युवा, माधव, वृक्षमंदिर दिनाचा त्रिवेणी उत्सव : स्वाध्याय परिवार 

अमाेद दातार
शुक्रवार, 12 जुलै 2019

आज 12 जुलै रोजी साजऱ्या होणाऱ्या स्वाध्याय परिवाराच्या "उत्सव त्रिवेणी' विषयी थोडक्‍यात जाणून घेऊया. 12 जुलै रोजी परम पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले (दादा) प्रवर्तित स्वाध्याय परिवार "वृक्ष मंदिर दिन', "माधव-वृंद दिन' व "युवा दिन' ही उत्सव त्रिवेणी साजरी करतो. 

निसर्गाकडे, सृष्टीकडे केवळ उपभोग अथवा उपयोग या स्वार्थी दृष्टीने न पाहाता 'उपासना' या भद्र दृष्टीने पाहिले पाहिजे हे सांगून वृक्षात वासुदेव व हिरवाईत हरी पाहण्याची मंगल दृष्टी दादांनी दिली. व याच उपासनेच्या मंगल भावनेतून वृक्ष लावून त्यांचे पुजारी म्हणून दादांच्या वृक्षमंदिरांत संवर्धन केले जाते. झाड मला प्राणवायू किंवा पाऊस देईलच पण विकसित मानवाने वृक्षांकडे किंवा सृष्टीकडे याही पेक्षा वर जाऊन आई म्हणून, भागवद्‌वरूप म्हणून बघितले पाहिजे की नाही. वृक्ष मला फूल, फळ, औषधी आदी देईल पण तेवढ्याकरताच वृक्ष आहे का? दादा नेहमी म्हणत असत की माझी आई घरात पोळ्या करते पण केवळ पोळी भाजी करण्याकरता आई नाहीये, आईला काहीतरी प्लस व्हॅल्यू आहे, अतिरिक्त मूल्य आहे. तसेच निसर्ग, वृक्ष मला प्राणवायू देईलच पण त्याला त्याच्यातील हरीच्या निवासामुळे काहीतरी अतिरिक्त मूल्य आहे. आज फक्त आणि फक्त स्वार्थ, उपयोग किंवा उपभोग याकरताच वृक्षसंवर्धन केले जाते व तसेच शिकवले जाते, बिंबवले जाते. मग ते कंठशोष करून सांगणाऱ्या अनेक सामाजिक संस्था असोत किंवा प्रत्यक्ष शासन असो. निसर्गाकडे पाहण्याचा अशा भद्र दृष्टिकोनाचा समाजात संपूर्णतः अभाव दिसतो. अपवाद दादांच्या स्वाध्याय परिवारासारख्या विरळा उपक्रमांचा. 

आजमितीला याच पवित्र भावनेतून शेकडो एकर जमिनीवर विस्तारलेली 27 वृक्षमंदिरे भारतात उभी आहेत, त्यातील तीन आपल्या महाराष्ट्रात मालेगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात आहेत. आसपासच्या वीस गावातील स्वाध्यायी आपली पूजा समजून या वृक्षमंदिरांत निश्‍चित केलेल्या दिवशी येतात व उपासना म्हणून वृक्षांचे संवर्धन करतात. त्यांच्यावर पुत्रवत्‌ प्रेम करतात व निसर्गाशी भावनिकतः तादात्म्य साधतात. आज झाडे लावा, झाडे जगवा अशी हाकाटी केली जाते पण कोणालाही निसर्गातील दैवी तत्त्व पाहायचेच नाहीये, कसलीही अपेक्षा न ठेवता परोपकार करणा-या निसर्गाकडून आपल्याला काहीही शिकायचे नाहीये. केवळ स्वार्थी उपयोग किंवा उपभोग ही दृष्टी ठेवणे हे विकसित, सभ्य माणसाचे लक्षण नाही. 

अशाच पवित्र भावनेतून लाखो स्वाध्यायी दंपतीस्वरूपात 12 जुलै या दिवशी एका बालतरूचे आपल्या घरी रोपण करतात व रोज त्याच्यावर नारायण उपनिषदाच्या मंत्रपठणासह जलाभिषेक करतात. प्रतिवर्षी अक्षरशः लाखो दंपती बालतरूंची प्रतिष्ठापना करतात. आणि हा शिरस्ता गेली 27 वर्षे म्हणजे 1992 पासून निरंतर चालू आहे. या प्रयोगाला दादांनी नाव दिले "माधव-वृंद'. या वर्षीही हा प्रयोग लाखो कुटुंबात तडीस नेला जाईल. अर्थात केवळ भगवंत व निसर्ग यांची कृतज्ञता म्हणूनच हे सर्व प्रयोग होत असल्याने तसेच कोणालातरी "दाखवण्यासाठी' ते केले जात नसल्याने त्याची कुठे भंपक जाहिरातबाजी व अवास्तव प्रसिद्धी केली जात नाही, हे ही शांतपणे कार्य करणाऱ्या स्वाध्याय परिवाराचे वैशिष्ट्य. 

दादांची सुपुत्री व स्वाध्याय परिवाराच्या सांप्रत प्रमुख धनश्री तळवलकर (दीदी) यांचाही 12 जुलै हा जन्मदिवस. स्वाध्याय परिवार या दिवशी वृक्षमंदिर व माधव-वृंद दिवस साजरा करतोच. पण, दीदींचा जन्मदिवसही तितक्‍याच उत्साहाने साजरा करतो. दादांच्या देशविदेशातील जवळपास 25 हजार युवा केंद्रांतील युवक-युवती ज्यांच्या सुयोग्य मार्गदर्शनाखाली सतत रचनात्मक काम करत आहेत, त्या दीदींचा जन्मदिवस "युवा दिन' म्हणूनही सार्थ साजरा करतात. अशा प्रकारे "वृक्ष मंदिर दिन', "माधव-वृंद दिन' व "युवा दिन' ही उत्सव त्रिवेणी साजरी होते. निसर्गाकडे बघण्याचा एक दैवी दृष्टिकोन देणारे महान तत्त्वचिंतक पांडुरंगशास्त्री आठवले तसेच लाखो युवकांना एक विशिष्ट दिशा देऊन युवाशक्तीला विधायकतेकडे वळवणाऱ्या दीदींना आजच्या दिवशी वंदन! 

इतर ब्लॉग्स