गणेशाचे गाव

अरविंद पाटील 
Monday, 5 August 2019

रायगड जिल्ह्यातील पेण... या गावात गणेशमूर्ती साकारण्याचा मोठा उद्योग आहे. हजारो कामगारांचे, कारागिरांचे कुटुंब गणेशमूर्ती तयार करण्याच्या उद्योगावर पोसले जात आहेत. श्रावण सुरू झाला आणि गणपती बनवण्याची लगबगही या परिसरात सुरू झाली आहे. या इंडस्ट्रीचा हा खास रिपोर्ताज...

तांबडशेत. पेणपासून पाचेक किलोमीटरवरच्या हमरापूरला मागे टाकले की हे गाव येते. छोटेसेच. रस्त्याच्या दुतर्फा गणेशमूर्तींचे कारखाने. प्लास्टिकच्या निळ्या कापडाने झाकलेले. त्यात कामात व्यग्र असलेले कलाकार. 
एका कारखान्याजवळ थांबलो. एक वयोवृद्ध कलाकार मूर्ती रंगविण्यात व्यग्र होते. पांढरा शर्ट, पांढरी टोपी, डोळ्यांना चष्मा, हाताला घड्याळ. टिपिकल शेतकरी. हे शंकर राजापाटील. सोबत त्यांची कारभारीण. त्याही गणपतीच्या कामात व्यग्र. ‘माहिती घ्यायला आलोय’ म्हटल्यावर अगत्यपूर्ण स्वागत केले. बाहेर पाऊस पडत होता. ‘आधी चहा घ्या, मग बोलू’ म्हणाले. 
विचारले, ‘हे काम कधीपासून सुरू केले?’ 
ते सांगू लागले, ‘आमचे चुलते होते सीताराम पाटील. गावातले गणेशमूर्तीचे कारखाने पाहून त्यांनीही १९६० मध्ये कारखाना टाकला. ते तेव्हा शाडूच्या मातीच्याच मूर्ती बनवीत. त्याकाळी प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) नव्हतेच. गुजरातमधून शाडू माती आणायचे. पण तेव्हा दळलेली माती नाही मिळायची. मातीची ढेकळं येत. ती उखळात कुटून बारीक करायची. माती वस्त्रगाळ करायची. मग ती भिजवून मळून दोन दिवस थप्पी मारून ठेवायची. चांगली सेट झाली, की मग साच्यात दाबून मूर्ती पाटावर उभी करायची.’ 
‘पण मग मूर्तीच्या कोरीवकामाचे काय? ते साच्याद्वारेच व्हायचे का?’ 
ते म्हणाले, ‘छे छे... सगळं कोरीवकाम हातानेच. अगदी डोळे, दागिने, जानवं... सगळंच. मग फिनिशिंग आणि रंगकाम. तेही हातानेच.’ 
मध्येच त्यांच्या पत्नी वनिताबाई हसत हसत सांगू लागल्या, ‘अहो, तेव्हा सायकलच्या चाकात हवा भरायचा पंप वापरायचे रंग स्प्रे करायला. मी पंप मारायची आणि हे रंगकाम करायचे.’ 
याच कारखान्यात शंकर पाटील शिकले. १९७५ मध्ये स्वतःचा स्वतंत्र कारखाना काढला.’ ते सांगत होते- ‘त्या वेळी मोजक्‍याच मूर्ती तयार होत. प्रत्येक काम हाताने करावे लागे. यंत्राचा वापर खूपच कमी. काही मोठ्या कारखानदारांकडेच मशीन असत. आता तसे काही राहिलेले नाही. आता अनेक कामे यंत्राने होतात. पीओपीच्या मूर्ती तर दागिने वगैरे कोरीवकामासहित साच्यात तयार होतात. त्यामुळे कष्ट वाचले. वेळ वाचला; पण कलाकार आपली कला हरवून बसले. आता बघा ना, नव्या कलाकारांना मातीच्या मूर्तीचे कोरीवकाम जमतच नाही. तसे फारच कमी कलाकार राहिलेत आता.’ 
‘पण इथल्याच मूर्तींना एवढी मागणी का? असं काय असतं त्यांच्यात?’ 
‘ब्रॅंड तयार झालाय ना... शंभर-सव्वाशे वर्षांपासून. पण तो का तयार झाला? मूर्तीच्या डोळ्यांतल्या जिवंतपणामुळे. जाणकार माणूस असला ना, तर तो मूर्तीचे डोळे बघून सांगू शकतो की ही मूर्ती पेणला घडलीय की नाही ते. एवढा जिवंतपणा असतो त्यांत. अस्सल कारागिरीचा वारसा आहे तो. इथल्या काही कलाकारांनी तो जपलाय.’ 
