मराठी 'त्रिज्या' पोहचल्या चीनमध्ये

Trijya
Trijya

'एशियन न्यू टॅलेंट ऍवॉर्ड'साठी 'त्रिज्या' या मराठी चित्रपटाची निवड झाली आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट छायांकन या पुरस्कारांसाठी 'त्रिज्या'चं नामांकन झालं आहे. चीनमधील एका महत्त्वाच्या चित्रपट महोत्सवापासून 'त्रिज्या'चा प्रवास सुरू होतो आहे. या चित्रपटाच्या तरुण दिग्दर्शकाचं मनोगत. 

'एशियन न्यू टॅलेंट ऍवॉर्ड' या मानाच्या पुरस्कारासाठी जगभरातून विविध भाषांमधले चार हजार सिनेमे येतात. त्यातून निवडले जातात दहा आणि त्यातून अंतिम फेरीत पोचतात सहा. त्यात 'त्रिज्या' हा भारतीय चित्रपट असणं आणि तोही मराठी; ही बाब मराठी आणि भारतीय सिनेरसिकांसाठी आनंदाची आणि अभिमानाची आहे. 'त्रिज्या' या माझ्या डोक्‍यातल्या सूक्ष्म कल्पनेचा वैश्विक प्रवास मांडण्याचा प्रयत्न येथे केला आहे. 

मी मूळचा कर्नाटकातील इंडी गावातला. आमचं घराणं लोककलावंतांचं. पारंपरिक कलेच्या आणि जगण्याच्या नव्या शक्‍यता शोधत, स्थलांतर अपरिहार्य होऊन आमचं कुटुंब सोलापूरात आलं. तेथे स्थिरावल्यावर, मी वयाच्या सोळाव्या वर्षी पुणं गाठलं आणि वेगवेगळ्या सांस्कृतिक प्रवाहांशी स्वतःची ओळख करून घ्यायचं ठरवलं. त्यातच नाटक- सिनेमा बघणं आवडतं आहे, असं लक्षात यायला लागलं. सिनेमा करायचा हे मनाशी पक्कं होत गेलं ते त्यातूनच. सिनेमाच्या तंत्राचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेऊन, यातच काहीतरी करू हे ठरवलं आणि त्या दिशेनं वाटचाल सुरू झाली. 

पुण्यातील 'फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट'मध्ये प्रवेश घेतला आणि तिथं शिक्षण घेतानाच 'त्रिज्या'चं बीज डोक्‍यात रुजलं. फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये जगभरातले सिनेमे पाहत होतो, समजून घेत होतो. ते बघितल्यावर माझ्या अवतीभोवती ज्या पद्धतीचा सिनेमा तयार होत होता, तसा सिनेमा बनवणं आपल्याला शक्‍य नाही, हे सर्वप्रथम लक्षात आलं. आपलं जगणं, भवतालचं वास्तव, आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी, यांना साद-प्रतिसाद देत ते जगासमोर मांडणं हे सिनेमाचं प्रमुख काम आहे, असं मी मानतो. त्या पद्धतीचा सिनेमा मराठीत कुठंच दिसत नव्हता. जगभरातल्या वेगवेगळ्या सिनेमासंस्कृती आणि त्यातले वेगवेगळे प्रवाह बघत गेल्यानंतर काही गोष्टींची कल्पना येत गेली आणि आपण नेमका कोणत्या तऱ्हेचा सिनेमा करणार, याची जाणीव गडद होत गेली आणि 'त्रिज्या'चा पहिला आराखडा तयार झाला. 

सिनेमा बनवणं म्हणजे नेमकं काय, या प्रश्नाचा शोध घ्यायचा प्रयत्न केला, तेव्हा आजच्या आधुनिक जगातल्या तरुणांना आपलीशी वाटेल, त्यांच्यातली प्रचंड ऊर्जा सामावून घेण्याची क्षमता अंगी बाळगेल, अशी कला निर्माण करणं हे माझं प्रथम उद्दिष्ट असल्याचं लक्षात आलं. मी व्यक्तिगत आयुष्यात अनुभवलेला स्थलांतरानंतर येणारा ताण, शहरात तेही बहुसांस्कृतिक शहरात आल्यानंतर जाणवणारी अस्वस्थता सिनेमाच्या माध्यमातून व्यक्त करायचं ठरवलं. सिनेमाचं नाव 'यात्रा' असं सुरवातीला ठरवलं. सिनेमातलं मुख्य पात्र कवीचं असल्यानं पोटापाण्यासाठी त्याला करावी लागणारी पत्रकारिता आणि आयुष्यातल्या निरर्थक भटकंतीत आपल्याला आपली वाटेल अशी जागा कुठे आहे का, असेल का, या प्रश्नांचा शोध ही चित्रपटाची मध्यवर्ती संकल्पना असल्यानं 'यात्रा' हे नाव बदलून 'अरण्य' आणि नंतर 'त्रिज्या' हे नाव अंतिम झालं. सिनेमातील कवीची प्रमुख भूमिका अभय महाजननं साकारली. 

