Kolhapur Floods : फाटलेलं पाणी...(ब्लॉग)

स्मितील पाटील (smitildp@gmail.com)
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

स्थिती विदारक आहे...
दिवसरात्र पाऊस...
सगळीकडे गढूळ पाणी...
अतिवृष्टीचे भय... 
केविलवाणा जीव मुठीत धरलेली जनता... 
बेफाम वाहत असलेलं पाणी... इतकं बेफाम की उभ्याला आडवा करत पुढे थाटात मार्गस्थ होत असलेलं फाटलेलं पाणी..... 
हेच पाणी इतक्या मोठ्या प्रमाणात असूनही आज प्यायला पाणी नाही....

कधी कधी नको वाटतंय काही बोलायला.... 
काय उपयोग आहे आपल्या कोणाचाच...जर आज इतकं तंत्रज्ञान आहे...ताकद आहे...पैसा आहे...श्रम आहेत... पण आपल्यापैकी कोणालाच या महापुराचा अंदाजही येऊ शकत नसेल तर पुराच्या पाण्यात हुशारी तरी शुद्ध होईल की नाही याची शंकाच...! 

निसर्गाचे भय पूर्णपणे निसर्गच कापत सुटला आहे. नद्यांची कडा ओलांडत दूर वस्तीत घुसून पाच-सहा फुटाचा माणूस त्याला का आपलासा वाटला कुनाठावूक !

सगळ्यांना आपल्या कवेत सामावण्याची त्याची तृप्त इच्छा पूर्ण करून घेतोय हा निसर्ग या महापुरातून....
 
स्थिती विदारक आहे...
दिवसरात्र पाऊस...
सगळीकडे गढूळ पाणी...
अतिवृष्टीचे भय... 
केविलवाणा जीव मुठीत धरलेली जनता... 
बेफाम वाहत असलेलं पाणी... इतकं बेफाम की उभ्याला आडवा करत पुढे थाटात मार्गस्थ होत असलेलं फाटलेलं पाणी..... 
हेच पाणी इतक्या मोठ्या प्रमाणात असूनही आज प्यायला पाणी नाही....

एकीकडे पाण्याचा साठा वाढला म्हणून आनंद होतोय-ना-होतोय तोवर.. असा हा घात....

पाऊस पाऊस म्हणत करुणा दाखवत वरुणराया बरसला.. माया दाखवत स्वतःच्या कुशीत घेत.. मिठी मारत.. त्याने कधी गिळंकृत केले तेदेखील समजले नाही..
पाणी.. असे म्हणतात की, पाण्याला आकार नाही.. उकार नाही.. मात्रा नाही.. पण 
जेंव्हा हेच पाणी तांडव करायला लागतं.. तेंव्हा याचं नृत्य अलमट्टीपेक्षा विक्राळ...

डोळ्यासमोर केवळ कल्पना जरी उभी केली तरी, डोळ्यातल्या अश्रूंनी ती पुसून जाईल इतकं कुरूप ते दृष्य.. 
माझ्या कोल्हापुरात चारी बाजूनी पाणी आलंय..
खळखळ करत.. हसत-खेळत नद्या-नाले भरले.. पण त्याचं हे असं विक्राळ रूप होईल, हे न वाटणे हेच अपयश आणि दुर्दैव..
 
मोठ्या तावात फिरणारे.. प्रेमाने बोलणारे.. शिव्याशाप देणारे.. कुरघोडी करणारे.. 
सगळे-सगळे या पुरात एकसमान आणि कमजोर होऊन गेलेत..
खऱ्या अर्थाने या पुरात अडकलेल्या लोकांना वाचवणारे जे आलेत ना ते देवासारखे.. तिथे जात-पात-धर्म नाही बघितला कुणी.... 

२००५ चा पूर बघितला होता.. पण इतकं सुन्न करणारं विचित्र चित्र न्हवतं ते..
 
संवेदनशीलतेचे सर्व दरवाजे इथे उघडले तरी पाण्याचा निचरा..होय निचराच म्हणावा लागेल.. तो होणे कठीणच..
इथे प्रत्येक गोष्टीला मर्यादेचा बांध आहे..