‘इथले कलाकार म्हणजे?’ 
‘हमरापूर, जोहा, तांबडशेत, कळवा आणि दादर ही पेणच्या जवळची पाच गावं आणि तिथले शेतकरी हेच इथले कलाकार, कारखानदार, कारागीर आणि मजूरही.’ शंकर पाटील म्हणाले. 
घरा-घरांतली गणेशोत्सवाची परंपरा जशी या पिढीतून त्या पिढीत प्रवाहित होत असते; तसेच या गावांचे. येथे मागच्या पिढीतून पुढच्या पिढीकडे ही कला आपसूक सरकत आहे. ते होताना ती अधिक समृद्धही होत आहे. 
ही पाचही गावे आगरी समाजाची. या व्यवसायात अजूनतरी परप्रांतीयांनी हात घातलेला नाही. सुमारे दीड हजार कारखाने आहेत या गावांत. प्रत्येक कारखान्यात १० ते २० कारागीर आणि मजूर. एकूण सुमारे १५ ते ३० हजार कारागीर या व्यवसायावर उपजीविका करतात. त्याशिवाय वाहतूक व्यावसायिक, कच्चा माल विकणारे एजंट, मूर्तीविक्रेते अशा काही लाख लोकांचे जगणे यावर अवलंबून आहे. 
‘कसं चालतं हे काम? मजुरी वगैरे किती असते?’ 
‘इथल्या कारागीराला त्याच्या कलेतील सफाईनुसार दिवसाला ३०० ते ५०० रुपये मजुरी मिळते. प्रत्येक कारागीर शक्‍यतो एकाच प्रकारचे काम करतो. त्यामुळे त्यांच्या कामात सफाई येत जाते. कारखान्यांचंही तसंच आहे. काही कारखान्यांत कच्च्या मूर्तीच बनवल्या जातात. काही कारखान्यांत फक्त रंगकाम केलं जातं.’ 
वनितामावशी सांगू लागल्या, ‘आम्ही कारखाना टाकला ना, तेव्हा आमचं घर खूप लहान होतं. मुलं लहान होती. त्यांना मांडीवर झोपवून मी मूर्तींना रंग द्यायची. हळूहळू या व्यवसायाने आम्हांला खूप दिलं. मोठं घर झालं. पण व्यवसाय वाढल्यानं तेसुद्धा आता कमी पडतंय. आता आम्ही गावाजवळची एक जागा भाड्याने घेऊन तिथे शेड उभी केलीय मूर्तींसाठी.’ 
मूर्ती ठेवण्यासाठीची जागा ही येथील मोठी समस्या. उन्हाळ्यात ठीक; पण पावसाळ्यात मोठीच अडचण निर्माण होते. त्यामुळे इथून साधारणतः मे महिन्यापासूनच मूर्ती बाहेर पडायला सुरुवात होते. तयार होतील तसतशा गाड्या भरून मूर्ती पाठवल्या जातात. एजंट त्या मूर्ती आपापल्या शहरांतल्या गोदामात ठेवतात. साधारणपणे श्रावणापासून मूर्तींचे स्टॉल सामान्य ग्राहकांसाठी खुले होतात. 
त्यांना विचारले, ‘सरकार सर्व व्यवसायांना मदत करत असते. तुमची जागेची अडचण नाही का सांगितली कधी सरकारला?’ 
शंकर पाटलांचा मुलगा सचिन बाजूलाच बसलेला होता. तो सांगू लागला, ‘जागा हीच खरी अडचण आहे आमची. सरकारने आम्हाला जागा दिली तर त्याची किंमत द्यायलाही सगळे कारखानदार तयार आहेत. पण सरकारचं आमच्याकडं लक्षच नाही.’ 
सचिन आणि संजय ही काकांची दोन मुले. त्यांनी हा व्यवसाय स्वीकारला. त्यांच्या मुलांचे काय? 
