माणुसकी जागवणारा सीमाज  प्रोजेक्ट  

सचिन शिंदे
शुक्रवार, 5 जुलै 2019

जे का रंजले गांजले
त्यासी म्हणे जो आपुले
तोची साधु ओळखावा 
देव तेथेची जाणावा...

जे का रंजले गांजले
त्यासी म्हणे जो आपुले
तोची साधु ओळखावा 
देव तेथेची जाणावा...

जगदगुरु संत तुकोबारायांचा अभग अनेकार्थाने महत्वाचा व तितकाच दिलखेचक आहे. वाचताना किंवा त्या वाक्याला ब्रीद म्हणून लिहीताना बरे वाटते. मात्र तसे आचरण करणारे किती याचे उत्तर शोधूनही मिळत नाही. मात्र इंदापूर तालुक्यातील बोरी गावात हाच अभंगप्रमाणेच काम करून तो प्रत्यक्षात आणण्याचा अत्यंतिक प्रेरणादायी काम झाले आहे. बोरी गावच्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सीमा वाघमोडे व त्यांचे पती शिरीष वाघमोडे यांनी बोरीच्या माळरानावर माणसूकीच्या नात्यांचा उत्सव सुरू केला आहे. जवळपास कसलीच मानवी वस्ती नसलेल्या माळरानावर पुण्यातल्या रेडलाईट एरीयातील वंचित मुलांना मम्मी, डॅडी, आजी आणि असंख्य मामा मिळवून दिले आहेत. जगभरातल्या दानशूरांनी कोट्यवधींची ओंजळ रिती करीत माळरानाला माणूसकीचे नंदनवन बनवायला हातभार लावला...! 

संत तुकोबारांच्या पालखीने काल इंदापूर तालुक्यात प्रवेश केला. मजूरीपासून निर्यातदारापर्यंत उंचच उडी घेणार गाव म्हणजे बोरी. आणि बोरी म्हटले की, द्राक्षबागांचे आगार व शेकडो शेततळी समोर येतात. तेथील  पाषाणाला पाझर फोडून त्यातून हिरवे सोने पिकविणाऱ्या गावात माणुसकी पिकवणारा प्रोजेक्ट उभा राहिला आहे. ज्यातून माणुसकीच्या सीमा पार जपल्या आहेत. सीमा व त्यांचे पती शिरीष वाघमोडे यांनी बोरीत पिकवलेली माणुसकी बहरत आहे. सीमा व पती शिरीष वाघमोडे दांपत्याने बोरी येथील मालकीच्या शेतावर `सीमाज प्रोजेक्ट` उभारला आहे. एखाद्या गर्भश्रीमंतालाही लाजवेल असे ५० मुला-मुलींच्या क्षमतेचे `घर` येथे उभारले असून सध्या या घरात ३० मुले निवासी आहेत. बालवाडीपासून ते दहावीपर्यंत वेगवेगळ्या वयोगटातील ही मुले बोरी येथील प्राथमिक शाळा, हायस्कूलमध्ये शिकत आहेत. गावातील जो कोणी या `घरा`ला भेट देण्यासाठी येतो, तो प्रत्येक व्यक्ती या मुलांचा मामा असतो. सीमा वाघमोडे यांना आजी, शिरीष यांना डॅडी, तर रेक्टर असलेल्या मेरी या मुलांसाठी मम्मी आहेत. या मुलांच्या अत्याधुनिक निवास व्यवस्थेसाठी स्कॉटलंड येथील अॅलन कायरान व पेरीन कायरान या दांपत्याने एक कोटींच्या खर्चाचे आलिशान घर बांधून दिले. पुण्यातल्या सैनिक अधिकाऱ्यांच्या पत्नींच्या सामाजिक संस्थेने, एका औद्योगिक कंपनीनेही मदत केली असून गावातूनही ग्रामस्थांनी भरभरून मदत केली आहे. या मुलांचे वर्षाचे अन्नधान्य व भाजीपाला गावातील ग्रामस्थ व शेतकरी स्वयंस्फूर्तीने देतात. गेली दोन वर्षे हे `घर` सुख-शांती आणि भरभराटीचा प्रत्यय घेत आहे. या मुलांसाठी हे घर ``स्वर्गाहून सुंदर`` असे आणि परीकथेसारखे बनले आहे. दिवाळीत तो प्रोजेक्ट सुरू झाला. या `घराला` भेट दिली असता, दुसरीतल्या तन्मयपासून ते दहावीतल्या तुलसीपर्यंत सर्व मुलांनी मामा-भाच्याच्या नात्याने स्वागत केले. त्या मुलांच्या चेहऱ्यावरील निरासगता बरेच काही सांगून गेली. घराच्या प्रमुख सीमा वाघमोडे आहेत. त्यांनी  वंचितांसाठी काम करताना ही मुले शरीरविक्रय होणाऱ्या वस्तीत पुन्हा परतू नयेत, त्यांच्या आयुष्यात सामान्य व्यक्तीप्रमाणेच बदल झाले पाहिजेत एवढाच उद्देश ठेवून त्यांच्यासाठी ही घराची संकल्पना आखली आहे. त्यांना समाजातून भरभरून प्रेम, आशिर्वाद आणि मदत मिळाली आहेत. त्याच बळावर सुंदर घर उभे करता आले. सौ. वाघमोडे म्हणाल्या, खरेतर घर ५० मुलांना सामावून घेऊ शकते. तेवढी क्षमता आहे, जी आई त्या मुलांच्या जन्मानंतर त्यांना येथे सोडून गेली, त्या मुलांना कोणीच नाही, अशी मुले निवडून ती मुले येथे आणली आहेत. गाव माझे आहे, येथे सर्व माझी माणसे आहेत, ती आमच्यानंतरही काम असेच सुरू ठेवतील, तेवढी त्यांची दानशूरता आहे, म्हणूनच ही मुले येथे आणली. ही मुले आता येथे चांगलीच रुळली असून विश्वास आहे की, सामान्य माणसारखेच जीवन जगतील. नवे आयुष्य जगतील.` गावाची ओळख बदलत आहे. गाव श्रीमंत होत आहे. त्या श्रीमंतीत माणुसकीची गर्भश्रीमंती वाढविण्यात सीमाज प्रोजेक्ट नक्कीच भर घालणारा आहे. वंचीतांसाठी राबणारे हात आणि त्यांच्यासाठी तळमळणारे मन जागवले जात आहे. तेही देखणे ते हात, ज्यांना निर्मितीचे डोहाळे या कवी  बारेकरांच्या कवितेप्रमाणेच..

इतर ब्लॉग्स