ही नेटची दुनिया मायाजाल, मनुजा थांब जरा...

web.jpg
web.jpg

असं म्हणतात, की विरुद्ध पोल एकमेकांकडं ओढले जातात; तसेच विरुद्ध स्वभावाची माणसंदेखील एकमेकांकडं आकर्षित होत असावीत. तिचं फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाउंट संपूर्णपणे ट्रॅव्हल, फूड याच साऱ्या गोष्टींनी भरलेलं. कुठं फिरायला गेलो, काय-काय खाल्लं, सुंदर-सुंदर स्पॉट कोणते, छान-छान, चमचमीत खायला कुठं मिळतं, त्या ठिकाणची खासियत काय, असे सगळे डिटेल्स असायचे. 

त्याच्या मित्राच्या म्युचल फ्रेंडमध्ये त्याला ती दिसली. त्यानं तिच्या प्रत्येक नवीन पोस्टवर कमेंट करायला सुरवात केली. कधी कौतुक करणं, तर कधी सविस्तर मुद्दा मांडणं. साहजिकच, तिनं हे सगळं पाहिलं. त्याची प्रोफाइल चेक केली आणि रिक्वेस्ट  अॅक्सेप्ट केली. उत्साहाच्या भरात त्यानं लगेच इनबॉक्समध्ये मेसेज नाही केला. तो कनसिस्टंटली तिच्या नवीन पोस्ट्सवर कमेंट्समधूनच व्यक्त व्हायचा. 

तिला ही गोष्ट आवडली. नाहीतर तिला नेहमीचा अनुभव होता, की रिक्वेस्ट एक्सेप्ट केली, की लोक लगेच इनबॉक्समध्ये येऊन चॅटिंग करण्याचा प्रयत्न करतात. काही दिवसांनंतर तिनं स्वतःच त्याला मेसेज केला. तो अगदीच शांत, जेवढ्यास तेवढं बोलणारा. ती अगदीच विरुद्ध स्वाभावाची असल्यामुळे तिला गंमत वाटायची. 

दोघांमध्ये अधून-मधून बोलणं व्हायचं. हळूहळू ते वाढत गेलं. नंबर एक्सचेंज झाले. फेसबुक मेसेंजरवरून व्हॉट्सअॅपपर्यंत चॅटिंगचा प्रवास येऊन पोचला. दोघांमध्ये इमोशनल बाँड तयार झाला. भेटायचं ठरलं. 

दोघे भेटले, भेटीगाठी वाढत गेल्या. आता चॅटिंगचं प्रमाण कमी झालेलं. कॉलवर बोलणं व्हायचं. ती थोडी पजेसिव्ह झालेली. तो पूर्वीसारखाच अलिप्तपणे वागणारा. चॅटिंगमध्ये शांत वाटणारा तो प्रत्यक्षात मात्र तिला खटकू लागला. काही उत्साहानं सांगावं तर तो अगदीच कोरडं रिॲक्ट व्हायचा. चॅटिंगमध्ये स्मायली इमोजी पाठवले तरी प्रत्यक्षात चेहऱ्यावर तितका आनंद दिसावादेखील लागतो. 

अशानं तिचा हिरमोड व्हायचा. ती चिडचीड करायची. छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद होऊ लागले. त्याचं इतकं थंड वागणं तिला सहन व्हायचं नाही. वाद वाढत गेले, काही गोष्टी विकोपाला गेल्या आणि तिनं नात्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. 

जितक्या लवकर ती प्रेमात पडली, दुर्दैवानं तितक्याच लवकर नात्यातून बाहेरदेखील पडली. असं का झालं. कारण, मनोमन ती त्याच्याबद्दल एक इमेज तयार करून नात्यात आलेली. इमेजला तडे गेले तसं तिला सगळं असह्य झालं. खरंतर एका स्क्रीनच्या पल्याड शांतपणे बोलणाऱ्या मुलाच्या प्रेमात ती पडलेली. पण, प्रत्यक्षात त्याच्या याच शांत-शांत वागण्यानं तिचं डोकं जड झालं. शेवटी काय तर, ‘‘ही नेटची दुनिया मायाजाल, मनुजा थांब जरा...’’ 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com