शेकाप नावाचे स्वप्न!

रवि आमले
Friday, 2 August 2019

शेतकरी-कामगार पक्षाची स्थापना झाली ती बहुजनांचे, शेतकरी-कामकऱ्यांचे राज्य आणण्याच्या स्वप्नातून, पण त्यात मुळातच एक वैचारिक गोंधळ होता. त्यातून हा पक्ष फुटत गेला, आकसत गेला. लघुप्रादेशिक बनला. आज कालोचित बनायचे असेल, तर तेच जुने स्वप्न घासूनपुसून नव्या नजरेने पाहण्याची आवश्‍यकता आहे.  

सन १९४६. मुंबई राज्य. राज्यात काँग्रेसची सत्ता. ‘पंतप्रधान’पदी बाळासाहेब खेर. पक्षाच्या संघटनेवर मात्र केशवराव जेधे गटाचे वर्चस्व. शेतकऱ्यांची कर्जे माफ करावीत, शेतसारा रद्द करावा, आदिवासींच्या कल्याणकारी योजनांना प्राधान्य द्यावे अशा त्यांच्या मागण्या. पण खेरांचे मंत्रिमंडळ काही त्याची दखल घेत नव्हते. उलट त्या संघर्षाला ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाची किनार लावण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. वर्तमानपत्रे तेव्हा जेधे गटाच्या विरोधात होती. 

या सगळ्या परिस्थितीत शंकरराव मोरे, केशवराव जेधे, नाना पाटील, आचार्य प्र. के. अत्रे, पी. के. सावंत, छन्नूसिंग, तुळशीदास जाधव, दत्ता देशमुख, व्यंकटराव पवार अशी मंडळी नाराज होती. काँग्रेसअंतर्गत वेगळा दबावगट स्थापन करण्याचा विचार सुरू झाला होता. 

११ सप्टेंबर १९४६. पुण्यातील शिवाजीनगरमधील स्वस्तिक बंगला. 
जेधे, मोरे, यशवंतराव चव्हाण, भाऊसाहेब राऊत, पी. के. सावंत, दत्ता देशमुख, रा. म. नलावडे, रा. ना. शिंदे, सु. त. मोरे, तुळशीदार जाधव, व्यंकटराव पवार आदी या बैठकीस हजर होते. तेथेच चर्चेअंती ठरले, की काँग्रेसच्या अंतर्गत आपला गट स्थापन करायचा. त्याचे नाव ठरले -‘शेतकरी कामगार संघ’.

हा संघ, त्याची धोरणे, प्रचार हे सारेच तेव्हाच्या काँग्रेसमधील उजव्या विचारसरणीच्या नेत्यांना नापसंत होते. त्यातून १९४८ मध्ये मुंबईत भरलेल्या अधिवेशनात निर्णय घेण्यात आला, की ‘स्वतंत्र कार्यक्रम असलेल्या संघटनेचे सभासदत्व काँग्रेसजनांना स्वीकारता येणार नाही.’ याचा वापर करून अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस शंकरराव देव यांनी केशवराव जेधे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा प्रयत्न करून पाहिला होता. काँग्रेसमधील उजवे-डावे यांच्यातील दरी रुंदावत चालली होती. शेतकरी-कामगार संघाच्या अनेक चाहत्यांना आता शेतकरी-कामकऱ्यांचे राज्य आणण्यासाठी काँग्रेसबाहेर पडावे असे वाटू लागले होते.

शेतकरी-कामगार पक्षाची स्थापना झाली ती या विचारातून. बहुजनांचे, शेतकरी-कामकऱ्यांचे राज्य आणण्याच्या स्वप्नातून. या स्वप्नाला आधार होता डाव्या विचारांचा. चीन आणि रशियातील क्रांती त्यांच्या नजरेसमोर होती. चिनी क्रांतीमुळे तर शेतकरी-क्रांती होऊ शकते असा विश्वास दुणावला होता त्यांचा. शंकरराव मोरे यांच्यासारखे नेते त्या विचाराने प्रचंड प्रभावित झाले होते. या पक्षाने खेड्या-पाड्यांपर्यंत मार्क्‍स आणि लेनीन ही नावे नेली. राष्ट्रप्रेमी जनतेच्या मनात मार्क्‍सवादाबद्दल आस्था निर्माण करण्याचे काम शेकापने केले आहे, असा दावा पक्षाच्या दाभाडी प्रबंधातच करण्यात आलेला आहे, पण हा दाभाडी प्रबंध म्हणजे काय? 

