खरी कसोटी भाजप-शिवसेनेचीच !

खरी कसोटी भाजप-शिवसेनेचीच !

लोकसभा निवडणुकीतील प्रचंड यशानंतर भाजपचं तथाकथित वादळ आता विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सातारा या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याभोवती घोंघावू लागले आहे. हे वादळ बालेकिल्ल्याची मोठी पडझड करणार, असं वातावरण त्यामुळे निर्माण झालेलं आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासारखा राष्ट्रवादीचा एक बलाढ्य नेता आपल्याकडे घेऊन भाजपने लढाईपूर्वीच एक बाजी मारली आहे. शिवेंद्रराजेंच्या पक्षांतराच्या धक्‍क्‍यातून बालेकिल्ला सावरण्याआधीच आता दस्तुरखुद्द उदयनराजे भोसले आणि त्यापाठोपाठ रामराजे नाईक-निंबाळकर हेही भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांमुळे आता बालेकिल्ला ढासळणारच, अशा आवया उठत आहेत. 
या सर्व घडामोडींमुळे भाजपच्या गोटात कधी नव्हे एवढा उत्साह संचारल्याचे दिसते. बालेकिल्ला काबू करण्याच्या आपल्या स्वप्नापासून आपण अगदी केवळ काही दिवसच दूर आहोत, या विचारात भाजपजन मश्‍गुल आहेत. तसं त्यांनी मश्‍गुल राहायलाही हवं. कारण गेल्या पाच वर्षांत भाजपने सातारा जिल्ह्यात उभी केलेली ताकद आता कुठे फलद्रुप होत असल्याची चिन्हे त्यांच्या कार्यकर्त्यांना दिसू लागली आहेत. अर्थातच त्यांचे प्रयत्न किती प्रमाणात यश देणार, हे पाहण्यासाठी निवडणूक होईपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. 
भाजप-शिवसेना खरोखरंच सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीला खिंडार पाडणार का, हे यथावकाश कळेलच. पण, आता या क्षणी या प्रश्‍नाचे उत्तर शोधायचे असेल, तर त्यासाठी जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात काही काळ डोकावून पाहावे लागेल आणि तसं इतिहासात पाहिले गेल्यास एक बाब लक्षात येते, ती म्हणजे एखाद-दुसरा तुरळक अपवाद वगळता भाजप-शिवसेनेला आपल्या स्वतःच्या चिन्हांवर या जिल्ह्यात कधी यश मिळालेलं नाही आणि जे काही यश मिळालं, ते कॉंग्रेसअंतर्गत तत्कालीन बंडाळ्यांमुळेच. 1995 मध्ये राज्यात युतीची सत्ता आली. कॉंग्रेसचा पाडाव झाला. त्यावेळीही सातारा जिल्ह्यातून विजयी झालेले रामराजे नाईक-निंबाळकर, मदनराव पिसाळ, भाऊसाहेब गुदगे, पी. डी. पाटील आणि धोंडिराम वाघमारे हे पाच उमेदवार अपक्ष होते. निवडून आल्यानंतर त्यांनी भाजपला पाठिंबा दिला, हा भाग वेगळा. त्यानंतर 1997 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले हे भाजपच्या चिन्हावर विजयी झाले. अर्थातच त्यांच्या विजयात भाजपची ताकद नव्हे, तर अंतर्गत गटबाजीचा मोठा वाटा होता. त्यानंतरच्या दोन निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर ते निवडणूक हरले होते. 
पाटणमधून आमदार शंभूराज देसाई दोन वेळा शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढले. अर्थातच त्यांच्या विजयाचे मोठे श्रेय त्यांच्या व्यक्तिगत करिष्म्याला द्यायला हवे. सदाशिव सपकाळ जावळीतून शिवसेनेकडून एकदा विजयी झाले होते. नंतरच्या काळात त्यांनाही पराभव पत्करावा लागला होता. 