सचिन म्हणाला, ‘आमच्या आई-वडिलांनी आम्हाला या व्यवसायात या म्हणून आग्रह केला नव्हता. आम्हाला आवड होती. लहानपणापासून हे करीत होतो. म्हणून पदवीधर होऊनही नोकरी न करता हा व्यवसाय पुढे चालू ठेवण्याचा निर्णय घेतला. आमच्या मुलांनाही आम्ही आग्रह करणार नाही. त्यांना आवडत असेल तर यावं; पण आधी शिक्षण पूर्ण करावं.’ त्यांची मुले मात्र याच व्यवसायात येणार म्हणून सांगत होती. शंकर पाटलांची तिसरी पिढीही कारखानदार होणार होती. 
  
या कारखानदारीला पूरक असे व्यवसायही आपसूकच पेणमध्ये बहरले आहेत. मूर्तींसाठीची माती, प्लास्टर ऑफ पॅरिस, रंग यांची अनेक ठोक दुकाने पेणमध्ये दिसतात. पेणमधील चावडी नाक्‍यावरचे ‘मंगेश ट्रेडर्स’ हे त्यातलेच. ते शाडू आणि पीओपीचे पुरवठादार. अमृता लांजेकर त्याचा व्याप सांभाळतात. त्या सांगत होत्या, ‘हा तसा उधारीवर चालणारा व्यवसाय आहे. म्हणजे आम्ही ऑक्‍टोबर ते मार्च या सहा महिन्यांत जो काही माल लागेल तो मूर्तिकारांना उधारीवर देतो. मूर्तींची विक्री सुरू झाली की ते जमतील तशी परतफेड करतात. सप्टेंबरपर्यंत व्यवहार पूर्ण होतो. की मग पुढच्या महिन्यापासून पुन्हा उधारी सुरू.’ 
‘अशी किती दुकाने आहेत पेणमध्ये?’ 
त्या म्हणाल्या, ‘शहर आणि परिसरात मिळून नऊ-दहा तरी आहेत. त्यातून किमान दहा लाख किलो शाडूची माती खपते दरवर्षी.’ 
‘आणि प्लास्टर ऑफ पॅरिस?’ 
‘त्याच्या तिप्पट.’ 
हा आकडा चकित करणारा होता. पेणच्या गणपतीचे खरेदीदार यांच्या पर्यावरणप्रेमाबद्दलही तो बरेच काही सांगत होता. मूर्तींच्या रंगकामासाठी पूर्वी नैसर्गिक रंग वापरत असतील. आता मात्र बहुतांश रासायनिक रंगच असतात. एका दुकानात ‘येथे गणपतीचे रंग मिळतील’ असा फलक दिसला. अंकिता मंचेकर ही महाविद्यालयीन विद्यार्थिनी ते दुकान चालवत होती. ती म्हणाली, ‘मूर्तीच्या प्रत्येक भागासाठी साधारणतः वेगवेगळ्या प्रकारचे रंग पसंत केले जातात. म्हणजे बघा, पीतांबर, उपरणं यांसाठी उठावदार असे फ्लोरोसन्ट आणि मेटॅलिक रंग वापरतात. आखणीसाठी पोस्टर कलर वापरतात. बैठकीला फेविक्रिल. बॉडीकलर म्हणून डिस्टेम्पर वापरला जातो. अनेकदा वॉटर कलरही देतात.’ 
‘मूर्तीला सुरुवातीला एक विशिष्ट प्रकारचा पांढरा रंग दिला जातो. तो कोणता असतो?’ 
ती म्हणाली, ‘तो सफेदा. प्रायमरी रंग. तो राजस्थानमधून येतो. बाकीचे रंग मात्र मुंबई परिसरातूनच येतात.’ 
या रंगांच्या व्यवसायाचेही तेच सहा महिने उधारी आणि मग परतफेड असे चक्र असते. एकूण हा शेतीसारखाच व्यवसाय. पीक निघेपर्यंत कर्ज काढायचे. सुगीला फेडायचे आणि मग परत कर्जाचा नाही, तर उधारीचा बाजार. 