दाभाडी हे मालेगाव तालुक्‍यातले गाव. १९५० मध्ये शेकापचे दुसरे अधिवेशन तेथे झाले. त्या अधिवेशनात सादर करण्यात आलेला राजकीय प्रबंध या गावाच्या नावानेच ओळखला जातो. शेकापचा जन्म, त्याचे कार्य येथपासून आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय परिस्थिती, हिंदुस्तातील कम्युनिस्टांच्या चुका असा व्यापक पातळीवरील ऊहापोह या प्रबंधात करण्यात आला आहे. पक्षाच्या कार्याच्या दिशेचे दर्शन त्यात आहे. देशात लोकशाही क्रांती घडवून आणणे हे पक्षाचे एक ध्येय होतेच. त्यासाठी शेकापने एक कार्यक्रमही आखला होता. प्रत्येकाला कामाचा हक्क, खासगी नफ्यावर नियंत्रण, सर्वांना शस्त्र वापरण्याचा हक्क, जनतेच्या लष्कराची निर्मिती अशी काही कलमे त्यात होती. क्रांतीची आसच लागलेली होती या पक्षाला. एवढी, की सरदार वल्लभभाई पटेल यांच्या निधनानंतर सशस्त्र उठाव करण्याचा घाट पक्षातील काही नेत्यांनी घातला होता. 

वस्तुतः शेकापचा, म्हणजे त्याच्या तत्कालीन अनेक नेत्यांचा जैविक वैचारिक घाट हा महात्मा फुले यांच्या सत्यशोधकी विचारांतून तयार झालेला. हा पक्ष प्रामुख्याने येथील शेतकऱ्यांचा, बहुजनांचा. त्याचे तेव्हाचे प्रभावक्षेत्र लक्षात घेतले तरी हे ध्यानात येईल. कोल्हापूरादी पश्‍चिम महाराष्ट्रात जेथे ब्राह्मणेतर चळवळीचा प्रभाव होता, तेथेच शेकापचा प्रारंभिक प्रसार झालेला आहे, परंतु या पक्षाच्या नेत्यांना तेव्हा चीनमधील शेतकरी क्रांतीने पछाडले होते. त्यातून ही कम्युनिस्ट विचारधारेशी जवळीक. पक्षाचा पुढे जो वैचारिक कोंडमारा झाला, त्याचे बीज पक्षाच्या या धोरणात्मक विसंगतीत सापडेल. 
या पक्षाचे सत्ताकारणातील यशापयश, त्यातील फूट हा वेगळा भाग झाला. १९५७ च्या निवडणुकीत २७ जागा जिंकणाऱ्या या पक्षाला साठीच्या दशकात घरघरच लागली होती. संस्थापकच सोडून गेलेले, एकेक करून मोहरे काँग्रेस मुक्कामी परतत होते, अशा परिस्थितीत वेगळे काय होणार? पण ही फूट का होत होती हेही समजून घेतले पाहिजे.

हा शेतकरी आणि कामगारांचा पक्ष. त्यातील कामगारांत तसे पक्षाचे स्थान नगण्यच. शेतकऱ्यांमध्ये काम होते, पण ते कोणत्या शेतकऱ्यांत हाही प्रश्नच आहे. कारण मुळात शेतकरीवर्ग हा काही एकच एक नाही. जमिनीचे काळी, पांढरी, माळाची असे प्रकार असावेत, त्याप्रमाणे शेतकऱ्यांतही श्रीमंत बागायतदार, मध्यम, गरीब, भूमिहीन शेतमजूर असे थर आहेत. त्यातील कोणत्या थरासाठी हा पक्ष भांडत होता? तो ज्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करू पाहत होता, ते सारे तर काँग्रेसचे नेतृत्त्व मान्य करीत होते आणि गरीब, भूमीहीन, शेतमजूर यांच्याबाबत शेकापचे योगदान प्रामुख्याने तोंडपाटीलकी स्वरूपाचेच होते. परिणाम ना त्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात क्रांती झाली, ना पक्ष वाढला. काँग्रेसमधून सत्तेनजीक जाता येते हा स्वार्थ आणि त्यातून शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावता येतात हा परमार्थ हे दोन्हीही साधण्यासाठी शेकापचे नेते यशवंतराव चव्हाणांच्या नेतृत्त्वाखाली जाऊ लागले. पक्ष फुटू लागला. हा झाला इतिहास. पण वर्तमानाचे काय?

आज ७२ वर्धापनदिन साजरा करीत असलेला हा पक्ष कोणत्या लढाया लढतो आहे? आज या पक्षाचे प्रभावक्षेत्र किती आहे? मार्क्‍सवादाचा वारसा सांगणाऱ्या आणि बहुजन चळवळीचे बाळकडू घेऊन आलेल्या या पक्षाची आजची विचारसरणी कोणती आहे? एक अस्मिताहीन, जिल्हास्तरीय पक्ष हे त्याचे आजचे अस्तित्व आहे. ज्यांच्या विरोधात लढण्यासाठी त्याचा जन्म झाला होता, त्या उजव्या प्रतिगामी शक्तींशीही प्रसंगी चुंबाचुंबी करण्यात त्याला काहीही गैर वाटत नाही. जमीनदारांशी लढू पाहणाऱ्या, ‘कसेल त्याची जमीन’ यांसारख्या क्रांतिकारी धोरणाचा पाठीराखा असलेल्या या पक्षातील मंडळी आज ‘जमीन खरेदी-विक्री संघ’ स्थापून तेथे दलाली करीत असल्याचे पाहावयास मिळते आहे. पक्षाचे काही नेते हेच नवजमीनदार झाल्याचे चित्र बघावयास मिळते आहे. शोकांतिकाच ही. 