अगदी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही माढ्याचा भाजपचा उमेदवार हा मूळचा कॉंग्रेसचाच होता आणि त्याच्या विजयामध्ये मोठा वाटा कॉंग्रेसचे आमदार जयकुमार गोरे याचा होता, हे सर्वश्रुत आहे. 
या सर्व विवेचनातून एक बाब स्पष्ट होते, की सातारा जिल्ह्यात अगदी यशवंतराव चव्हाणांपासून लाभलेला कॉंग्रेस विचारांच्या परंपरेचा मोठा प्रभाव आहे आणि या प्रभावाला धक्का देण्यात भाजपला आजपर्यंत या जिल्ह्यात कधी यश आलेले नाही. अगदी 1999 मध्ये कॉंग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरही या जिल्ह्यातील जनतेने याच विचाराच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला साथ दिली; पण ते भाजप-शिवसेनेकडे वळले नाहीत. एवढेच नव्हे तर मागच्या मोदी लाटेतही हा जिल्हा तरलेला आपण पाहिला. कॉंग्रेसी विचारांचा जिल्ह्यातील प्रभाव इतका घट्ट आहे, की राजकीय खेळ्यांत चाणाक्ष असलेले उदयनराजे भोसले यांनीही 2009 पासून उमेदवारीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचीच निवड केली. अलीकडच्या दहा वर्षांत भाजपने त्यांना अनेक प्रलोभने दाखवूनही त्याला ते भजले नाहीत. 
तात्पर्याचा मुद्दा हा, की शिवसेना-भाजपला आजवर या जिल्ह्यात मोठे यश मिळालेले नाही आणि जे काही तुरळक मिळाले, ते त्यांच्या कूटनीतीचे प्रयोग होते. निर्भेळ यश मिळविण्यासाठी या पक्षाला इथला मूळ कॉंग्रेसी विचार मोडीत काढावा लागणार आहे. यशवंतराव-किसन वीरांपासून तयार झालेल्या वैचारिक जडणघडणीवर मात करावी लागणार आहे. त्यात ते कितपत यशस्वी होणार, हे या निवडणुकीत स्पष्ट होणार आहे. 
गेल्या पाच वर्षांत भाजपने उपस्थित केलेले विकासाचे मुद्दे, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देशात मिळविलेला विजय पाहिल्यानंतर सत्तेच्या बाजूने राहायला हवे, असा जर कोणी विचार केला असेल, तर ते स्वाभाविक आहे. पण, ते आपल्या कॉंग्रेसी मनोवृत्तीच्या जनतेला रुचले आहे का, हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे. 
कोणत्याही परिस्थितीत साताऱ्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा पाडाव करायचाच म्हणून गेली पाच वर्षे भाजप प्रयत्नशील आहे. त्यासाठी सर्व राजकीय आयुधांचा वापर त्यांच्याकडून सुरू आहे. या सर्व परिस्थितीला तोंड देणे ही कॉंग्रेस-राष्ट्रवादीसाठी सत्त्वपरीक्षा आहेच; पण त्याहून मोठी कसोटी भाजपचीच आहे. सत्तेसाठी गेल्या पाच वर्षांत मोठी व्यूहरचना त्यांनी आखली आहे. अतुल भोसले, शेखर चरेगावकर, दीपक पवार आदींना सत्तेच्या जहागिऱ्या देऊन त्यांची ताकद वाढविण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. अलीकडेच शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना पक्षप्रवेश देऊन सर्वांना धक्का दिला आहे. अन्य दोन राजांनाही त्यादृष्टीने चर्चेत ठेवले आहे. ही सारी आयुधे, राजकीय डावपेच पणाला लावले आहेत म्हणूनच आता आगामी निवडणुकीत यशस्वी होऊन दाखविणे युतीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. हीच फार मोठी कसोटी भाजप-शिवसेनेपुढे आहे. कारण, त्यांना इथे एका विचाराशी लढा द्यायचा आहे. असं म्हणतात, की विचार कधी मरत नसतो. तसा तो मरतो का नाही, हे निवडणुकीनंतर कळेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com