापासून मुस्लिमांचा काँग्रेसवरील विश्‍वास उडण्यास सुरूवात झाली. ती भावना 2019 च्या निवडणुकात आणखी पक्की झाली. कारण, भाजपच्या नेत्यांप्रमाणेच राहुल गांधी, दिग्विजय सिंग व अन्य नेत्यांनी मंदिरांच्या वाऱ्या सुरू केल्या, होमहवन सुरू केले व "मी हिंदू अधिक की तू "" अशी अहममिका सुरू झाली. भाजपचे नेते पहिल्यापासूनच देवभक्त, मंदिरात जाणारे असल्याने, काँग्रेसची स्पर्धाही हिंदू मतदारांप्रमाणे, मुस्लिम मतदारालाही "बेगडी धर्मनिरपेक्षता" वाटली. परिणामतः मुस्लिमांची एकगठ्ठा मते काँग्रेसला न मिळता, ती काँग्रेस, सपा, बसपा, तृणमूल काँग्रेस व काही प्रादेशिक पक्षात विखुरली गेली. व त्यांचा लक्षणीय लाभ या पक्षांनाही झाला नाही. निवडणूक पूर्व प्रसिद्ध झालेल्या "एक्‍झिट पोल्स (जनमत चाचण्यातून)" वर्तविलेले अंदाज बऱ्याच अर्थी खरे ठरले. 

प्रश्‍न आहे, तो काँग्रेसने अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण केले, तसेच, भाजपने हिंदूंचे तुष्टीकरण केले की नाही. याचे उत्तर होकारार्थी द्यावे लागेल. दलित, अनुसूचित जाती जमाती, शेतकरी, युवा, महिला यात हिंदूंचेच प्रमाण सर्वाधिक आहे. त्यांची एकगठ्ठा मते आपल्या बाजूने वळविण्यात मोदी यशस्वी झाले. 2009 ते 2014 पर्यंत काँग्रेसला जनतेने दोनदा जसा कौल दिला, तसा कौल आता भाजपला पुढील पाच वर्षांसाठी मिळाला आहे. मोदी म्हणतात, "" जनतेच्या आकांक्षा वाढल्या आहेत, गाफील राहून चालणार नाही."" हे खरे आहे. म्हणूनच, गेल्या चार वर्षात असंख्य आश्‍वासने देऊन भाजपने जनतेला जसे मृगजळ दाखविले, तसे मृगजळ दाखवून आता चालणार नाही. त्यांच्या विजयाला "नमोत्सुनामी" असे चपखल नाव देण्यात आले आहे. त्सुनामी अत्यंत विनाशकारी असते, समुद्राच्या पाण्याखालून येणाऱ्या त्सुनामीचा वेग ताशी बाराशे कि.मी असू शकतो. ती लाट दिसत नाही. पण, किनाऱ्यावर आपटाच तिच्या टप्प्यात काही शिल्लक राहात नाही. काँग्रेससह विरोधी पक्षांचे नेमके तेच झाले आहे. काँग्रेस हरला म्हणून पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी राजिनामा देऊ केला व नेहमी प्रमाणे काँग्रेसच्या कार्यकारिणीने तो फेटाळला. त्यात कुणालाही आश्‍चर्य वाटले नाही. स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांना पराभूत केल्याने त्यांच्यासाठी अमेठी आता केवळ "एक स्मृती" उरली आहे, असेही ट्विट झाले. उत्तर प्रदेशातून केवळ सोनिया गांधी निवडून आल्या, हे पक्षाच्या काही वर्षांपासून चाललेल्या ऐतिहासिक घसरणीचे (हिस्टॉरिक कोलॅप्स) द्योतक होय. आज ज्या स्थितीत काँग्रेस पक्ष आहे, त्याची पुनरबांधणी करण्यासाठी किमान दहा वर्षे लागतील. नेहमीप्रमाणे तो सोनिया, राहुल व प्रियांका याभोवती घोटाळत राहिला, तर पुढच्या सार्वत्रिक निवडणुकीत उरलेला पक्षही संपुष्टात येईल. महाराष्ट्रात तेच झाले. काँग्रेसला 48 पैकी केवळ एक जागा मिळाली. तसेच, तब्बल बारा राज्यात काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही. सारांश, भाजपने आज काँग्रेसची देशातील सर्व जागा आपल्या ताब्यात घेतली आहे. राज्यघटनेनुसार भारत हा पाकिस्तान वा अफगाणिस्तानसारखा धर्माधिष्ठित देश नसला, तरी वाटचाल प्रखर हिंदुत्वाच्या दिशेने होणार, असे दिसते. अशा परिस्थितीत, भारताचे वैविध्य, पुरोगामित्व, उदारमतवाद धोक्‍यात येणार काय, हा महत्वाचा प्रश्‍न आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com