एक वेळ होती ज्यावेळी पाणी पुष्कळ होतं.. आणि हीदेखील वेळच आहे फक्त ती जरा उलटी फिरत आहे. ज्यात सेकंदा-सेकंदाला पाण्याची पातळी वर-खाली होत आहे...
पुराखाली ज्यांची घरे गेलीत त्यांच ह्रदय जरी पाण्याच्या वर श्वास घेत असलं तरी ते हृदय पाण्याखाली गुदमरलय.. 
त्यांचा जीव पाण्याखालीच अडकलाय... 
घरातल्या म्हातारीचा जीव अडकलाय त्या पाण्याखाली गेलेल्या, भिजलेल्या बटव्यात.. दोन रुपये होते त्यात.. नातवाला द्यायला ठेवलेले, पण तेही सापडेनात.... 
म्हाताऱ्याचा जीव अडकलाय त्या काच फुटलेल्या चष्म्याच्या तुटक्या कडीत.. ज्याला डोळ्यासमोर लावून उद्याचा महापूर पेपरात वाचणार...

एका आईचा जीव अडकलाय त्या स्वैपाक घराच्या खोलीत जिथं सगळ्या वस्तू शिळ्या झालेल्या जेवणाची वाट बघताहेत.. 
एका बापाचा जीव अडकलाय त्या पाण्याखाली गेलेल्या पेटीत ज्यात लाख-दोन लाखाची जोडणा केलेली. ते मिळणेही आता दूर...
काकीचा जीव अडकलाय त्या देवघरात जिथे देवाला विनामोबदला पाण्याचा अभिषेक सुरू आहे....

विध्वंस करून टाकणारी स्थिती.. एकाएकी माणसाला ऐकटं पाडून त्याच्या मर्यादा दाखवून देणारा हा पूर नव्हे महापूर...

या महापुरात.. 
माणूस चांगला की वाईट हे नंतर.. सगळ्यांनाच समांतर अंतर.. जीवाचे हाल..

लुबाडणारे काठावर तरु शकतात आणि बिचारे लोक पाण्याखाली जाऊ शकतात.. ही भयंकर किमया केवळ महापुरातच ! 
यंदा पाऊस नाही म्हणता म्हणता..सगळीकडे पाणीच पाणी असे म्हणायची वेळ आणली या पावसाने..
प्रलय माझ्या गावकडला..कोल्हापूरकडला..

गेल्या काही दिवसांपासून गंभीर आणि झिणझिण्या आणण्यासारखी परिस्थिती झाली आहे तिकडं.. 
काही तासांपूर्वीच माझ्या काकीला फोन केला.. घरची परिस्थिती काय.. खात्या-पित्या घरात जेव्हा प्यायला पाणी नाही.. लाईट नाही.. खायला अन्न नाही.. लहान पोरांसाठी पुरेसे दूध मिळत नाही.. गाई म्हशींचे हाल.. 
सगळं असताना कोरड्या खोकल्यासारखी अवस्था करून ठेवली एकाएकी सगळ्यांची....
दुसऱ्याच्या घरात परिस्थिती कशी असेल याचे कोणाकडेच उत्तर नाही.. कारण आज सगळे एकसारखेच.. 
फाटलेल्या अभाळासारखी माया प्राप्त झालेले तृप्त आहेत... कोणाच्या नशिबी काय तर.. कोणाच्या काय... 
सगळेजण विस्कटलेल्या डोळ्यांनी एकमेकांकडे पाहात पाणी ओसरायची वाट बघत आहेत... डोळ्यासमोर अस्पष्ट अन पाणावलेले अजूनेक डोळे दिसले.. त्यात केवळ पाणी आणि पाणीच आले होते..

घरची परिस्थिती ऐकून मी फोन ठेवला. तेंव्हा इथून मागचं दृष्य माझ्या डोळ्यासमोर आणलं.. एखादी गोष्ट मिळाली नाहीतर दंगा करणारे आपण.. पण आज या परिस्थितीत दुसऱ्यांचे अपुरे हट्ट ही पुरवू शकत नसू तर.. काय गरिबी आणि काय श्रीमंती.. 

माझें सगळे समज गैरसमज..सगळ्या मानस गोष्टी या महापुरात बुडवून त्याला विधायक चकाकी द्यावी की संतांच्या गाथा पाण्यात बुडल्यानंतरचे नवे विश्व जसे निर्माण झाले.. तसेच नव्याने सारे सुरू होण्याच्या दिशा शोधाव्यात असे काहीसे वाटू लागले...
अचानकच सगळी चित्रं डोळ्यासमोर फिरू लागली...
हा पूर जर असाच वाढला तर काय ? उद्या एक गाव.. परवा दुसरे.. थेरवा तिसरे.. असे होत होत... विश्व एका दारी जिथे पाणीच पाणी.. असे पाणी ज्याला हातही नाही आणि पायही लावू शकत नाही.. याचीच भीती..
 
आई अंबाबाई.. लोकांना जीवदान दे !

इतर ब्लॉग्स