शेकापमधील जुन्या-जाणत्या कार्यकर्त्यांना, नेत्यांनाही हे सारे नक्कीच खटकत असेल. शेतकरी-कामकऱ्यांचे राज्य आणण्याचे स्वप्न कधीकाळी त्यांच्या डोळ्यांत होते. आज त्याच डोळ्यांनी त्यांना फक्त सत्तेसाठीच्या केविलवाण्या धडपडी पाहायला मिळत आहेत. कधी तरी त्यांनी आणि नव्या पिढीनेही हे समजून घेतले पाहिजे, की जेथे मुळातच वैचारिक गोंधळ असतो, तेथे हाच तमाशा घडत असतो. 
पण हे संपविणे अशक्‍य नाही. काळ बदलला आहे. या बदलत्या काळात पक्षाच्या नेतृत्त्वाने दाभाडी प्रबंधाचे लोढणे तर केव्हाच फेकून दिलेले आहे. आज तर त्याची कोणाला आठवण सोडा, माहितीही नाही असे दिसते. अर्थात ते लोढणे कोणी, का आणि कशासाठी फेकले हा काळा कोळसा उगाळण्यात आता अर्थ नाही. पण एका अर्थी ते बरेच झाले. निदान एका वैचारिक गुंत्यातून तरी पक्षाची सुटका झाली. आता निदान मोकळेपणाने (आणि अर्थातच इच्छा असेल, तर) हा पक्ष आपल्या मूळ बहुजनवादी राजकारणाकडे वळू शकतो; मात्र आजच्या बहुजनवादी राजकारणाचा चेहरा बदललेला आहे, हेही शेकापच्या नेत्यांनी लक्षात घ्यायला हवे. या नवबहुजन राजकारणाचा एक पाय अस्मितावादात असेल, तर दुसरा अर्थकारणात आहे. कोणी कितीही नाकारले तरी बहुजनांच्या नावाखाली चाललेल्या सत्ताकारणाला नेहमीच सरंजामशाहीचा दुर्गंध येत होता. महाराष्ट्रातील जिल्ह्याजिल्ह्यांत त्याने नवसंस्थानिक जन्माला घातले. काँग्रेस आणि नंतरच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांनी जोजवले. आता मात्र मनू बदललेला आहे. राज्यात शिवसेनेची घोडदौड सुरू झाली तेव्हाच ते अनेकांच्या लक्षात आले होते. शिवसेनेच्या त्या घोडदौडीला साथ देत भाजपने त्या बदलांचा अंगिकार केला. त्यांच्या यशाचा हिशेब मांडताना ही बाब लक्षात घ्यायला पाहिजे.

आजचा शेकाप रायगडपुरता मर्यादित राहिलेला असला, त्याला अगदीच लघुप्रादेशिक रूप आलेले असले, तरी त्या भागातही या वेगळ्या राजकारणाची मेढ तो रोवू शकतो. रायगडमध्ये उदयाला आलेला कामगारवर्ग हे या पक्षाचे बलस्थान बनू शकते, मात्र त्यासाठी जुन्या भूमिकांना आणि सरंजामशाही राजकीय वर्तनाला तिलांजली देऊन येथील संपत चाललेल्या शेतकऱ्याच्या आणि  नवकामगारवर्गाच्या मागे उभे राहण्याची, संघर्ष करण्याची आवश्‍यकता आहे. त्यातून निदान आहे तो बालेकिल्ला तरी शाबूत राहू शकेल. पण खरा मुद्दा शेकाप राहतो की जातो हाही नाही. अखेर राजकारणाच्या व्यापक लढाईत पक्ष नव्हे, तर माणसे महत्त्वाची असतात. आज रायगडमधील माणसे शेतीतून उखडली जात आहेतच. कामगार म्हणून तरी त्यांना चांगले दिवस यावेत. राजकारण व्हायला हवे ते त्यासाठी. शेकाप कालोचित ठरायचा असेल, टिकायचा असेल, तर त्यासाठी टिकावा. अखेर ७२ वर्षांपूर्वी तेच स्वप्न डोळ्यांत घेऊन तर तो अवतरला होता...
ravi.amale@esakal.com

इतर ब्लॉग्स