चित्रीकरण पूर्ण होण्याआधीच सन्मान 
महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागांत जाऊन 50 दिवसांत, प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीत आणि तुटपुंज्या बजेटमध्ये सिनेमाचं चित्रीकरण केलं. दक्षिण आशियातून पाच सिनेमे NFDC work in progress मध्ये निवडले जातात. आशियातल्या महत्त्वाच्या सिनेमांत चित्रीकरण पूर्ण व्हायच्या आधीच 'त्रिज्या'ची निवड झाली, तेव्हाच एका अर्थानं सिनेमाची 'त्रिज्या' विस्तारायला सुरवात झाली. 'चित्रकथी निर्मिती'चे अरविंद पाखले निर्माते म्हणून सोबत होतेच. त्याच वेळी थेट जर्मनीहून, 'आम्हाला या सिनेमासोबत जोडलं जायची इच्छा आहे,' असा मेल आला, मग काय गगनच ठेंगणं झाल्यासारखं वाटलं. 'त्रिज्या'नं मराठीच काय, तर भारतीय वर्तुळही विस्तारून टाकलं. बॉम्बे बर्लिन फिल्म प्रॉडक्‍शन ही चित्रपट बनवणारी संस्था 'त्रिज्या'साठी निर्माती झाली. त्या संस्थेच्या कथारीना झुकाले आणि अर्फी लांबा यांनी 'त्रिज्या' वेगवेगळ्या देशांत घेऊन जायला सुरवात केली. सिनेमाची पहिली प्रिंट तयार झाल्यानंतरही काही दिवस आम्ही पुन्हा एडिटिंग करून, काही भाग नव्यानं चित्रित करून नवी आवृत्ती तयार केली. आशियातील सर्वात मोठा चित्रपट महोत्सव मानल्या जाणाऱ्या बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'प्लॅटफॉर्म बुसान' या कार्यक्रमात 'त्रिज्या'विषयी बोलण्यासाठी मला दक्षिण कोरियातून बोलावण्यात आलं. विचारांचं आणि सिनेमाच्या जाणिवांचं तिथं झालेलं शेअरिंग दिग्दर्शक आणि माणूस म्हणून समृद्ध करणारं होतं. 

सिनेमा बनवताना दिग्दर्शक या नात्यानं आपण विशिष्ट गोष्टी रचत असतो. त्या गोष्टींना प्रेक्षकांकडून नेमका काय प्रतिसाद मिळेल, हे थिएटरमधल्या अंधारात, वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या प्रेक्षकांसोबत अनुभवणं, त्यांचे श्वास-निश्वास, हसणं-रडणं ऐकणं, वेगवेगळ्या भाषांमधील सिनेसंस्कृती समजून घेणं, हे सर्व काही सिनेमा करण्याइतकंच रोचक असतं. दिग्दर्शक म्हणून तुम्ही तयार केलेला सिनेमा प्रेक्षक पडद्यावर बघतो, तेव्हा तो मनातल्या मनात तोच सिनेमा वेगवेगळ्या पातळ्यांवर रचत जात असतो. सिनेमा करण्याइतकाच हा अनुभव जपून ठेवावा असा असतो. अशा अनेक अनुभवांना सामोरं जात "त्रिज्या'चं चित्रीकरण पूर्ण केलं. 

प्रेक्षकांपर्यंत पोचण्याची गरज 
आजच्या काळात चांगला सिनेमा तयार करणं या गोष्टीइतकीच तो सिनेमा व्यवस्थित पद्धतीनं लोकांपर्यत, रसिकांपर्यंत घेऊन जाणं ही गोष्ट महत्त्वाची आहे. 'त्रिज्या' तयार झाल्यानंतर तो प्रदर्शित कुठे करायचा, जगात तो पहिल्यांदा कुठे दाखवायचा, याचा शोध आम्ही घेत होतो. त्यातच अचानक एके दिवशी शांघायहून मेल आला. 'एशियन न्यू टॅलेंट ऍवॉर्ड'साठी त्यांनी 'त्रिज्या'ची निवड केली होती. सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट छायाकंन या तीन महत्त्वाच्या पुरस्कारासाठी 'त्रिज्या'ला त्यांच्याकडून नामांकनं देण्यात आली.

आशियातील एका महत्त्वाच्या चित्रपट महोत्सवापासून 'त्रिज्या'चा प्रवास सुरू होतो आहे. पुण्या-मुंबईच्या पलीकडे जाऊन माझ्यासारखी मध्यमवर्गीय घरातून आलेली तरुण मुलं दिग्दर्शक होत आहेत. मराठी सिनेमाचं स्वरूप केवळ नाचगाणी आणि क्षणिक मनोरंजनाचं साधन यातच घुसमटलेलं असल्यानं, त्यातून बाहेर पडून स्वतःला हवा तसा सिनेमा करणं, कलात्मक तडजोड न करताही, प्रेक्षकांना काय आवडेल याची सांगड घालणं आणि ही तारेवरची कसरत करत मराठी सिनेमा मानवी जीवनाचा वास्तववादी आरसा म्हणून जगासमोर आणणं गरजेचं आहे. खरंतर ही कसरतच तुम्हाला वेगवेगळी आव्हानं देत असते आणि कलानिर्मितीमध्ये येणारी आव्हानंच नवं काही करायला ऊर्मी देत असतात. ही 'त्रिज्या' सतत विस्तारित राहावी यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहू. परंतु, नव्या ऊर्जेचा, नव्या चित्रपटीय भाषेचा, नव्या भौगोलिक स्थानांचा सिनेमा मराठीत सातत्याने तयार होत राहील, तेव्हाच मराठी चित्रपटाची त्रिज्या सर्वार्थाने विस्तारली असं म्हणता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com