Dreamgirl Review : आयुषमानचा 'आवाजी' अभिनय

dream girl review
dream girl review

"भगवान जब देता है, तो छप्पर फाड के देता है" असे म्हणतात आणि ते अभिनेता आयुषमान खुरानाच्या बाबतीत चांगलेच जुळून आले आहे. कारण 'बरेली की बर्फी', 'शुभमंगल सावधान', 'अंधाधुन', 'आर्टिकल 15' असे त्याचे एकापाठोपाठ एक चित्रपट यशस्वी ठरले आहेत. वेगळ्या आणि दमदार भूमिका ही त्याची खासियत राहिलेली आहे. आता आलेल्या 'ड्रीमगर्ल' चित्रपटात त्याने करण सिंहची भूमिका साकराली आहे. मुलीचा आवाज काढून त्याने भरपूर मनोरंजन केले आहे. त्यासाठी त्याला अन्य सहकलाकारांची तितकीच मोलाची साथ लाभली आहे. विशेष म्हणजे चित्रपटाची स्क्रीप्ट उत्तम असून त्याला चारचांद लावले आहेत ते कलाकारांच्या दिलखुलास अभिनयाने. जगजित सिंह (अन्नू कपूर) यांचा मुलगा करण सिंह. तो शिकला-सवरलेला असतो. परंतु, त्याच्या हाताला काही कामधंदा नसतो. मात्र, लहानपणापासूनच मुलीचा आवाज चांगला काढत असल्याने तो रामलीला आणि कृष्णलीलांमध्ये सीता आणि राधाची भूमिका करत असतो. त्याच्या वडिलांनी अर्थात जगजित सिंह यांनी दुकानासाठी कर्ज घेतलेलं असतं. त्यातच करण काहीच काम करत नसल्याने त्यांचीही चीडचीड सुरू असते. दरम्यान, एके दिवशी करण छोटूच्या (राजेश शर्मा) कॉल सेंटरवर पोहोचतो. नोकरी देण्याबाबत त्यांना अक्षरशः गळ घालतो. तेथे त्याला नोकरी मिळते खरी, परंतु ती मुलीच्या आवाजात बोलण्याची. वडिलांनी घेतलेले कर्ज आणि अन्य गोष्टींचा विचार करून करण ती नोकरी स्वीकारतो. 'पूजा' नावाच्या मुलीचा आवाज काढून तो कस्टमरशी संपर्क साधतो. पूजाचा आवाज सर्वांनाच इतका आवडतो, की ते तिच्या प्रेमात पडतात. मात्र, ही बाब तो सगळ्यांपासून लपवून ठेवतो. त्याचा जवळचा मित्र स्माईली (मनज्योत सिंह) याला फक्त ही गोष्ट माहित असते. त्याचे मुलीच्या आवाजातील लाडिवाळपणे आणि प्रेमाने बोलणे पाहता पोलिसवाला राजपाल (विजय राज), महेंद्र (अभिषेक बॅनर्जी), किशोर टोटो (राज भन्साळी) आदी त्याच्या प्रेमात आकंठ बुडतात. त्यातच करणचे प्रेम माही (नुसरत भरूचा) बरोबर होते. तिलाही करण मुलीचा आवाज काढतो हे माहीत नसते आणि त्यानंतर कसा गोंधळ आणि गडबड उडतो हे हसतखेळत उत्तमरीत्या चित्रपटात दिग्दर्शक राज शांडिल्यने मांडले आहे. 

राज शांडिल्य हा खरंतर लेखक. 'कॉमेडी सर्कस', 'कपिल शर्मा शो' या कार्यक्रमांसोबत काही हिंदी चित्रपटाचेही त्याने लिखाण केले आहे. नुकत्याच आलेल्या "जबरिया जोडी' या चित्रपटाचे लेखनही त्याने केले आहे. एक उत्तम लेखक म्हणून इनिंग खेळता खेळता दिग्दर्शक म्हणूनही त्याने या चित्रपटात चांगली कामगिरी केली आहे. मनोरंजन करताना चित्रपटाच्या क्‍लायमॅक्‍सला सामाजिक संदेशही देण्याचा प्रयत्न केला आहे. आज सोशल मीडियामुळे माणूस आपल्याच विश्‍वात मग्न असतो. एकटेपणा, एकाकीपणाचे जीवन जगत असतो. त्याच्या मनातील भावना व्यक्त करण्यास विश्‍वासातील जवळपास कुणीच नसतो. अशावेळी माणसाने आपल्याच कुटुंबातील कुणाशी तरी संवाद साधणे आणि आपला एकटेपणा दूर करणे आवश्‍यक आहे, असा महत्त्वपूर्ण संदेश चित्रपटात सांगितला आहे. आयुषमान खुराना, अन्नू कपूर, नुसरत भरूचा, विजय राज, मनज्योत सिंह आदी कलाकारांनी उत्तम अभिनय केला आहे. आयुषमानच्या करिअरमध्ये आणखी एका वेगळ्या भूमिकेची भर पडली आहे. एका मुलीचा आवाज काढणे आणि लाडिवाळपणे त्याचे ते बोलणे एकदम सुरेख. त्याने भूमिकेतील खेळकर आणि खोडकरपणा अचूक टिपला आहे. त्यामुळे चित्रपट पाहताना मजा येते. 

विशेष म्हणजे अन्नू कपूर आणि विजय राज या दोन कलाकारांनी चांगली करमणूक केली आहे. त्यांनी आपल्या भूमिकेचे बेअरिंग चांगले पेलले आणि धमाल उडविली आहे. नुसरत भरूचा हिच्या वाट्याला काही मोजकेच सीन्स आहेत, पण त्यामध्ये ती भाव खाऊन गेली आहे. चित्रपटातील संवाद तर दाद देण्यासारखेच. या चित्रपटाला मीत ब्रदर्स यांनी संगीत दिलं असून "राधे राधे" आणि "दिल का टेलिफोन" ही गाणी विशेष लोकप्रिय ठरली आहेत. या गाण्याची कोरिओग्राफीही उत्तम झाली आहे. चित्रपटाची लांबी काहीशी खटकणारी असली तरी, मध्यांतरापूर्वी चित्रपट काहीसा कमजोर वाटतो. मात्र, त्यानंतर चांगली पकड घेतो. राज शांडिल्य आणि टीमने विनोदाची चांगली मेजवानी दिली आहे. एक करमणूक करणारा असा हा चित्रपट आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com