साहेब, या पुरानं आयुष्याचा चिखल केला!

अॅड.  कृष्णा पाटील
Sunday, 11 August 2019

मी आख्ख्या गावाला देत आलो साहेब, पण या पुरानं मात्र मला पुरतं लुबाडलं. आयुष्याचा चिखल केला. मी असं काय पाप केलं होतं साहेब?

खंडोजीरावांचा कोर्टात दावा चालू होता. ते नेहमी वेळेवर तारखेला यायचे. गळ्यात माळ. कपाळावर टिळा. पांढरी विजार. पांढरा शर्ट. त्यावर टोपी. बोटात अंगठ्या. एकूणच रुबाबदार गडी. तारखेला गाडीतूनच यायचे. स्कॉर्पिओ गाडीत नेहमी दोघे-तिघे असायचे. 

दोन-तीन वर्षे दावा चालला. नंतर त्या दावेत मध्यस्थी (Arbitrator) नेमण्यात आला. त्यांच्यापुढे प्रकरण चालले. 

मला खंडोजीराव विचारायचे, "वकील साहेब, पुढे काय करायचं? मी म्हणायचो, "तुमचा तोटा होईल, असं काही करु नका". शेवटी तुम्हीच ठरवायचं आहे. चुलत भावाचं सोडा.. सख्खे भाऊ पण त्यामध्ये आहेत. त्यांचं काय? तुम्ही एकाच आईच्या पोटातून आलाय.

खंडोजीराव...गाव अंकली. नदीकाठचा भाग. बागायत जमीन. मोठा वाडा. घरी नोकर-चाकर. पंचवीस-तीस जनावरे. मोठा परगणा. ट्रॅक्टर, दोन जिपा, वीटभटट्या... 

गावचा कुठलाही कार्यक्रम खंडोजीरावांशिवाय होत नसे. निम्मा खर्च खंडोजीरावांचा. बरेच कार्यक्रम संपूर्ण खर्च करून तेच करायचे. असे हे खंडोजीराव. 

पण चुलत भावांनी विनाकारण मिळकतीचा वाद निर्माण केला. खरं तर त्यात तथ्य काहीच नव्हते .कोर्टानं पण चुलत भावांना समजावून सांगितले, पण ते ऐकण्यास तयार नव्हते. म्हणूनच हे प्रकरण मध्यस्त्यांकडे पाठवण्यात आले.

मध्यस्थ्यापुढे बरीच चर्चा झाली. शेवटी ते पण कंटाळले. प्रकरण मिटणार नाही या मतापर्यंत आले. इतक्यात खंडोजीराव उठून उभा राहिले. म्हणाले, ठीक आहे. त्यांना दीड एकर जमीन जादा पाहिजे. मी दिली, पण एका अटीवर. मी जमीन 'दान' दिली असं लिहायला पाहिजे. 

नदीकाठची दीड एकर जमीन देऊन प्रकरण मिटले. खंडोजीरावांची दानत बघून मध्यस्थी पण अचंबित झाले. 

नंतर कधीतरी खंडोजीरावांचा फोन यायचा. बरं आहे का? जत्रेला जेवायला येताय का? वगैरे...

परवा कृष्णा नदीला पाणी वाढत होतं. मी खंडोजीरावांना फोन केला. तर म्हणाले, "सर्व ठीक आहे. पूर आला तरी आमच्याकडे फारसा येत नाही.  2005 ला एवढा मोठा पूर आला, पण फारसं काही झालं नाही". मी ठीक आहे म्हणालो. 

नंतर पूर वाढत गेला. खंडोजीवांचा पण संपर्क तुटला. 

आम्ही पूरग्रस्तांना मदत करायला गेलो. पहिल्यांदा माळवाडी, भिलवडी या भागात. काही ब्लँकेट, काही चादरी घेऊन. नंतर दुसऱ्या दिवशी कर्नाळमधील बाहेर काढलेल्या लोकांना पाणी, चहा, साखर वगैरे... रोज जेवढे शक्य तेवढी मदत करीत होतो. 

आज सांगलीला गेलो होतो. सगळी कॉलेज पूरग्रस्तांनी भरलेली. सगळी बोर्डिंग भरलेली. आम्ही गाडीतून पाण्याचे कॅन, स्वेटर, ब्लँकेट, चपात्या आणि चटणी असे साहित्य घेतलेले. आम्ही काॅलेज बोर्डिंगमध्ये गेलो. अन्न वाटप चालू केले. दोन-तीन खोल्या संपल्या. हॉलमध्ये गेलो....

..आणि एका कोपऱ्यात खंडोजीराव दिसले. धक्काच बसला... 

मी धावतच त्यांच्याजवळ गेलो. दाढीची खूटं वाढलेली. कपडे चिखलाने भरलेले. त्यात निम्मी अर्धी फाटलेली. सगळ्या अंगाला खरचटलेलं. शेजारी बायको..फाटकी साडी सावरत बसलेली. 

मला गलबलून आलं. मी त्यांच्या शेजारी बसलो. ते सांगू लागले. "हूतं नव्हतं सारं गेलं साहेब. जित्राबं देशोधडीला लागली. मुकी जनावरच ती. कुठे असतील, कोण जाणे. वाडा जमीनदोस्त झाला. वीट भट्ट्या वाहून गेल्या. ऊस तर संपलाच. घरचे धान्य, भांडीकुंडी... मागं काय राहिलंय का न्हाय देव जाणे. आज पाच दिवस झाले, पोरांचा संपर्क नाही. जिवंत आहेत का नाहीत काय माहित? 

मी आख्ख्या गावाला देत आलो साहेब, पण या पुरानं मात्र मला पुरतं लुबाडलं. आयुष्याचा चिखल केला. मी असं काय पाप केलं होतं साहेब? खंडोजीराव हुंदके देत होते. मी त्यांना सावरण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत होतो. 

बाहेर सगळीकडे पाणीच पाणी. बघ्यांची गर्दी. सायरनच्या गाड्या. एसडीआरएफचे जवान, एनडीआरएफचे सैन्य. सगळा गलका चालू होता. एवढ्यात हॉलमध्ये पुण्याहून दिलासा फाऊंडेशनचे लोक आले. त्यांनी मदत करायला सुरुवात केली. फाउंडेशनचा एक कार्यकर्ता आमच्याजवळ आला. त्याने खंडोजीरावांना एक बिस्किट पुडा आणि दोन केळी दिली. खंडोजीरावांनी हात पसरले आणि मला हुंदका दाटून आला.

इतर ब्लॉग्स