  
हे सगळे समजून घ्यायचे, या मूर्तिकारांचे, कारागिरांचे, मजुरांचे विविध प्रश्न, त्यांच्या मागण्या आणि त्याचबरोबर पेणचे या व्यवसायातील महत्त्व याबाबत ‘अधिकृत’ माहिती घ्यायची तर श्रीकांत देवधर यांची भेट अपरिहार्य ठरते. पेणला गणपतीचे गाव बनविण्यात ज्या काही घराण्यांचा मोलाचा वाटा आहे, त्यात देवधरांच्या घराण्याचा अग्रक्रम. हल्ली पेणचे गणपती म्हणजे देवधरांचे गणपती असेच समीकरण तयार झाले आहे. त्यामागे १४० वर्षांचा इतिहास आहे. १८८० मध्ये भिकाजीपंत देवधर यांनी येथे गणपतीच्या मूर्ती बनवण्यास सुरुवात केली. त्यांचे पुत्र बाबूराव यांनी तो व्यवसाय सुरू ठेवला. मात्र आपल्या पुढच्या पिढीने हा व्यवसाय करू नये, अशी बाबूरावांची इच्छा होती. पण त्यांचे अकाली निधन झाले आणि त्यांच्या दोन्ही मुलांनी, नारायण ऊर्फ राजाभाऊ आणि वामनराव यांना हा व्यवसाय पुढे चालू ठेवणे भाग पडले. पुढे ही दोन्ही भावंडे वेगळी झाली. राजाभाऊंनी ‘प्रभात कला केंद्रा’चे काम पाहिले; तर वामानरावांनी ‘कल्पना कला केंद्र’ सुरू केले. त्यांच्या पुढच्या पिढ्या म्हणजेच राजाभाऊंचे चिरंजीव आनंद आणि वामनरावांचे पुत्र श्रीकांत हे जे.जे. स्कूल ऑफ आर्टस्‌मध्ये शिकून या व्यवसायात उतरले. 
देवधरांना आधी फोन करून ‘कल्पना कला केंद्रा’त गेलो. प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचे, बहुश्रुत, विविध देश फिरून आलेले देवधर पेण गणेश मूर्तिकार व व्यवसायिक विकास संस्थेचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहतात. 
ते सांगत होते, ‘इथं आम्ही हा व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली, असं नाही. देवधरांच्या आधीही पेणमध्ये गणेशमूर्ती घडवल्या जात होत्या. पण देवधर कुटुंबीयांनी याला व्यावसायिक रूप दिलं. इतर शहरांत आपले एजंट नेमले. विक्रीव्यवस्था चोख केली आणि अखेर १४० वर्षांचा काळ कलेला आणि व्यवसायाला ओळख देतोच.’ 
देवधर यांच्या बोलण्यातून एकूणच या व्यवसायाबद्दलची कळकळ जाणवत होती. त्यांना विचारले, ‘एकूणच या गणेशमूर्ती कारखान्यांच्या व्यवसायाचे प्रारूप असतं कसं?’ 
ते सांगू लागले, ‘या व्यवसायाचे एक चक्र आहे. साधारणतः श्रावणात मूर्तींची विक्री सुरू झाली, की मूर्तिकारांना पैसे मिळू लागतात. मात्र त्यांचा खर्च वर्षभर सुरूच असतो. तेव्हा मग सर्वच कारखानदार बॅंकेचं कर्ज किंवा ओव्हरड्राफ्ट वगैरे घेतात. ते भांडवल वर्षभर वापरलं जातं. मूर्तींची विक्री झाली की त्याची सव्याज परतफेड केली जाते, की कारखानदार पुढच्या वर्षाच्या कर्जासाठी तयार. केवळ पेण भागातल्याच बॅंका पाहिल्या, तर इथं दरवर्षी दीड-दोन कोटींच्या कर्जाचं वाटप होतं. 
काही वेळापूर्वी तांबडशेतमध्ये एका मूर्तिकाराला भेटलो, तेव्हा ते जागेची अडचण सांगत होते. पेणच्या तलावानजीक ‘दीपक आर्टस’ म्हणून ६० वर्षे जुना कारखाना आहे. केवळ शाडूच्या मूर्ती बनविणारा. त्याचे मालक दीपक फाटक यांच्या बोलण्यातूनही हीच जागेची अडचण समोर येत होती. देवधरांना त्याबद्दल विचारले. 
ते म्हणाले, ‘जागेची अडचण मोठीच आहे. आम्ही सरकारपुढे एक प्रस्ताव ठेवला होता, की एक क्‍लस्टर हब तयार करा आणि मूर्ती कारखान्यांसाठी जागा उपलब्ध करून द्या. तिथं पाणी, वीज अशा मूलभूत सुविधा द्या. बाकी आमचं काही मागणं नाही. जागेचं भाडं, सुविधा शुल्क भरायला आम्ही तयार आहोत. पण इतक्‍या मोठ्या प्रमाणात चालणाऱ्या आणि जगप्रसिद्ध असलेल्या पेणच्या या व्यवसायाकडे सरकार गांभीर्याने पाहतच नाही. आमच्या अडचणी समजून घेत नाही. या व्यवसायाचं विकासाचं प्रारूप तयार करताना सरकारने मूर्तीव्यावसायिकांशी चर्चा करावी. वास्तववादी योजना बनवाव्यात. तसं केलं तर या व्यवसायाचा चांगला विकास होईल.’ 
