विधानसभेचे मतदान18 ते 20 ऑक्‍टोबरदरम्यान

vidhan bhawan
vidhan bhawan

सणासुदींच्या धामधुमीच्या काळात मतदानाच्या तारखा ठरविताना अनेक गोष्टी विचारांत घ्याव्या लागतात. विधानसभा निवडणुकीत उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी नवरात्रोत्सवात संधी मिळण्यासाठी, तसेच त्यांना प्रचारालाही पुरेसा वेळ द्यावयाच्या झाल्यास मतदानाची तारीख 18 ते 20 ऑक्‍टोबरदरम्यान निश्‍चित होण्याची शक्‍यता आहे. 

विधानसभेच्या 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीच्या घोषणा गणेशोत्सवानंतर 12 सप्टेंबरला झाली. त्या दिवशी आचारसंहिता सुरू झाली, अन्‌ 20 ते 27 सप्टेंबरदरम्यान उमेदवारी अर्ज भरण्याची, तर एक ऑक्‍टोबरपर्यंत माघार घेण्यास मुदत होती. मतदान 15 ऑक्‍टोबर रोजी घेण्यात आले. मतमोजणी दिवाळीपूर्वी 19 ऑक्‍टोबर रोजी झाले, अन्‌ राज्यात सत्तांतर झाले. दिवाळीचा प्रारंभ 21 ऑक्‍टोबरला धनत्रयोदशीने झाला. दिवाळीनंतर 31 ऑक्‍टोबरला भाजपच्या मंत्रीमंडळाचा शपथविधी पार पडला. नवरात्राची घटस्थापना 25 सप्टेंबरला झाली होती. त्याच दिवशी भाजप-शिवसेनेची युती तुटली, तर कॉंग्रेस - राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी भंगली होती. शेवटच्या दोन दिवसांत सर्व प्रमुख पक्षांनी राज्यभर उमेदवार उभे केले. राज्यात पंचरंगी लढती झाल्या. हे लक्षात घेतले पाहिजे, की 2014 च्या निवडणुकीत पितृ पंधरवड्यात फारसे अर्ज दाखल झाले नव्हते. नवरात्राच्या तीन दिवसांत उमेदवारांचे अर्ज भरले गेले. दिवाळीपूर्वी निकालाची प्रक्रिया पूर्ण झाली होती. म्हणजेच त्यावेळी सणाच्या तारखा विचारात घेतल्याचे दिसून येते. 

निवडणुकीच्या तारखा ठरविताना त्या विधानसभेचा कार्यकाळही लक्षात घ्यावा लागतो. 2014 मध्ये महाराष्ट्र विधानसभेची मुदत आठ नोव्हेंबरला, तर हरियाना विधानसभेची मुदत 27 ऑक्‍टोबरला संपणार होती. यंदा 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेची मुदत नऊ नोव्हेंबरला, तर हरियाना विधानसभेची मुदत दोन नोव्हेंबरला संपणार आहे. त्यामुळे 24 ऑक्‍टोबरपर्यंत मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे. 

सणांच्या तारखांवर नजर टाकल्यास, गणेशोत्सव दोन ते 12 सप्टेंबरदरम्यान आहे. नवरात्र 29 सप्टेंबरला (रविवारी) सुरू होत असून, दसरा आठ ऑक्‍टोबरला आहे. दिवाळीचा प्रारंभ वसुबारस व धनत्रयोदशी एकाच दिवशी 25 ऑक्‍टोबरला होत आहे. लक्ष्मीपूजन 27 ऑक्‍टोबरला (रविवारी) आहे. हे लक्षात घेतल्यास, 23 ऑक्‍टोबरपर्यंत मतमोजणी होऊ शकते. त्यापूर्वी चार-पाच दिवसांत मतदान होईल. 

नवरात्राच्या प्रारंभी उमेदवारांना अर्ज भरण्याची संधी हवी असल्यास, एक ऑक्‍टोबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत ठेवावी लागेल. त्यानंतर अर्जांची छाननी व माघारीसाठी मुदत ठेवून प्रचाराला किमान दोन आठवडे संधी द्यावी लागेल. त्यामुळे मतदानाची तारीख 17 ऑक्‍टोबरनंतरचीच राहण्याची शक्‍यता आहे. गेल्या वेळेप्रमाणे 15 ऑक्‍टोबरला मतदान ठेवल्यास, उमेदवारांना पितृ पंधरवड्यात अर्ज दाखल करावे लागतील. त्याचा अनेक राजकीय कार्यकर्त्यांकडून विरोध होण्याची शक्‍यता आहे. 

गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदाची दिवाळी चार दिवस उशिरा सुरू होत आहे. त्यामुळे, निवडणुकीची मतदानाची तारीखही गेल्या वेळेपेक्षा पुढे ढकलण्याची संधी आहे. त्यामुळे निवडणुकीची घोषणा 15 ते 20 सप्टेंबरच्या दरम्यान होऊन आचारसंहिता लागू होईल, असा अंदाज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com