वारी : एक अनामिक ओढ

शिवाजी राऊत
Sunday, 30 June 2019

वारी हे संमोहन आहे, वारी ही सामाजिकता आहे. वारी हा विरंगुळा आहे, वारी ही ऐक्य भावना आहे. वारी पाहुणचार आहे, वारी हे भागवत संप्रदायाचे संचित धन आहे. वारी हा अवेदिकांचा इतिहास आहे, वारी हे भक्तिबंदी विरोधातील बंड आहे, वारी विषमतेचा चालू ठेवलेला जनव्यवहार आहे. वारी हा बहुजन भक्ती व्यवहार आहे, वारी हे समूहाचे नव्हे, तर अखिल महाराष्ट्राची तीर्थस्थान भटकंती आहे, वारी हे महाराष्ट्राचे अभिसरण आहे.

ओढ ही कळते म्हणून असते का? ओढ ही आतून असते, ती पूर्व संस्कार घेऊन येते. टाळ आणि बुक्का हेच पाहणं, वीणा पाहणं, पावल्या खेळणं, पखवाज ऐकून थांबणं हे मनाचे खेळ असतात आणि भक्ती संप्रदायाचा प्रभावही असतो. हे संगीताचे कान व मनाचे संस्कार कोणी केले, त्याचा आणि मन प्रसन्नतेचा संबंध असतो. यातना, अपमान, निंदा विसरता येतात, दुःख हे ठेव आहे, हे इथे वाटून राहते. दुःख हा भोग आहे, दुःख हे पूर्व कर्म आहे, अशी भावना खोल रुजविणारी ही भक्ती भेदाचा विचार करू देत नाही. ती दुःखाला व्यवस्था कारणीभूत आहे, हेही सुचू देत नाही. ही भक्ती बेभानपणा देते, बेहोशी देते, फार मोठा परमानंद देते. असे सारे मनाचे खेळ भक्तीच्या अज्ञान अवस्थेत चालू राहतात. त्यातून एका अवीट गोडीचे समाधान मिळत आहे, असेही मानण्यात येते. 

वारी हे संमोहन आहे, वारी ही सामाजिकता आहे. वारी हा विरंगुळा आहे, वारी ही ऐक्य भावना आहे. वारी पाहुणचार आहे, वारी हे भागवत संप्रदायाचे संचित धन आहे. वारी हा अवेदिकांचा इतिहास आहे, वारी हे भक्तिबंदी विरोधातील बंड आहे, वारी विषमतेचा चालू ठेवलेला जनव्यवहार आहे. वारी हा बहुजन भक्ती व्यवहार आहे, वारी हे समूहाचे नव्हे, तर अखिल महाराष्ट्राची तीर्थस्थान भटकंती आहे, वारी हे महाराष्ट्राचे अभिसरण आहे. वारी पुर्वासुरीचे पूजन आहे, वारी ही जातीनिहाय संतांची आठवण आहे, वारी हा मेळा आहे, वारी भक्ती संप्रदायातील एक संघर्ष इतिहास आहे. वारी एक महाराष्ट्राचे भौगोलिक जनव्यवहाराचे अधीर मन आहे. वारी हे आध्यात्मिक मार्गस्थ जगणं आहे, वारी हा निवृत्ती वाद आहे आणि वारी हा संसार मोहापासूनचा सुटकेचाही मार्ग आहे. वारी हे ग्रामीण महाराष्ट्र्राचे गावोगावचे पारंपरिक भक्तिरूप आहे. वारी ही पर्यायी भक्ती चळवळ अन् चिकित्सा केले गेलेले श्रध्दा संचित आहे. वारी हे चातुर्वर्ण्य व्यवस्थेचे अबाधित नाम संकीर्तन जनसागर रूप आहे. जे विठ्ठल नामात विलय पावते, ते विसरून जाते. साऱ्या समस्या आणि यातना म्हणून वारी अहिंसक भक्ती चळवळ आहे. 

अहिंसाकता हे वारीचे सर्वश्रेष्ठ गुण दर्शन आहे. इथे सर्व भक्ती निरामय नाही, इथे भक्ती याचना विहिन नाही, पण वारी ही याचना आणि शपथा विहिन आहे. इथे विठ्ठलास नवस नाही, इथे यज्ञ नाही, इथे यज्ञात हवन नाही, वारीत दान नाही, दानाची सक्ती नाही. इथे विठ्ठलास पाहून नेत्र सुख घेणे आहे, सावळा विठ्ठल हा सखा आहे. इथे विठ्ठलाशी भांडण आहे, त्याच्याशी हट्ट आहे, रुसवा आहे, गळाभेट आहे. इथे लहान-थोर नाही, इथे दिसेल त्यास ज्ञानेश्वर माऊली रुपात सन्मान आहे. इथे भेदापलीकडचे भक्तिमय जीवन आहे. इथे गरीब व श्रीमंत हा फरक नाही. इथे दिंड्या आणि पताकांचा जयघोष आहे, इथे तुळशीच्या माळांचे अनन्य महत्त्व आहे आणि अविरत पूजन चालू आहे. वारीत चंदन आणि तुळस हे भक्तिपूजन, साधनशास्र व इतिहास रूप आहे. वारी ही घराण्याच्या परंपरेची वारसाहक्क मिळकत आहे. वारी शेत व घरापासूनची 'चार घूँट की फुरसद' सुटका आहे. वारी हे भक्ती प्रसार व प्रचाराचे माध्यम आहे, गावोगावचा ऐक्य भाव आहे. वारी स्त्रियांना घराबाहेर नेण्याची व पडण्याची संधी आणि भक्तिरुपी बाजारहाटाची संधी आहे. वारी देव मुक्तीचे एक प्रांगण आहे. देव व भक्त यामधील नष्ट झालेली दरी अर्थातच भिंत म्हणजे वारी होय.

वारी हा चिकित्सा झालेला संतनिहाय, कालखंडनिहाय आणि न मांडला गेलेला एक हजार वर्षांचा ऐतिहासिक ठेवा आहे. महाराष्ट्राची वारी हे संशोधनाचे साधन आहे. तसेच ते संचित विवेकशील बनविणे, ते हिंसेच्या 'श्रीराम'कडे न जाऊ देणे आणि 'जय श्रीराम' म्हणत हत्या करण्यासाठी कोणी घुसखोर वारीचा वापर तर करणार नाही ना? अशी भीती वाटते. त्यासाठी माऊलींच्या संविधानवादी नव्या वारसदारांनी पुढे येणे आवश्यक आहे. स्वातंत्र्य हे लोककल्याणासाठी वापरून त्यातून सार्वभौम शक्तीला घडवू या. आणि शांती, सद्भावरुपी वारीला जगणं बनवूया. वारी हे प्रबोधनाचे अवकाश आहे. तो राजकारण विरहित भक्तिसागर आहे. ग्रामस्वराज आणि व्यसनमुक्त भारत घडविण्यासाठी वारीचे उपयोजन करणे, हे महत्त्वाचे आहे. समता व शांतीचा भारत तसेच महाराष्ट्र उन्मादांपासून मुक्त होवो, हिंसेचे सत्ताकारण हे सूडाचे कारण आहे, हे समजणारी निरपेक्ष बुद्धी प्राप्त होवो, अशी संविधान वारकऱ्यांची वैष्णवजनाकडे मागणी आहे.

इतर ब्लॉग्स