हे बोलणे सुरू असतानाच शरद पिलोलकर आले. ते पेणमधल्या ‘श्रवण आर्टस’चे मालक. गणपतीच्या डोळ्यांची ‘आखणी’ करणारे जे नावाजलेले कलाकार पेणमध्ये आहेत, त्यांतले हे एक. 
ते सांगू लागले, ‘पेणच्या मूर्तींची खासियत म्हणजे डोळ्यांतील जिवंत असे भाव. ते सारं कलाकाराच्या कौशल्यावर अवलंबून असतं. त्यासाठी काही वेगळे रंग वापरले जात नाहीत. या डोळ्यांमध्ये रंग भरण्याला आखणी म्हणतात. ती करणारे मोजकेच २०-२५ कलावंत आहेत पेणमध्ये. साऱ्या कारखान्यांत फिरून तेच आखणी करतात. त्यांचं काम तेवढंच. ‘तुम्ही स्वतः किती मूर्तींचे डोळे रंगवता? आणि त्याच्या मानधनाचं कसं असतं?’ 
पिलोलकर म्हणाले, ‘वर्षभरात पाच-सहा हजार मूर्तींचे डोळे रंगवतो. त्याचं मानधन मूर्तीच्या उंचीवर आणि कलाकाराच्या कौशल्यावर ठरतं. मूर्ती जितकी मोठी आणि कलाकाराचं कौशल्य जितकं चांगलं तितकं मानधन जास्त. पण कलाकाराचं कौशल्य प्रत्येक मूर्तीत पणाला लागत असतं. डोळ्यांत जीव ओतावा लागतो त्याला.’ 
खरेच होते ते. पेणच्या मूर्तींतील प्रसन्नता, शांत-आश्वासक भाव त्याच्या खरेपणाची ग्वाही देत असतात. पेणच्या गणपतींची लोकप्रियतेचे रहस्य आहे ते त्यातच! 
  
बाराही महिने चालणाऱ्या या व्यवसायात अन्य उद्योगांत असतात, तशाच अडचणी आहेत. खेळते भांडवल, कुशल कलाकारांची उपलब्धता, जागा या यातील प्रमुख समस्या. येथे भेटणाऱ्या प्रत्येकाच्या बोलण्यातून हे समोर येत होते. परंतु पेणमधील कारखानदारांनी, कलाकारांनी या समस्यांचा बाऊ केलेला नाही. सरकार- मग ते कोणाचेही असो- दुर्लक्ष करते ही प्रत्येकाचीच भावना होती. ती रास्तही होती. या मूर्तिकारांच्या संघटनेच्या तोंडाला सरकारने अनेकदा आश्वासनांची पाने पुसलेली आहेत. पण ही मंडळी तोच पाढा उगाळत बसलेली नाहीत. जे आहे ते आहे, या भावनेने त्यांचे काम सुरूच असते. सुमारे दीडशे वर्षांपासून ते सुरू आहे. पेणमधील तेव्हाच्या वतनदार ब्राह्मण कुटुंबांकडे विजापूरहून आलेल्या कारागीरांनी येथे मातीची खेळणी, भांडी, मूर्ती बनवायला सुरुवात केली. छोट्या प्रमाणावर त्याची खरेदी-विक्री होत असे. पुढे लोकमान्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव लोकप्रिय केला आणि पेणमधील गणेशमूर्तींच्या व्यवसायाला बरकत आली. कारण उभ्या महाराष्ट्राची हक्काची बाजारपेठ त्यांना उपलब्ध झाली. आज ती बाजारपेठ चांगलीच विस्तारली आहे. युरोप, अमेरिका, पश्‍चिम आशिया... जिथे जिथे मराठी माणसे गेली आहेत तेथून या मूर्तींना मागणी येत आहे. राज्यांतील मूर्तिकारसुद्धा येथून कच्च्या मूर्ती घेऊन जात असतात. किमान सत्तरेक कोटींच्या घरात येथील उलाढाल गेलेली आहे. गणेशाच्या या गावाला गणेशाने भरभरून दिलेले आहे...
arvindrpjuhu@gmail.com

इतर ब्लॉग्स

संपादकीय बातम्या